मुख्य सामग्रीवर वगळा

पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे भाषण

Search
Search...
बालशतकाची सुरुवात
Published on

April 29, 2025
ज्या नूतन बालशिक्षण संघाची मी एक सदस्य आहे तो संघ कै. गिजुभाई यांनी स्थापिला व वाढविला आहे. हा संघ गेली वीस वर्षे बालशिक्षणाचे आपले कार्य मोठ्या श्रद्धेने अविरत करीत आहे. संघाला त्यावेळी कोणाचीहि कसलीहि मदत नव्हती. राष्ट्रीय पुढाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले नव्हते. ज्या मुलांच्या शिक्षणाकरिता तो काढण्यांत आला त्यांच्या पालकांनाही त्याचेबद्दल काही आस्था नव्हती. आणि असे असूनहि आम्ही मात्र त्याचे कार्यात दंग झालो होतो. काही झाले तरी मागे फिरायचे नाही अशा नेटाने आम्ही पुढे जात होतो. नियतकालिकें, बाल मंदिर व अध्यापनवर्ग चालविले, परिषदा व पालकांच्या सभा भरविल्या, शहरांतल्या आणि खेड्यांतल्या मुलांच्या शिक्षणासंबंधी निरनिराळे प्रयोग केले व आणखीहि कितीतरी गोष्टी केल्या.

हे सर्व करायला आम्हाला कोणी स्फूर्ती दिली, कोणी प्रवृत्त कले असे तुम्हाला वाटते ? ही स्फूर्ती आम्हांला बालकांपासून मिळाली, त्यानेच आम्हाला या कामी प्रवृत्त केले. बालकांचे ते कृतिमय जीवन, जीवनांतील संस्काराच्या प्रतिक्रिया म्हणून झालेल्या त्याच्या स्वयंस्फूर्त हालचाली, त्याच्या आत्म्याचे अविष्कार इत्यादि मुळे आमचे मनात विश्वास उत्पत्र झाला. मानवी जीवनाचा विकास त्याचे ठिकाणी बीजरूपाने वसत असलेल्या शक्तींची उद्यावस्था वगैरे दृष्ये पाहून आमची अंतःकरणे मोठमोठ्या आशा-आकांक्षांनी भरून गेली. आणि या मुळेच आम्ही आपल्या अंगिकृत कार्याला निष्ठापूर्वक चिकटून राहिलो. ते सर्वच अनुभव मोठे रम्य व उदास होते !

मुलांशी आमचा संबंध जसजसा वाढू लागला तसतसे आम्हाला कळू लागले की बालकांची स्थिति अत्यंत दुःखद आहे. वाढीच्या मार्गावरून जात असताना त्यांना पदोपदी किती अडथळे येतात, किती अपमान सोसावे लागतात, त्यांची किती आबाळ होते, त्यांच्या अंतरआत्म्याची प्रत्येक बाबतींत कशी गळचेपी होते आणि या सर्व बाबीसंबंधी त्यांच्या पालकांचे अज्ञान किती भयंकर असते इत्यादि गोष्टी आम्हांला दिसून आल्या. मुलांच्या  शिक्षणासंवर्धनासंबंधीची ही अनास्था व हे अज्ञान केवळ अशिक्षित व गरीब पालकांमध्येच दिसून येई असे नाही तर चांगल्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या पालकांमध्येहि दिसून येई. यासंबंधी जितका जितका खोल विचार करू तितके तितके आमचे अंतःकरण दुःखी व व्यथित होई. बालजीवनाची काय ही परवड व रडकथा असे आम्हांला वाटे. छे, बालकांकरिता नुसते बालमंदिर काढून भागावयाचे नाही तर त्याचेही पूर्वी पालकांना आपल्या मुलांसंबंधीच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांच्या संबंधीचे शिक्षण देणे या गोष्टी मुख्यतः केल्या पाहिजेत असे आम्ही ठरविले. पूज्य बापूजींनीच आमच्या या कार्यास पुष्कळ दिवसांपूर्वीच पाठिंबा दिला होता. पण आता लोकांच्या मनाची पुरेशी तयारी झाल्याचे त्यांना दिसून आल्याबरोबर हे पूर्वमूलोद्योग शिक्षण (pre-basic Education) आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लोकांपुढे आज मांडले. आणि त्याचा राष्ट्रीय उन्नतीच्या रचनात्मक कार्यक्रमांत समावेश केल्याचे पाहून आम्हांला अतिशय आनंद होत आहे. बालशिक्षणाची पुढील प्रगती झपाट्याने होईल अशी आम्हांला आता पुष्कळ आशा वाटत आहे.

या बालशिक्षणसंबंधी योग्य कल्पना व्हावी एतवर्थ काही गोष्टीचा खुलासा केल्यास ते याक्षणी योग्य होईल.

पूर्वमूलोद्योग शिक्षणपद्धती सुरू करताना जो मोठा थोरला खर्च करावा लागणार आहे तो कसा व कोठून करायचा याचीच विवंचना कितीतरी लोकांना लागून राहिली आहे. या भरमसाट खर्चाचा उल्लेख परवांच एका सद्‌गृहस्थांनी मोठ्या कळकळीने केला. या एकंदर प्रश्नाकडे पाहाण्याची माझी दृष्टि ही अशी आहे. आजपर्यंत असल्या शिक्षणामागे एक पैसाही खर्च करण्याचे आपल्याला माहीत नसल्यामुळे पहिल्यांदाच खर्च करताना तो फार मोठा वाटणे स्वाभाविक आहे. मानवी मनरूपी सामुग्रीचा योग्य तो उपयोग करून घेण्याऐवजी ती तशीच फुकट पडू दिल्यामुळे आजपर्यंत नुकसान सोसावे लागले आहे याचे गणित एखाद्या अर्थशास्त्रज्ञाने केल्यास काय दिसेल ? या सुखसंपत्तीची उपेक्षा कल्यामुळे राष्ट्राचे भयंकर नुकसान झाल्याचेच दिसून येईल अशी माझी खात्री आहे.

मुलांच्या शरीरपोषणाला चांगले दूध अवश्य आहे असे एकदा पटल्यावर ते मिळत नाही म्हणून त्याऐवजी नुसते पीठपाणी देऊन आपले समाधान होणार नाही. अश्वत्थाम्याच्या आईने आपल्या मुलाला असेच पाणी देऊन आपले व मुलाचे समाधान करण्याचा प्रयत्न नव्हता का केला? आपण तसला निष्फळ प्रयत्न न करता द्रोणाचार्याप्रमाणे खरोखरचे दूध मिळविण्याचा व ते मिळविण्याकरिता लागणारा पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ स्वस्तपणाकडे न पाहता बालकाच्या सर्वांगीण व योग्य विकासाला जरूर त्या गोष्टी – त्या महग असल्या तरी – आपण प्राप्त करून घेतल्या पाहिजेत. हे काम हल्ली खाजगी संस्थाच करीत असल्यामुळे त्याला लागणाऱ्या खर्चाचा बोजा मुख्यतः पालकांवर किंवा दानशूर व्यक्तींवर त्या संस्थांवरच पडतो. पालकांना असले मोठे खर्च साहजिकच फार डोईजड वाटतात व धनिक संस्थांना किंवा व्यक्तींना असल्या नवीन उपक्रमाबद्दल फारशी खात्री व अगटी वाटत नसल्यामुळे तेही पैसा देण्यास तितकेसे तयार होत नाहीत.

हा विचार कळायला फारसा कठीण आहे असे मला वाटत नाही. तुमची एक बाग आहे, समजा. तिच्यातील झाडांची निगा राखण्याकरिता करावा लागणारा खर्च बागवान केव्हा करील? सुरुवातीलाच करील, का तत्काल होणाऱ्या मिळकतीपेक्षा खर्च फार मोठा होतो तेव्हा पुढे उत्पन्न काढण्यावरच खर्च करू असे म्हणून खर्च करण्याचे पुढे ढकलील? तोपर्यंत त्याने लावलेली रोपे नाहीशीही झाली असतील! जो विचार साध्या बागवानालाही समजतो तो मोठ्यामोठ्यांना कळू नये हे आश्चर्य नाही का? हा सर्व सवयीचा परिणाम आहे. नवीन गोष्ट आपण घेऊ, पण केव्हा? तर त्या घेण्याचा काही फायदा नाही अशी स्थिति झाली म्हणजे! यासंबंधी मला आपणाला एवढीच विनंती करायची की खर्चाच्या तथाकथित भरमसाटपणासंबंधी निष्कारण गैरसमज करून घेऊ नका. आणि पुढे खर्च करण्यापेक्षा आता सुरुवातीलाच थोडासा जास्त खर्च करण्याला तयार व्हा.

या शिक्षणपद्धतीविरुद्ध दुसरा एक आक्षेप घेतला जातो तो असा की या सर्व पाश्चात्य-परकीय आहेत. वर ज्या सदगृहस्थांचा उल्लेख केला आहे त्यानीच हा आक्षेप घेतला आहे. असा आक्षेप येणे हे दुर्भाग्याचे नाही का?  मोठेमोठे संशोधक, सत्यद्रष्टे, तत्ववेत्ते वगैरे अमुक एका देशाचे असतात असे नाही. ते सर्व जगाच्या उन्नतीकरिता कार्य करीत असतात आणि म्हणून त्याचे शोध घेण्याला कोणालाहि काही वाटता कामा नये. एवढे खरे की ते जसेच्या तसे न घेता त्यात देशकाल परिस्थितिप्रमाणे कमीजास्त बदल करूनच ते घेतले पाहिजेत. परंतु एखाद्या गोष्टीवर ती केवळ परकी आहे म्हणून बहिष्कार घालणे शिक्षणासारख्या क्षेत्रात तरी अपकारक ठरेल. प्रकाश कोठूनही कां येईना- तो घेतलाच पाहिजे. पश्चिमेकडून येणारी प्रत्येक गोष्ट चांगली असे वाटण्याची व तिचे आंधळेपणाने अनुकरण करण्याची वृत्ती जशी वाईट होय, तशीच आपण सर्वज्ञ आहोत, अशा वृथा भावनेने दुसरीकडून येणाऱ्या ज्ञानाला ‘मत आव’ करून स्वस्थ व स्वयंतुष्ट राहण्याची वृत्तीहि वाईट होय. या प्रकारच्या शिक्षण क्षेत्रात तर संशोधनाला व प्रयोगाला कितीतरी अवसर आहे, आणि माझी खात्री आहे की पुष्कळसे तरुण स्त्रीपुरुष या नवीन क्षेत्रात काम करायला आवडीने पुढे येतील. पुष्कळांना हे काम मोठ्या जिकीरीचे व डोकेफोडीचे वाटते. नादी, हट्टी, व दुसऱ्यांशी यात्किचितहि मिळतं न घेणारी अशा पोरट्यांशी चोवीस तास हुजत घालीत बसण्यात आनंद तो काय असणार ? असे त्यांना वाटते. परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की माझा जो मुलांसंबधीचा अनुभव आहे तो अगदी उलट आहे. त्यांच्यात वावरताना मनाला एक प्रकारे कसे बरे व ताजेतवाने वाटते. त्यांच्याशी वागताना अद्यापपर्यंत गूढ व अज्ञात असलेल्या मानवी मनाचे व त्याच्या नाजूक व्यापाराचे एकदम दर्शन झाल्यासारखे वाटते. तुमच्या मताचा स्वाभाविक ओढा तत्त्वज्ञानाकडे असेल तर तुमच्या विचाराला कितीतरी खाद्य मिळू शकते. मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या अभ्यासाला येथे केवढा तरी अवसर आहे; कारण मुलांशी वागताना त्यांच्या वर्तनाच्या मूळ गड्डयालाच तुम्हाला हात घालावा लागतो. तुम्ही साहित्यिक असाल तर बालकांच्या भाषेचा व त्यांच्या साहित्याचा अभ्यास करायला तुम्हाला केवढी तरी संधी प्राप्त होईल. तुम्ही कलेचे शोकी असाल तर बालकांच्या कलविलासांतहि तुम्हाला ती दृष्टीस पडेल. तुमची दृष्टी शास्त्रज्ञाची असेल तर बालकांच्या जिज्ञासामय जीवनांतूनहि तुम्हाला पुष्कळसे घेता येईल. थोडक्यांत सांगायचे म्हणजे हे क्षेत्र असे आहे की त्यांत काम करताना तुमच्या सर्व वृत्ति-प्रवृत्तीना पूर्ण वाव मिळेल व त्यांत जन्मभर दंग व्हाल.

हे झाले व्यक्तीच्या दृष्टीने. राष्ट्राच्या दृष्टीने पाहिले तर अगदी खालपासून ते वरपर्यंतच्या सर्वांगीण शिक्षणाला एकदम हात घालण्यास आम्हांला सांगून बापूजींनी तर एक मोठे युगच सुरू केले आहे. हिंदी जीवनाच्या अज्ञात प्रांतात केवढा तरी मोठा गुप्त ठेवा सुप्तपणे पडून राहिला असला पाहिजे. आपण कार्यकर्त्यांनी एका गोष्टीबद्दल विशेष काळजी घेतली पाहिजे व ती म्हणजे ही की आता आपल्या शाळा, आपल्या कार्यपद्धती वगैरे खेडेगावांत नेताना मूळच्या शहरी स्वरूपात नेता कामा नये. उलट आपण जावयाचे ते अगदी कोऱ्या करकरीत मनोवृत्तीने गेले पाहिजे, व खेड्यातील जमिनीत कशा प्रकारच्या शाळा मूळ धरतील आणि आपोआप व सुलभपणे वाढतील हे पाहून त्याप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे.

खेड्यांतून अगोदरच प्रचलित असलेल्या विद्या व कला, खेडुतांची गाणी व नाच, आणि सबंध ग्रामीण परिस्थिति यांतूनच उच्च दर्जाचे शास्त्र, कला व साहित्य याचा एक मोठा साठा आपणाला मिळेल अशी माझी खात्री आहे.

आपल्या चित्रकलेला निरनिराळ्या प्रकारच्या पार्श्वभूमी उपयोगी पडतील अशा कितीतरी गोष्टी (उदाहरणार्थ : भिंती, जमिनी, मातीची भांडी, झाडांच्या साली, कळकीचे सोट) तसेच आपल्या रंगरंजनाला व नक्षीकामाला सामग्री पुरवून मदत करतील अशाहि कितीतरी गोष्टी (उदा. निरनिराळ्या रंगाची माती, बिया, रानफुले, रानगवते वगैरे) आपणाला तेथे सापडतील. येथे शेजारच्या खोलीत एका कोपऱ्यांत एक लहानसे प्रदर्शन मांडले असून ते आपण पाहिलेत तर ग्रामीण परिस्थिती निरनिराळ्या कलांना व शास्त्रांना उपकारक करून घेता येईल या माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर मिळेल.

नक्षी व सजावट यांचे कामी शक्यतो फुकट गेलेल्या व रद्दीत टाकलेल्या वस्तूंचाच उपयोग गेली कित्येक वर्षे आम्ही करीत आलो आहोत. एकदा त्या दिशेने व दृष्टीने आम्ही पाहू लागल्याबरोबर निरुपयोगी वाटून फेकून दिलेल्या अशा शेकडो वस्तू आम्हांला दिसू लागून आम्ही आश्चर्यचकित झालो. आमच्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना असल्या वस्तू हुडकून काढण्याची आता सवयच झाली आहे. आम्हां सर्वांना एक नवीन दृष्टी आली असून तिच्या योगाने पूर्वी न दिसलेल्या गोष्टी आम्हांला दिसू लागल्या आहेत ग्रामीण जीवनाशी आपण समरस झालो पाहिजे, आपण तेथले बनलो पाहिजे असे जे मी म्हणते ते हे असे.

पूर्वमूलोद्योग शाळांमधून शिक्षण दिले जाईल ते अर्थातच कृतीव्दारा दिले जाईल. कारण चळवळ, हालचाल वगैरे स्वरूपाची कोणती ना कोणती कृति हाच बालकाचा जीव-आत्मा होय. इंद्रियांकडून चलनवलनादि क्रिया होत असतानाच त्यांना स्नायूंचे नियंत्रण करता येते व त्यायोगेच त्यांना प्रत्येक कृतीत गोडी वाटू लागते. कोणतीही कृती करण्याचा प्रसंग येवो, ती ती हसतमुखाने करतात. हाताला जे जे लागेल – मग ते केरसुणी, जाते, टकळी वगैरे काहीहि असो – त्याचा उपयोग ते करतील व प्रत्येक वेळी नवीन नवीन आनंद उपभोगतील. पूर्वमूलोद्योग व मूलोद्योग या दोन्ही प्रकारच्या शाळांतून या कृतीलाच प्राधान्य दिले जाईल व कृती हेच शिक्षणाचे माध्यम राहील. अशा दृष्टीने पाहता मूलोद्योग शाळा हे पूर्वमूलोद्योग शाळेचे उन्नत व प्रगत रूपच असलेले दिसेल. मुलांच्या शिक्षणाला त्यांच्या तिसऱ्या वर्षी सुरुवात केली तर मला वाटते ती सात वर्षाची होईतो त्यांचा मूलोद्योगशाळेचा पहिल्या वर्षाचा अभ्यास अगोदरच पुरा झालेला असेल.

बालशिक्षणासंबंधीची शेवटची पण अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अशी की त्यांच्या चार प्रकारच्या स्वातंत्र्याचा हक्क आपण मान्य केला पाहिजे. मुले खेडेगावातली असोत अथवा शहरातील असोत, ती गरीबांची असोत वा श्रीमंताची असोत, सुशिक्षित वर्गातली असोत नाहीतर अशिक्षित वर्गातली असोत, त्यांना त्यांचे हक्क उपभोगायला मिळालेच पाहिजेत आणि हे हक्क सांभाळूनच आपण त्यांच्या मानसिक शक्तींचा विकास केला पाहिजे.

पहिले स्वातंत्र्य निवड करण्याचा बाबतीतले. कोणत्या प्रकारची कृति करायची हे मुलांचे मुलांनीच ठरवायचे. या कृतीला अनुरूप व पोषक अशी परिस्थिती जुळवून आणण्याचे काम आपले. त्या परिस्थितीत काय करायचे व तिच्यातून काय शिकावयाचे हे त्याचे त्यानेच स्वतःच्या इच्छेने ठरविले पाहिजे. त्याच्यायोग्य कृति कोणती हे आपण ठरवायचे व त्याने ती कृति फक्त हाताने करावयाची असे होता कामा नये.

दुसरे स्वातंत्र्य स्वप्रयत्नाचे. शिकविण्यासंबंधीच्या वाटत असलेल्या आस्थेच्या भरात आपणच त्यांना शिकवा सांगायला लागता कामा नये. त्यांना स्वतः प्रयत्न करायला, शिकताना चुका करायला, निरनिराळे अनुभव मिळवायला व त्यातूनच शेवटी स्वतःच्या प्रयत्नाने सत्य प्राप्त करून घेण्याला आपण त्याला संधी देऊ या.

तिसरे स्वातंत्र्य विचाराचे. प्रत्येक मुलाला प्रत्येक प्रत्येक गोष्टीविषयी स्वतःच विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला पडलेल्या प्रश्नासंबंधीचा विचार मोठ्या माणसाने करायचा, व आपण केलेला विचार त्याचा त्या लहानशा डोक्यात खुपसत हे असे आहे नी ते तसे आहे असे ठासून व दडपून सांगून त्याच्या विचारशक्तीची गळचेपी करावयाची असे होता कामा नये. त्याला त्याच्या ताकदीप्रमाणे जो काही विचार करता येईल तो करू द्या आणि तो विचार त्याला जसा अमलात आणता येईल तसा आणू द्या.

चौथे स्वातंत्र्य स्वयंस्फूर्तीचे. अमुक एक गोष्ट वेळापत्रकात आहे म्हणून मुलाने करायची असे नव्हे, तर त्याला ती गोष्ट त्यावेळी मनातून करावीशी वाटते आहे म्हणून करायची असे धोरण असू द्या. अंतःस्फूर्ति, आंतरिक ओढ, अंतःप्रवृत्ति अशा रूपाचा – नाव काहीही द्या – एक आतला जोर व्यक्तीत असतो हे लक्षात ठेवून प्रत्येक मुलाला त्याच्या त्याच्या जोराला अनुसरून काय शिकावयाचे किवा काय करावयाचे ते खुशाल शिकू द्या, करू द्या. थोडक्यात म्हणजे असे की अभ्यासक्रम आखणे, त्याची विभागणी करणे, त्याचे वेळापत्रक करणे वगैरे सगळ्या गोष्टी मुलाच्या मुलाला करू द्या.

मी वर म्हटल्याप्रमाणे, मुलाला अमुक एक गोष्ट शिकविण्याकडे दृष्टी न देता त्याच्या मानसिक शक्तीचा विकास करण्याकडे दृष्टी असू द्या. अवधान देण्याची पात्रता, विचार करण्याची शक्ती, इंद्रियांमार्फत मिळालेल्या निरनिराळ्या अनुभवांची तुलना करून, त्यातले बरे-वाईट, खरे-खोटे पारखून घेऊन प्राप्त परिस्थितीत योग्य ते ठरविण्याचे सामर्थ्य, त्या निकालाप्रमाणे वर्तन करण्याची धमक, आणि या सर्वामुळे प्राप्त झालेली इच्छाशक्ती व भोवतालच्या समाजात स्वतःला सामावून घेण्याची युक्ती याच या शक्ती व त्यांचाच विकास शिक्षणाच्या या काळात व्हावयास पाहिजे. या शक्तीचा विकास होत असतानाच मुलाला लिहा-वाचावेसेही वाटू लागले तर लिहिण्यावाचण्याला सुरुवात करायला हरकत नाही. हे सर्व करावयाचे ते मुलाचे मुलानेच स्वतःच्या कृतीने, स्वःतच्या मनाने, जगाचे ज्ञान व्हावे-निसर्गाच्या नियमांची ओळख व्हावी अशा उत्कट इच्छेने व काहीतरी नवीन केले पाहिजे अशा अंतःस्फूर्तीने केले पाहिजे.

तेवढ्यापुरत्या नेमलेल्या समितीने कोणत्या धोरणाने, व कोणते काम करावयाचे आहे याची सामान्य रूपरेषा श्री. आशादेवीनी तुम्हापुढे मांडली आहेच. यापुढे जी समिती नेमण्यात येईल तिच्या सन्मान्य सभासदांना मी अशी विनंती करते की समितीच्या एकंदर कामाची आखणी करताना मी आत्तापर्यंत ज्या गोष्टी सुचविल्या त्या त्यांनी लक्षात घ्याव्या.

जुहूजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर बापूजी एकदा सहल करीत असताना एका फोटोग्राफरने त्यांचा फोटो घेतला व त्यावर ‘The Leader Lead’ (खेचला जाणारा नेता) असे एक छानसे नाव देऊन प्रसिद्ध केला. एक लहानसे मूल पूज्य बापूजींची काठी धरून त्यांना पुढे नेत आहे असे ते दृश्य आहे ! सध्याच्या वास्तवस्थितीचे हे एक सुंदर प्रतीकच नव्हे का ? स्वतः बापूजींना आता बालकांच्या मागून जाण्याची – जन्मपूर्व, जन्मोत्तर, शैशव वगैरे अवस्थातून ते सांगेल त्याप्रमाणे वागण्याची इच्छा झाली आहे याचाच अर्थ असा नव्हे का की आता हिंदुस्थानातील अस्मानात बालसाम्राज्य व बालशतक ही सुरू झाली आहेत ? (वर्धा येथे १७ जाने. १९४५ रोजी केलेल्या इंग्रजी भाषणाचे मराठी रूपांतर)

(शिक्षण पत्रिका, वर्ष १३, अंक २-३, फेब्रुवारी-मार्च १९४५)

Share this:
 X Facebook
Loading…
Leave a comment
←Previous: नूतन बाल शिक्षण
ताराबाईंविषयी…
भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.

शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏