सतीश काळसेकर मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे या गावचे. त्यामुळेच त्यांचे आडनाव काळसेकर पडले. वाचन-लेखनाची आवड बालवयापासून जोपासणाऱ्या काळसेकर यांचे शिक्षण कोकण तसेच मुंबई येथे झाले. त्यांनी १९६५ ते २००१ या काळात बॅंकेत नोकरी केली. मात्र, त्यांचा पिंड साहित्यिकाचा होता. त्यांच्या ‘इंद्रियोपनिषद’ या पहिल्याच कवितासंग्रहाने (१९७०) जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर काळसेकर यांनी अविरत लेखन-संपादन- अनुवाद अशा क्षेत्रात मनमुराद मुशाफिरी केली. त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या लेखसंग्रहाला साहित्य अकादमी सन्मानाने गौरवण्यात आले होते. लेनिनवरच्या कविता (अनुवाद आणि संपादन) हेही त्यांचे चर्चेतील कार्य होते.
साक्षात, विलंबित हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. महाश्वेतादेवी तसेच रस्किन बॉॅंड या लेखकांच्या कथांचे अनुवादही त्यांनी केले. मागोवा, फक्त, तापसी, चक्रवर्ती, तात्पर्य, लोकवाड्मयगृह अशा नियतकालिकांसाठी त्यांनी संपादनाचे कार्य केले. साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) चे भारतीय पुरस्कार निवड समितीचे सभासद, निवड समितीचे निमंत्रक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, अशी पदेही त्यांनी भूषवली होती. सोव्हिएट लॅंड नेहरू पारितोषिकाचे ते मानकरी होते. काळसेकर यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, मल्याळम् भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘मी भयंकराच्या दारात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची कविता (संपादन : प्रज्ञा दया पवार यांच्यासह), आयदान : सांस्कृतिक ठेवा - संपादन - सिसिलिया कार्व्हालोंसह) , निवडक अबकडई (संपादन अरुण शेवतेंसह) इत्यादी त्यांची संपादने प्रसिद्ध आहेत. सदरलेखनही त्यांनी आत्मीयतेने केले. लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, कैफी आझमी पुरस्कार, राज्य शासन पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, महाराश्ट्र फाऊंडेशन पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा