कोकणपट्टीला विस्तृत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. अरबी समुद्राच्या सानिध्यात असलेल्या या सागर किनाऱ्यावर पूर्वीपासूनच अनेक किल्ले उभारले गेले होते. साधारणपणे शिलाहार राजांच्या काळापासूनच या भागात किल्ल्यांची उभारणी झालेली होती.. याचा इतिहास साक्षीदार आहे. असाच एक खूप बुलंद आणि काळाचे घाव सोसत उभा राहिलेला प्रबळ किल्ला म्हणजेच *विजयदुर्ग उर्फ घेरिया* हा किल्ला होय. त्या काळी मात्र म्हणजे बाराव्या शतकात हा पूर्णपणे चारही बाजूने पाण्याने वेढलेला होता. त्यामुळे तो जलदुर्ग होता. सध्या मात्र याला पूर्णपणे जलदुर्ग म्हणता येत नाही. याचे कारण याच्या तीन बाजूंना समुद्र आणि एका बाजूला जमीन आहे.
बालपणी दोनदा आणि मोठेपणी तीन वेळा हा किल्ला माझ्या पाहण्यात आला. मुख्य म्हणजे या किल्ल्यावर पद भ्रमण करणे म्हणजे एक नितांतसुंदर अनुभव...!!! बाजूला अथांग समुद्र, त्याच्या उसळणाऱ्या लाटा आणि आपण तटबंदीवरून चालत जाताना खरोखरच एक प्रचंड विश्वास विस्मयकारक असा अनुभव हा किल्ला आपल्याला देऊन जातो. खरे तर विजयदुर्ग हे नावच पुरेसे आहे. जो किल्ला विजय देऊन जातो तोच विजयदुर्ग..!!!
आपल्याला कोल्हापूर पासून विजयदुर्गला जायचे असेल तर साधारण पावणेचार ते चार तास एवढा वेळ लागतो.
कोल्हापूर ते विजयदुर्ग हे अंतर १५२ किलोमीटर एवढे आहे. परंतु तुम्हाला माहितीच आहे की विजयदुर्गला जायचे असेल तर आपल्याला करूळ घाटाने म्हणजेच गगनबावडा मार्गे जावे लागेल किंवा फोंडाघाटाने फोंडाघाट पर्यंत आणि तिथून मुंबई महामार्गावर कासार्डे या गावावरून एक फाटा विजयदुर्गला जातो.. त्या रस्त्याने. कोल्हापूर-विजयदुर्ग ही बस देखील आहे. मुंबई येथून विजयदुर्गला थेट एसटी आहे. कोठूनही एसटी बसने गेल्यास आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी उतरता येते. मुख्य म्हणजे येथे फार चढण नाही. पायथ्यापासून वरपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या आपल्याला फारशा दमवत नाहीत.
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागर किनाऱ्यावरील सर्वात जुना किल्ला असून तो शिलाहार वंशातील राजा भोज दुसरा याच्या कारकिर्दीत (बांधकाम कालावधी ११९३-१२०५) बांधला गेला. "गिर्ये" गावाजवळ वसलेला असल्याने हा किल्ला पूर्वी "घेरिया" म्हणून ओळखला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये विजापूरच्या आदिल शहाकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि तत्कालीन हिंदू सौर वर्षाचे नाव "विजय” (विजय) असल्यामुळे त्याचे नाव "विजय दुर्ग" असे ठेवले. पूर्वी किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच एकर ((एक एकर = ४८४० चौरस यार्ड किंवा ४०४७ चौरस मीटर) होते.
पूर्वेकडील प्रत्येकी ३६ मीटर उंचीच्या तीन भिंती बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे क्षेत्रफळ वाढवले. सध्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ सतरा एकर आहे. त्यांनी वीस बुरुजही बांधले.
उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार हा विजयदुर्ग किल्ला त्या दोन मराठा किल्ल्यांपैकी एक आहे जिथे छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वैयक्तिकरित्या स्व हस्ते भगवा ध्वज फडकावला होता. दुसरा किल्ला "तोरणा" आहे.
या विजयदुर्ग किल्ल्यात त्यांनी आपल्या वाढत्या अशा आरमारी सत्तेला पोषक अनेक दुरुस्त्या केल्या, बांधकामे केली आणि या तटीय जलदुर्गाला बेलाग व बुलंद असे सज्ज केले. पेशवाईच्या काळामध्ये आंग्रे व त्यानंतर धुळप या नौदल सरदारांचा हा किल्ला आश्रयस्थान बनला होता. त्याआधी १६९८ मध्ये दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी २५० किलोमीटर लांबीची आणि ५० ते ६० किलोमीटर रुंद असणारी कोकणपट्टी स्वतःच्या ताब्यात आणली व त्याचे मुख्य ठाणे विजयदुर्ग किल्ल्यावर ठेवले. १७१७ सालच्या एप्रिल महिन्यात इंग्रजांनी या किल्ल्यावर आरमारी चढाई केली. परंतु आंग्रे यांनी त्यांचा पूर्ण पाडाव केला. १७२० मध्ये पोर्तुगीज व इंग्रज यांच्या संयुक्त मोहिमेचा देखील आंग्रे यांनी पूर्णपणे धुव्वा उडवला. परंतु या पराक्रमाला गालबोट लागले कारण त्यामध्ये मराठ्यांची सोळा लढाऊ गलबते निकामी झाली. १७२४ मध्ये देखील डच आरमाराला आंग्रे यांनी पिटाळून लावले. सतत विजय मिळवल्यामुळे आंग्रे यांना थोडीशी 'ग' ची बाधा झाली आणि त्यांनी मराठ्यांच्या केंद्र सत्तेला जुमानायचे सोडून दिले. अखेरीस १७५६ या वर्षी पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त मोहिमेसमोर आंग्रे यांच्या आरमाराची पूर्णतः राख रांगोळी झाली. त्यावेळी इंग्रजांना साडेबारा लाख रुपये एवढी लूट मिळाली आणि एक वर्ष हा किल्ला इंग्रजांच्याकडे राहिला. परंतु नंतर १७५७ मध्ये इंग्रजांनी *बाणकोट* या किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्गाचे स्वामित्व पुन्हा पेशव्यांना दिले. त्यावेळी आनंदराव धुळप हे आरमाराचे प्रमुख होते. धुळप यांच्या आरमाराने देखील पाश्चात्य लोकांना स्वतःच्या पराक्रमाचे चुणूक दाखवली. १८१८ यावर्षीच्या जून महिन्यात विजयदुर्ग वरील मराठ्यांची सत्ता इंग्रज लोकांनी संपुष्टात आणली. एकंदरीत विजयदुर्ग या किल्ल्याला प्रचंड मोठा असा ज्वलंत इतिहास आहे.
विजयदुर्ग किल्ल्याला "पूर्व जिब्राल्टर" असे संबोधले जात होते, कारण तो अक्षरशः अभेद्य होता. जवळच असलेली चाळीस किलोमीटर लांबीची वाघोटन नदीची खाडी, जिला *खारेपाटण खाडी* असेही म्हटले जाते, त्या खाडीचा बराच मोठा फायदा या किल्ल्याला मिळालेला होता. या खाडीच्या उथळ पाण्यात मोठी जहाजे जाऊ शकत नाहीत. तसेच मराठा युद्धनौका या खाडीत नांगरल्या जाऊ शकत होत्या आणि तरीही मुख्य समुद्रातून त्या दिसत नव्हत्या.
हा बुलंद किल्ला देवगड तालुक्यात वाघोटन नदीच्या खाडी तीरावर वसलेला आहे. या किल्ल्याला विस्तृत असे क्षेत्रफळ लाभलेले आहे. तसेच या बलाढ्य दुर्गाला तिहेरी तटबंदी लाभलेली असून या तटबंदीवर २७ बुरुज आहेत. विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी १२२ मीटर लांब, तीन मीटर उंच आणि सात मीटर रुंद एवढी आहे. या भक्कम तटबंदी भोवती समुद्राच्या पाण्याचा मारा चुकवण्यासाठी मोठमोठ्या शिळा किंवा मोठे धोंडे रचलेले आहेत. त्यामुळे होते काय की अरबी समुद्राच्या जोरदार लाटांचा मारा थेट तटबंदीवर न होता त्या दगड धोंड्यांवर होतो आणि ह्या दगडांच्या राशीमुळे साधे होडके देखील किल्ल्याच्या तटबंदीला सोबत लगट करण्यास धजावत नाही. तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूला जमीन अशी या किल्ल्याची स्थिती असून या किल्ल्याचे प्रवेशद्वार जरी जमिनीच्या बाजूला असले तरी ते पटकन दिसत नाही. याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग नागमोडी असून वरच्या बुरुजांच्या माऱ्याच्या टप्प्यात असल्यामुळे हा किल्ला अभेद्य बनलेला आहे.
या किल्ल्याला एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. हनुमंत दरवाजा हा किल्ल्याचा पहिला दरवाजा असून यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. त्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर आहे आणि बाजूलाच तोफ आहे.
या तीन प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर किल्ल्यामधील असलेल्या जुन्या वास्तूंची थोडीफार दुरुस्ती करून बनवलेली पोलीस लोकांची वस्ती स्थाने आपल्याला दिसतात. या वाटेवर दोन्ही अंगाला अनेक निकामी असलेले तोफ गोळे पडलेले दिसतात. तसेच तेथून पुढे थोडे अंतर गेल्यानंतर एक दुमजली तसेच सुस्थितीमधील वास्तू आपले लक्ष वेधून घेते. येथे येणाऱ्या दुर्गप्रेमींचे सध्या असलेले ते एकमेव निवासस्थान..!!! या वास्तूचे तळघर मोठे विस्तृत आहे व याच ऐतिहासिक वास्तूवर शासनाचे विश्रामगृह उभारले गेले होते. येथील तळघरांमध्ये पूर्वीच्या काळी कैद्यांना डांबून ठेवत असत. या विश्रामगृहाच्या गच्चीवरून अरबी समुद्राचा अथांग परिसर आपण उत्तमरीत्या पाहू शकतो. या इमारतीच्याच बाजूला एक भला मोठा असा चिरेबंदी जलाशय आहे. परंतु या जलाशयामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी साठत नाही, कारण या जलाशयाची डागडुजी करण्यात आलेली नाही.
तटबंदीवर चढण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी पायऱ्यांचे मार्ग दिसतात. या तटबंदी वरून आपण संपूर्ण दुर्गाला प्रदक्षिणा घालू शकतो.
तटबंदी वरुन खाली उतरल्यावर जखीणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली तोफ़ पाहायला मिळते. या मंदिरा जवळच "साहेबाचे ओटे" आहेत. इ.स. १८ ऑगस्ट १८६८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी परदेशी खगोलशास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला याच ठिकाणी हेलियम वायूचा शोध लागला. या ठिकाणाला सध्या *साहेबांचे ओटे* म्हणून ओळखले जाते. हे सिमेंटचे कट्टे या शास्त्रज्ञाच्या विज्ञान प्रेमाची साक्ष देतात.
हे सर्व पाहून परत तटबंदीवर चढून गडफेरी सुरु केल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन बुरुज पाहायला मिळतात. मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो.
समुद्रापासून ३२ मीटर उंच असलेल्या या बुरुजाला "खुबलढा किंवा बारातोपा बुरुज" या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफगोळे ठेवलेले आहेत. खुबलढा बुरुज पाहुन पुन्हा तटबंदीवर येऊन पुढे गेल्यावर घनची, पान बुरुज पाहायला मिळतात. पुढे एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर *दारुकोठार* अस नाव लिहिलेले दिसते. परंतु तटबंदीला लागुनच दारुकोठार असण्याची शक्यता कमी वाटते. पुढे आपण पुन्हा गोमुखी दरवाजापाशी पोहोचतो. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.
किल्ला व्यवस्थितपणे पाहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात.
किल्ल्याच्या पश्चिमेला पाण्याखाली एक तटबंदी किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेली असून ती ३५० फुट लांब, २०-२२ फुट रुंद असून १५ फुट उंच आहे. ही दगडी तटबंदी १७ व्या शतकात बांधलेली असावी अशी माहिती गोवा नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी आणि वेस्टर्न नेवल कमांड यांच्या १९९१ साली केलेल्या संशोधनातून मिळते. ही तटबंदी ओहोटीच्या वेळेलाही दिसून येत नाही हे तिचे खास वैशिष्ट्य आहे.
खाडीच्या बाजूस एक भुयारी मार्ग आहे परंतु तो आता पूर्णपणे बुजलेला आहे. तसेच याच किल्ल्यावर अनेक तोफा इकडे तिकडे अस्ताव्यस्त अशा पडलेल्या आढळतात. समुद्राकडील बाजूच्या तटबंदीला एक मोठे खिंडार पडलेले असून त्याची दुरुस्ती मात्र जर लवकरात लवकर केली गेली नाही तर या खिंडाराची रुंदी व लांबी वाढत जाईल व अखेर हा बुलंद आणि अभेद्य किल्ला अरबी समुद्राच्या पोटात जायला वेळ लागणार नाही.
किल्ल्यावर सध्या भरपूर झाडी वाढलेली आहे. तरीदेखील आज बऱ्यापैकी सुस्थितीत असणारा हा जलदुर्ग नक्कीच इतिहास प्रेमींना साद घालत आहे. या किल्ल्याविषयी जास्त काही माहिती असल्यास जाणकार लोकांनी ती जरूर येथे शेअर करावी.
या किल्ल्याच्या तटबंदी वरून सर्वत्र फिरताना किल्ला परिसरातील निसर्ग व बाहेरच्या बाजूला अरबी समुद्राचे सौंदर्य पाहणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच. आपण जर समुद्रात जाऊन लॉन्च मधून विजयदुर्ग पाहिला तर त्याचे सौंदर्य खरोखरच एक सागरी किल्ला म्हणून अफलातून असे दिसते...!!! हा सागरी किल्ला फक्त एक किल्ला नाही... तर खरोखरच शिवरायांनी घडवलेली अद्वितीय अशी कलाकृती आहे. जरी मूळ शिलाहार काळात ही कलाकृती घडवलेली असली, तरी देखील तिच्यावरचे सर्व साज हे छत्रपती शिवरायांनी चढवलेले आहेत. आमच्या या महान राजांना खरोखरच मानाचा खूप खूप मुजरा..!!!
छत्रपती शिवरायांचा विजय असो..!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा