वृक्षारोपणाचे महत्त्व
-----------------------------
"झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे "असे आपण ऐकले असेल.या वाक्यातून आपल्याला वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित होते .पर्यावरण संवर्धनात वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचे आहे .झाडांपासून आपल्याला फुले फळे, सावली असे अनेक उपयोग होतात परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो .या ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणतात . झाडामुळे आपले अस्तित्व आहे. झाड आपल्याला जीवन जगण्यासाठी आयुष्यभर मोफत प्राणवायू देण्याचे महत्त्वाचे काम करत असते. या ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते परंतु जे झाड आपल्याला आयुष्यभर मोफतऑक्सिजन देते त्याचे महत्त्व आपल्याला समजले पाहिजे. कोरोनाकाळात अनेक माणसांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले हे आपल्याला माहिती आहे. यासाठी झाडे वाढविणे गरजेचे आहे आणि झाडे वाढविण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. जगातील सर्व संपत्ती एकत्र केली तरी आपण ऑक्सिजन निर्माण करू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही .हा ऑक्सिजन निर्माण करण्याचे महत्वाचे काम फक्त झाडच करू शकते. पर्यावरण संवर्धन ही एक जागतिक समस्या आहे आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आज जागतिक तापमान वाढ होताना दिसत आहे.
या जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम आपण पाहतो. जागतिक तापमान वाढीमुळे अनेक सजीवांना त्रास होतो.म्हणून
ही जागतिक तापमान वाढ रोखण्याचे महत्त्वाचे कार्य झाडे करत असतात . झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते. झाड प्रदूषण रोखण्याचे महत्त्वाचे कार्य करत असते.हवेच्या प्रदूषणामुळे विविध प्रकारचे आजार होत असतात. झाड खूप परोपकारी असते .झाड आपल्या आरोग्यास हानिकारक असलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देण्याचे काम सतत करत असते.म्हणून त्यासाठी आपण वृक्षारोपण करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या लक्षात येते .नुसते वृक्षारोपण करून उपयोग नसतो तर वृक्षारोपणाबरोबर वृक्ष- संवर्धन करणे तितकेच गरजेचे असते. लावलेले झाड वाढले पाहिजे असे आपल्याला वाटते त्यासाठी वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. वड ,पिंपळ ,चिंच ,निंब ,करंज यांसारखी देशी झाडे जास्त ऑक्सिजन देतात म्हणून अशा झाडांचे वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन आपण केले पाहिजे
शाळेत तसेच आपल्या परिसरात वृक्षारोपन करता येईल. प्रत्येक माणसाला जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण तणाव असतो आणि हा ताण तणाव नाहीसा करण्यासाठी माणूस निसर्गात जातो. निसर्गात झाडे असतात
झाडांच्या सानिध्यात आपला ताण तणाव नाहीसा होतो म्हणजे झाड आपल्या अनेक गरजा पूर्ण करण्याचे कार्य करत असते. निसर्ग माणसाशिवाय राहू शकतो परंतु माणूस निसर्गाशिवाय राहू शकत नाही. झाडांच्या सानिध्यात थंड हवा मिळते म्हणून उन्हाळ्यात अनेक पर्यटक पर्यटनासाठी कोकणात जाणे पसंत करतात.कारण तेथे अनेक झाडे असतात .त्यामुळे तेथे थंड हवा असते. झाडांमुळे जमिनीची धूप थांबते , जमिनीची झीज होत नाही .झाडामुळे माती वाहून जात नाही .झाडावर अनेक पशुपक्षी राहतात, अनेक पक्षी झाडावर घरटी बांधतात .झाड पशु पक्षांना आधार देण्याचे कार्य करत असते. म्हणजे झाडामुळे जैव विविधतेचे संरक्षण होते. वृक्षारोपण करण्यासाठी आपल्याला रोपे उपलब्ध होणे गरजेचे असते .त्यासाठी आपल्याला घरच्या घरी रोपवाटिका तयार करता येईल. आपण वर्षभर विविध प्रकारची फळे खातो. फळे खाल्ल्यानंतर त्या बियांचा संग्रह आपण केला पाहिजे .या बियांपासून आपण घरच्या घरी झाडाचे रोप तयार करू शकतो .हे तयार केलेले रोप एकमेकांच्या वाढदिवसाला दिले पाहिजे .शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करताना झाडाचे रोप विद्यार्थ्यांना भेट दिले पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर झाडाचेही वाढदिवस आपण साजरे केले तर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजली जाईल. वृक्षारोपण ही एक व्यापक चळवळ झाली पाहिजे .
चला तर मग झाडे लावू झाडे जगवू,पर्यावरणाचे रक्षण करू .
पर्यावरणाची रक्षा म्हणजे
जीवनाची सुरक्षा .
लेखिका
श्रीमती संजना भगवंत चेमटे
प्राथमिक शिक्षिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर ता
.नगर जि. अहमदनगर
मोबाईल नंबर 9881693382
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा