1)नवोपक्रम शीर्षक -
"ग्रंथालयाचा ध्यास धरी ,
वाचन संस्कृती विकसीत करी."
प्रास्ताविक-
श्रवण ,भाषण ,वाचन ,लेखन ही भाषा विकासाची कौशल्ये माणसाच्या जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्वाची आहेत.त्यापैकी वाचन कौशल्य अतिशय महत्वाचे आहे.'वाचाल तर वाचाल 'असे आपण अनेकवेळा ऐकले आहे.यामधून आपल्या जीवनात वाचनाला किती महत्व आहे हे समजते.वाचनाने आपल्याला ज्ञान मिळते.वाचन माणसाला चांगला माणूस बनविते.त्यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते.वाचनाने योग्य-अयोग्य याची जाणीव होते.म्हणून 'वाचाल तर वाचाल 'असे आपण म्हणतो.वाचनाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो.वाचनामुळे वाचकावर चांगले संस्कार होऊन योग्य परिवर्तन होते.यामुळे विविध प्रकारच्या योग्य मूल्यांची रुजवणूक होते.आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भावी नागरिक व आधारस्तंभ आहेत. शिक्षणातून देशाचे सुजान नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजने अतिशय महत्वाचे आहे.वाचन हे पुस्तकांचे ,मासिकांचे ,कादंबरीचे ,वर्तमानपत्रांचे असे विविध घटकांचे असते.वाचनातून ज्ञानाबरोबर आनंद मिळतो . त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे गरजेचे असते. वाचनामुळे व्यक्तीला आपले विचार प्रभावीपणे मांडता येतात.कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी वाचन खूप महत्वाचे असते.त्यासाठी बालवयात शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती रुजण्यासाठी या वाचन उपक्रमात मी
' ग्रंथालयाचा ध्यास धरी वाचन संस्कृती विकसीत करी '
या नवोपक्रमाची निवड करून यशस्वीपणे राबविला.
2)नवोपक्रमाची गरज व महत्व -
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020(NEP 2020)नुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता वृद्धी होण्यासाठी समजपूर्वक वाचन करणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणे महत्वाचे आहे.शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित होणे गरजेचे असते.प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांची योग्य जडणघडण होण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे.वाचन ही एक चांगली सवय व छंद आहे.म्हणून वाचनाची आवड लहानपणापासून जोपासली गेली पाहिजे.प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांच्या वाचनाचा पाया पक्का होणे गरजेचे असते.आज संगणकाच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी होताना दिसून येते.त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती विकसित होणे गरजेचे होते. आमच्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांचे विविध बाबींचे वाचन घेतले असता अनेक विद्यार्थ्यांचे वाचनात मन रमत नव्हते.त्यांना वाचनाचा खूप कंटाळा होता.वाचनासाठी पुस्तके हातात धरावीत असे त्यांना वाटत नव्हते.जरी वाचन करण्यास दिले तरी ते मर्यादित स्वरूपाचे वाचन केले जात होते. वाचलेले पुस्तक किंवा पुस्तकातील वाचलेला मजकूर यामधील माहिती सारांश रूपाने सांगता येत नव्हते.विद्यार्थी समजपूर्वक वाचन करत नव्हते.त्यांना वाचनाची आवड नव्हती.त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढलेले नव्हते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. त्यांचा आत्मवविश्वास वाढणे गरजेचे होते.विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला , विचारशक्तीला वाव मिळत नव्हता.त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला व विचारांना चालना मिळून त्यांच्या बुद्धीचा विकास होणे गरजेचे होते.शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आवडीनिवडीची पुस्तके नव्हती.शाळेचे ग्रंथालय समृद्ध नव्हते. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पुरेशा प्रमाणात पुस्तके नव्हती.लोकसहभागातून ग्रंथालयात विद्यार्थ्यांना वाचनासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके घेऊन ग्रंथालय व विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करणे गरजेचे होते. ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागल्यावर आपण अन्न खातो त्याप्रमाणे आपल्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपल्याला वाचनाची गरज असते. म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी पालकांशी सविस्तर चर्चा करून त्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले.म्हणून विद्यार्थ्यांचा अवांतर वाचनाचा पाया पक्का करण्यासाठी " ग्रंथालयाचा ध्यास धरी ,वाचन संस्कृती विकसीत करी "या वाचन उपक्रमाची निवड केली.
आजच्या बदलत्या जगात विद्यार्थ्यांना आनंदाने यशस्वी जीवन जगण्यासाठी वाचनाचा छंद प्राथमिक शिक्षणात जोपासला गेला पाहिजे .वाचनाने समाजात वावरण्याचे ज्ञान आपल्याला मिळते.वाचनाने विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होते.आपण कधीही एकटे नसून पुस्तके आपले मित्र आहेत ही भावना विद्यार्थ्यांमध्ये तयार होणे महत्त्वाचे होते. वाचनाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार होऊन योग्य परिवर्तन होते.संस्काराची शिदोरी वाचनाने मिळते.
उदा-श्यामची आई ही कादंबरी वाचल्यावर विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होतात. ही कादंबरी वाचताना विद्यार्थी तसेच इतर व्यक्ती भावनिक होतात.विविध मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली जातात.विविध प्रकारच्या बोधकथा वाचनाने विद्यार्थ्यांना जीवनातील व्यवहारज्ञान समजते.तसेच जीवनातील ताणतणाव कमी होऊन विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित होते.विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते.नवनवीन गोष्टी शिकायला मिळून जीवनाला एक नवी दिशा मिळते.वाचनाने वाचकांचे आयुष्य बदलू शकते. आपल्याला जीवनाचे ध्येय गाठता येते एवढे सामर्थ्य वाचनात असते.वाचनाने माणसाची , देशाची ,जगाची प्रगती होते.जगात वाचन संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे.वाचनामुळे आपले अनुभवविश्व आणि भावविश्व वाढते. यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनते.वाचनातून उद्याचे लेखक ,कवी ,साहित्यिक,शिक्षणतज्ज्ञ ,विचारवंत निर्माण होतात .वाचनाने आपली प्रगती होते. विद्यार्थी हे राष्ट्राची खरी संपत्ती आहे.त्यांचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास होय. उद्याचे देशाचे सुजान नागरिक निर्माण होऊन त्यांचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजने अतिशय महत्वाचे होते.म्हणून "ग्रंथालयाचा ध्यास धरी ,वाचन संस्कृती विकसित करी" या नवोपक्रमाची निवड करून यशस्वीपणे राबविला.
3)उपक्रमाची उद्दिष्टे-
1)विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे
. 2)विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून व्यक्तिमत्व घडविणे.
3)लोकसहभागातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करुन देने.
4) राष्ट्रहितासाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची रुजवणूक करून योग्य परिवर्तन करणे.
5) विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी वाचन संस्कृती रुजविणे.
4) नवोपक्रमाचे नियोजन -
1)उपक्रम पूर्व स्थितीचे निरीक्षण
-
हा उपक्रम राबविण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे अवांतर वाचनबाबत निरीक्षण करून तपासणी केली असता विविध बाबी त्यांच्यामध्ये आढळून आल्या.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड नव्हती.कोणतेही पुस्तक वाचताना ते समजपूर्वक वाचत नव्हते.वाचन करताना त्यांचे मन वाचनात रमत नव्हते. त्यांना वाचनात गोडी नसायची.वाचनासाठी पुस्तके दिली तरी ते वाचन करत नव्हते.
त्यांचे लक्ष वाचनात टिकत नव्हते.त्यांचे ज्ञान वाढलेले नव्हते.त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता.त्यांना व्यवस्थितपणे भाषण येत नव्हते.त्यामुळे त्याचा परिणाम लेखनावर होत असे .त्यांना आपले विचार लेखनातून मांडता येत नव्हते.त्यामुळे ते भाषण करताना तसेच लेखन करताना आणि बोलताना त्यांच्यमध्ये आत्मविश्वास दिसून येत नव्हता. त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळत नव्हती.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झालेला नव्हता.त्यांच्यात उत्कृष्ट संवाद कौशल्य नव्हते.पुस्तके वाचण्याचे फायदे त्यांना माहिती नव्हते.शाळेच्या ग्रंथालयात पुरेशा प्रमाणात अवांतर वाचनाची पुस्तके नव्हती.ग्रंथालयात जी पुस्तके होती ती विद्यार्थ्यांच्या आवडीची नव्हती.त्यामुळे एखादे पुस्तक जरी त्यांना वाचनासाठी दिले त्यांचे अवधान त्या वाचनात टिकून रहात नव्हते.वर्तमानपत्रे ,मासिके ,इतर पुस्तके वाचनात त्यांना आवड नव्हती.
2)सबंधित व्यक्तींशी ,तज्ज्ञांशी चर्चा -
या वाचन उपक्रमाचे यशस्वीपणे नियोजन करून कार्यवाही करण्यासाठी सहकारी शिक्षकांशी ,पालकांशी ,वरिष्ठ अधिकारी यांचेशी सविस्तर चर्चा केली.त्यांना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.वाचन उपक्रमाची गरज ,महत्व ,उपयुक्तता समजावून दिली.त्यांना हा उपक्रम आवडला त्यांनी यासाठी प्रोत्साहन दिले.
3)आवश्यक साधनांचा विचार -
हा वाचन उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीची पुस्तके हवी होती.ही पुस्तके निवडताना विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधून चर्चा केली . विदयार्थ्यांना त्यांच्या आवडी निवडी जाणून घेतल्या.त्यानुसार पुस्तके यादी निश्चीत केली.त्यानुसार सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांचे मन रमेल अशी लहान लहान चित्रमय पुस्तके ,रंगीत चित्रमय गोष्टींचे कार्ड आणून त्यांना वाचनासाठी उपलब्ध केली. त्यानंतर काठिण्य पातळीनुसार (सोप्याकडून कठीनाकडे)विविध पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी वेळोवेळी उपलब्ध करून दिली.
4)करावयाच्या कृतींचा क्रम -
या उपक्रमासाठी सर्वप्रथम कृती आराखडा तयार करण्यात आला.
त्यासाठी विविध कृतींचा समावेश करून त्यांचा क्रम लावण्यात आला.
या उपक्रमात पूरक वाचनासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची यादी तयार करणे.
पुस्तके वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आठवड्यातून एक दिवस ठरविणे.
त्यादिवशी शाळेत विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारच्या लक्ष वेधून घेतील अशा आकर्षक चित्रमय पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी काठीन्य पातळीनुसार ( सोप्याकडून काठीनाकडे )त्यांच्या आवडीनुसार विविध प्रकारची पुस्तके वेळोवेळी उपलब्ध करून देणे.
पुस्तके प्रदर्शनात पुस्तकांमध्ये विविधता ,नाविन्यता ठेवणे.
शाळेत पुस्तक वाचल्यानंतर घरीही वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी स्वतंत्रपणे ठेवणे.
वाचलेल्या पुस्तकाबाबत विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधून चर्चा करणे.
वाचनातून विद्यार्थ्यांचे अनुभव सांगण्याची संधी उपलब्ध करून देणे.
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या मजकुराबाबत अथवा पुस्तकाबाबत आपले मत व्यक्त करण्यास प्रोत्साहन देणे.
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल जे अनुभव ,प्रतिक्रिया ,मनोगत व्यक्त केले त्याबाबत अभिनंदन करून वाचनासाठी मार्गदर्शन करून प्रेरणा देणे.
वाचनासाठी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार इतर अनेक पुस्तके लोकसहभागातून उपलब्ध करून देणे.त्यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करणे.
विद्यार्थ्यांचा वाढदिवस पुस्तक भेट देवून साजरा करणे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या बदलांचे निरीक्षण करून नोंदी ठेवणे.
विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या बदलाबाबत पालकांशी वेळोवेळी चर्चा करणे.
प्रथम सत्र सुट्टी आणि द्वितीय सत्र सुट्टीत हा वाचन उपक्रम निरंतर पणे चालू ठेवणे.
सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी सुट्टीत विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांच्या घरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या भेटीला ,
ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी असे
उपक्रम राबविणे.
यामध्ये विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देणे.
विविध मासिके ,विविध वर्तमानपत्रे व इतर पुस्तकांचा वाचनात समावेश करणे.
यामध्ये शाळेतील आणि शाळेबाहेरील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेवून घराघरात वाचन संस्कृती विकसीत करणे.
या उपक्रमाबाबत पालकांशी चर्चा करून त्यांचे अनुभव ,प्रतिक्रिया विचारणे.
या उपक्रमास सोशल मिडीयावर प्रसिद्धी देवून वाचनाचे महत्व
पटवून देणे ,
लोकसहभागातून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके मिळविणे.
सुट्टी संपल्यानंतर शाळेत पुन्हा वेळोवेळी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देणे.
लोकसहभागातून मिळविलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवणे.
या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करणे.
तसेच समाजात ,घराघरात वाचन संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी विविध कार्यक्रमात इतर शाळेतील विदयार्थ्यांना वाचनासाठी लोकसहभाग म्हणून विविध प्रकारचे पुस्तके वाटप करणे.
घराघरात वाचन संस्कृती विकसीत होण्यासाठी वाचनाचे महत्व, उपयुक्तता समाजात वेळोवेळी पटवून देवून प्रोत्साहन देणे.
या उपक्रमाचा आणखी प्रसार होण्यासाठी समाजात या उपक्रमास विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी देणे.
लोकसहभागातून मिळविलेल्या पुस्तकांचे वाचन करणे.
वेळोवेळी वाचलेल्या पुस्तकांचे अनुभव सांगणे.
हा उपक्रम निरंतरपणे चालू ठेवणे.
अशा प्रकारे या उपक्रमाची यशस्वीपणे कार्यवाही करण्यासाठी विविध कृतींच्या क्रमांचे लवचिकता ठेवून नियोजन केले.
5) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण -
आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत.हा उपक्रम राबविण्यापूर्वी विदयार्थ्यांना वाचनाची आवड नव्हती परंतु "ग्रंथालयाचा ध्यास धरी वाचन संस्कृती विकसीत करी "हा उपक्रम जुलै 2023 ते जून 2024 या कालावधीत राबविण्यात आल्यावर विद्यार्थ्यांमध्ये इष्ट परिवर्तन झाल्याचे दिसून आले.
त्यांच्या आवडीची पुस्तके त्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.त्यांच्या आवडीची पुस्तके आनंदाने वाचू लागले.वाचलेल्या पुस्तकांची माहिती सांगतात. एक पुस्तक वाचून झाले की दुसरे पुस्तक वाचनासाठी आतुरतेने वाट पाहतात.दिलेले पुस्तक आनंदाने वाचन करतात.वाचलेल्या पुस्तकाचा सारांश स्वतःच्या शब्दात सांगतात.त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला.त्यांना वाचनाचा लळा लागला.त्यांचे ज्ञान समृद्ध झाले.त्यांच्या बुद्धीचा विकास झाला.त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.ते उत्कृष्टपणे भाषण करतात.आपले विचार प्रभावीपणे मांडतात.भाषण आल्यामुळे ते चांगले लेखन करू लागले.वाचनामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले.ते आपल्या आई वडिलांना व इतरांना मदत करू लागले.त्यांच्या विक्तीमत्वाचा विकास झाला.जीवन जगत असताना योग्य अयोग्य याची जाणीव झाली.या उपक्रमामुळे त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी वाचन संस्कृती रुजली.कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांना पुस्तके भेट देतात.या उपक्रमामुळे शाळेच्या ग्रंथालयास विदयार्थ्यांना वाचनासाठी लोकसहभागातून विविध प्रकारची पुस्तके मिळाली.बुके नको बुक द्या ,वाचाल तर वाचाल असे गुण त्यांच्यामध्ये रुजले.
6)कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक )-
या उपक्रमाच्या नियोजनात कार्यवाहीचे टप्पे म्हणजे वेळापत्रक तयार करण्यात आले.या वेळापत्रकाचे
नियोजन पुढीलप्रमाणे केले. केले .शाळेत
या उपक्रमासाठी जुलै 2023 ते जून 2024 हा कालावधी निवडून वर्ग पातळीवर हा उपक्रम राबविण्यासाठी खालीलप्रमाणे नियोजन केले.
जुलै 2023-पालकांशी व सहकारी शिक्षकांशी वाचन उपक्रमाबाबत चर्चा करून त्यांना या उपक्रमाचे महत्व पटवून देने.
अवांतर वाचनाची पुस्तके निवड करणे .
त्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वप्रथम पूरक वाचनासाठी विविध प्रकारची आकर्षक चित्रमय पुस्तके,प्राणी ,पक्षी यांची चित्रमय माहिती पुस्तके, लहान लहान गोष्टीची व इतर माहितीची पुस्तके यादी करणे.
ऑगस्ट -2023-
विद्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.त्यासाठी शाळेत आठवड्यातून एकदा चित्रमय पुस्तके , लहान लहान गोष्टीची विविध कार्ड ,गोष्टींची पुस्तके ,माहितीची पुस्तके अशा विविध पूरक वाचनाच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देणे.अशा विविध पुस्तकांचे वाचन करणे तसेच विद्यार्थ्यांना घरी वाचनासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके देणे.
विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेल्या पुस्तकांच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे.
सप्टेंबर -2023
आठवड्यातून एक दिवस विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करण्यासाठी विविध प्रकारची काठिण्यपातळीनुसार वेगळी पुस्तके उपलब्ध करून देणे.पुस्तक वाचनाच्या नोंदी ठेवणे.
ऑक्टोबर /नोव्हेंबर 2023-
लोकसहभागातून शाळेच्या ग्रंथालयास विविध प्रकारची काठिण्य पातळीनुसार पुस्तके मिळविणे.सोप्याकडून काठीनाकडे अशा क्रमाने पुस्तके वाचनास देने. त्यासाठी अशा विविध पुस्तकांचे आठवड्यातुन एकदा प्रदर्शन भरवून वाचन करणे. तसेच विद्यार्थ्यांना घरी वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.
प्रथम सत्र सुट्टीतही निरंतर वाचन उपक्रम चालू ठेवणे.
यासाठी सुट्टीत विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांच्या घरी आठवड्यातून एकदा "ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी" या उपक्रमात विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून घरातील सर्वांना अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.विविध पुस्तकांचे वाचन करणे.वाचलेल्या पुस्तकांची सारांश रूपाने माहिती सांगण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे.घरी वाचनासाठी काही पुस्तके देने.पुस्तकांच्या नोंदी ठेवणे.
डिसेंबर 2023-
लोकसहभागातून विविध प्रकारची पुस्तके मिळविणे त्यांच्या नोंदी ठेवणे.
शाळेत आठवड्यातून एकदा विविध प्रकारच्या वेगळ्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून वाचन करणे .वाचलेल्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करणे.तसेच विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या बदलांचे निरीक्षण करणे. वाचन केलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवणे.
समाजात वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी या उपक्रमातून प्रसार करून जनजागृती करणे.तसेच इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.
जानेवारी /फेब्रुवारी 2024 -
लोकसहभागातून मिळविलेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांचे आठवड्यातून एकदा प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देने व वाचन करणे .यामध्ये किशोर मासिके ,इतर मासिके ,विविध वर्तमानपत्रे वाचन यांचा समावेश करणे.
वाचलेल्या पुस्तकांबाबत चर्चा करणे.वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवणे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या परिवर्तनाबाबत निरीक्षण करून पालकांशी चर्चा करणे.राज्यातील इतर शाळांना या उपक्रमाचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षक संमेलनात सादरीकरण करणे.
मार्च /एप्रिल 2024-
लोकसहभागातून शाळेच्या ग्रंथालयास विविध नविन प्रकारची पुस्तके मिळविणे व त्यांच्या नोंदी ठेवणे .नवनवीन पुस्तकांचे शाळेत प्रदर्शन भरून व वाचन करणे.यामध्ये किशोर मासिके ,इतर मासिके ,इतर पुस्तके ,विविध वर्तमानपत्रे वाचन यांचा समावेश करणे.वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवणे.या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करणे.
वाचनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये झालेले परिवर्तन पाहणे .विद्यार्थी परिवर्तनबाबत पालकांशी चर्चा करणे.विद्यार्थी परिवर्तनबाबत नोंदी ठेवणे.
मे /जून 2024 -
द्वितीय सत्र सुट्टीमध्येही
निरंतर वाचन उपक्रम चालू ठेवणे. विद्यार्थ्यांचे गट करून उन्हाळ्याच्या सुट्टीतही विद्यार्थ्यांच्या घरी विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून वाचन करणे .या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच मामाच्या गावाला आलेल्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेणे.सर्वांना वाचनासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देणे.यामध्ये किशोर मासिके ,इतर मासिके ,इतर पुस्तके यांचा समावेश करणे.वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवणे. वाचलेल्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करणे.त्यांच्यात झालेले योग्य परिवर्तन पाहणे तसेच याबाबत पालकांशी चर्चा करणे.या उपक्रमाची यशस्वीता तपासणे ,
.हा उपक्रम यापुढेही निरंतर चालू ठेवणे.
7) उपक्रमासाठी इतरांची मदत
- या उपक्रमात अनेकांची मदत व मार्गदर्शन मिळाले.हा उपक्रम राबविण्यासाठी
शाळेतील सहकारी शिक्षक ,पालक ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ,ग्रामस्थ ,केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी,गटशिक्षणाधिकारी ,शिक्षणाधिकारी ,संगमनेर डायटचे प्राचार्य , सर्व अधिव्याख्याता ,समाजातील विवध घटक यांचे सहकार्य ,मार्गदर्शन मिळून मदत झाली.
8)उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे -
या वाचन उपक्रमासाठी उपक्रमासाठी पुढील प्रमाणे पुरावे सादर केले आहेत.
उपक्रमाचे विविध फोटो.
उपक्रमाचे विविध प्रकारचे व्हिडिओ लिंक,
उपक्रमाबाबत विविध माध्यमांच्या बातम्या.
5) नवोपक्रमाची कार्यपद्धती. -
1)पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी. - या नवोपक्रमाची अंमलबजावणी करण्यापूर्वी शाळेत विद्यार्थ्यांचे वाचन घेवून निरीक्षण केले असता त्यामध्ये विविध बाबी ,त्रुटी दिसून आल्या .या बाबींच्या स्वतंत्रपणे नोंदी ठेवल्या आहेत.
विद्यार्थ्यांना वाचन करण्याची आवड नव्हती.त्यामुळे वाचनात त्यांचे मन रमत नव्हते.कोणतेही पुस्तक वाचनासाठी दिले तरी त्यामध्ये त्यांचे अवधान टिकत नव्हते.जे थोडेफार वाचले तरी ते विद्यार्थ्यांच्या ध्यानात राहत नव्हते.याचे कारण म्हणजे त्यांना वाचनाची गोडी नसल्यामुळे ते समजपुर्वक वाचत नव्हते.त्यामुळे वाचलेला घटक ,आशय त्यांच्या लक्षात रहात नव्हता.शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना वाचनासाठी त्यांच्या आवडीची विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध नव्हती.विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढलेले नव्हते.बोलताना किंवा संवाद साधताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसून येत नव्हता.त्यामुळे त्यांना व्यवस्थितपणे भाषण व लेखन येत नव्हते.ते आपले विचार प्रभावीपणे मांडू शकत नव्हते.राष्ट्रहितासाठी योग्य मूल्यांची जोपासना त्यांच्यात झालेली नव्हती. आई वडील व इतरांना शक्य तेवढी मदत करत नव्हते.गुणवत्तेबरोबर संस्कारयुक्त शिक्षण अतिशय महत्वाचे असते.विद्यार्थ्यांमध्ये संस्कारयुक्त शिक्षण पुरेशा प्रमाणात दिसून आले नाही.त्यांच्यमध्ये जबाबदारीची जाणीव कमी प्रमाणात दिसून आली.जीवनात कोणते योग्य, अयोग्य याची जाणीव त्यांच्यात दिसून आली नाही.त्यांच्यात पुरेशा प्रमाणात आत्मविश्वास नव्हता.जगातील घडामोडी वाचनामुळे समजतात त्यामुळे वर्तमानपत्रे वाचनासाठी उपलब्ध करून दिली तरी त्यामध्ये वाचनासाठी विद्यार्थ्यांचे मन रमत नव्हते.त्यांची स्मरणशक्ती वाढलेली नव्हती.त्यांना वाचनाचा कंटाळा होता.त्यामुळे त्यांनी पुस्तकांशी मैत्री केली नव्हती.वाचनाची आवड नसल्यामुळे अनेक बाबींमध्ये त्यांचे मन एकाग्र होत नव्हते.त्यामुळे त्यांचा वाचनाचा पाया पक्का झालेला नव्हता.त्यांच्या कल्पनाशक्तीला व विचारांना चालना मिळत नव्हती त्यामुळे वेगळा विचार करण्याचे मूल्य त्यांच्यात दिसून येत नव्हते.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झालेला दिसून आला नाही.
2)कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन
या उपक्रमाची कार्यवाही दरम्यान विविध बाबींचे निरीक्षण केले त्यांच्या नोंदी सविस्तरपणे ठेवल्या.
या उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी होण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही केली. विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ यांचेशी या वाचन उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. आपल्या जीवनाचा विकास होण्यासाठी जीवनात वाचन किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.म्हणूनच "वाचाल तर वाचाल" असे आपण म्हणतो हे त्यांना समजावून दिले.त्यांनी या वाचन उपक्रमासाठी सहकार्य करून अतिशय चांगला प्रतिसाद दिला.
या उपक्रमासाठी
पुस्तकांची निवड -
पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी त्यांच्या आवडी निवडीनुसार चर्चा केली.तुम्हाला चित्रे आवडतात का ? तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची चित्रे आवडतात? तुम्हाला गीते आवडतात का?तुम्हाला कोणकोणती गीते आवडतात?तुम्हाला गोष्टी आवडतात का?तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात? याबाबत त्यांच्याशी मुक्तपणे, आनंदाने संवाद साधून चर्चा केली. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना चित्रे नेहमी आवडत असतात.यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला अनेक चित्रे ,गाणी ,गोष्टीची पुस्तके आवडतात हे अतिशय आनंदाने सांगितले.त्यासाठी त्यांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देऊन त्यानुसार पुस्तकांची निवड केली.यामध्ये प्रथम प्राणी ,पक्षी ,झाडे ,फुले ,फळे,,, यांविषयीची पूरक वाचनाची चित्रमय पुस्तके आणली.
पुस्तकांचे प्रदर्शन -
शाळेत विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.विद्यार्थ्यांना ही चित्रमय पुस्तके पाहून आवडू लागली. विविध प्रकारची चित्रे पाहून त्यांना या पुस्तकांचे आकर्षण वाटू लागले.त्यांनी आनंदाने ही पुस्तके पाहिली. या पुस्तकात चित्राखाली जाड टाईप मध्ये थोडा मजकूर होता.चित्रे पाहून विद्यार्थी या चित्राखाली असणारा मजकूरही वाचू लागले.या चित्रांबाबत त्यांच्याशी आनंदाने चर्चा केली.त्यांनी या चित्राबाबत माहिती सांगण्याचा प्रयत्न केला.त्यांनी या चित्रांबाबत स्वतःच्या शब्दात थोडक्यात माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनी सांगितलेली माहिती आनंदाने स्वीकारून त्यांचे वेळोवेळी अभिनंदन करून वाचनासाठी प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह आणखी वृद्धिंगत केला.त्यांना घरी वाचनासाठी आठवड्यातून एकदा पुस्तके दिली.यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची लहान लहान चित्रमय गोष्टींची पुस्तके पूरक वाचनासाठी दिली. विद्यार्थ्यांना गोष्टी नेहमी आवडत असतात.या पुस्तकाचे आठवड्यातून एकदा प्रदर्शन भरवून त्यांना वाचनासाठी शाळेत व घरी पुस्तके उपलब्ध करून दिली.विद्यार्थ्यांनी आनंदाने या पुस्तकांचे वाचन केले .वाचन केलेल्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली .त्यांनी या पुस्तकात असलेली माहिती सारांश रूपाने आनंदाने स्वतःच्या शब्दात सांगितली.त्यांचे वेळोवेळी कौतूक करून त्यांना वाचनासाठी आणखी प्रेरणा देऊन प्रोत्साहीत केले. शाळेतून विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेली पुस्तके देवघेव बाबत आणि लोकसहभागातून मिळालेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांच्या शाळेत स्वतंत्रपणे सविस्तर नोंदी ठेवल्या . विद्यार्थी अवांतर वाचनासाठी आनंदाने पुस्तके घेऊन वाचू लागले.त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.पूरक वाचनाकडून विद्यार्थी वाचनाकडे वळू लागले.पुस्तक वाचून झाल्यावर पुन्हा दुसऱ्या पुस्तकाची वाट पाहू लागले.
पुन्हा दुसरे पुस्तक दिल्यावर ते आनंदाने या पुस्तकांचे वाचन करू लागले.
वाचलेल्या पुस्तकातील मजकुर बाबत मुक्तपणे विद्यार्थ्यांशी चर्चा केली.पुस्तकातील मजकूर सारांशरूपाने विद्यार्थी स्वतःच्या शब्दात कथन करू लागले.वाचनासाठी त्यांनी काठिण्यपातळी नुसार ( सोप्या कडून कठीणाकडे) त्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.त्यामध्ये विविध बोधकथा पुस्तके , मासिके ,लहान लहान कादंबरी ,माहिती पुस्तके ,थोरांची ओळख ,सन समारंभ ,पर्यावरण , समन्यज्ञान ,,,,,अशा अनेक इतर पुस्तकांचा समावेश करण्यात आला.
विविध वर्तमानपत्रांचे वाचन -
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्यावर विविध वर्तमानपत्रांचे वाचन करण्यासाठी विविध वर्तमानपत्रे वाचनासाठी उपलब्ध करून दिले.विद्यार्थी आनंदाने अनेक वर्तमानपत्रांचे वाचन करू लागले.जगातील घडामोडी त्यांना समजल्या.या घडामोडी ते इतरांना सांगू लागले.दररोज वाचनासाठी दैनिक वर्तमानपत्रांची आतुरतेने वाट पाहू लागले.जगातील ताज्या घडामोडी ,बातम्या वर्गात व परिपाठमध्ये सांगू लागले.कोणते योग्य अयोग्य ते सांगू लागले.
विद्यार्थी परिवर्तन -
हा उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या बदलांचे निरीक्षण केले.त्यांच्यामध्ये योग्य परिवर्तन होत असल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.वाचनासाठी ते वेळोवेळी पुस्तकांची वाट पाहू लागले.वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी स्वतंत्रपणे ठेवल्या.पुस्तके वाचल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले संस्कार झाले. विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या परिवर्तन बाबत पालकांशी चर्चा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाल्याचे सांगितले.
आई ,वडील आणि इतरांना ते मदत करू लागले.त्यांच्यामध्ये मानवता निर्माण झाली.राष्ट्रहिताच्या कार्यासाठी त्यांच्यात योग्य मूल्यांची रुजवणुक झाल्याचे दिसून आले.त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.वाचलेल्या पुस्तकातून आपण कोणता बोध घेतला पाहिजे हे सांगू लागले.आपले विचार ते प्रभावीपणे मांडू लागले.त्यांछा व्यक्तिमत्व विकास वाढीस लागला.
ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी. -
प्रथम सत्र सुट्टी आणि द्वितीय सत्र सुट्टीत विद्यार्थ्यांच्या सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी हा उपक्रम चालू ठेवला.यावेळी ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी ,पुस्तके विद्यार्थ्यांच्या भेटीला हा उपक्रम राबविला.विद्यार्थ्यांचे गट करून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांच्या घरी विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.विद्यार्थ्यांनी आनंदाने या पुस्तकांचे वाचन केले. या उपक्रमात शाळेतील आणि शाळेबाहेरील विद्यार्थ्यांनाही समाविष्ट केले.त्यांनीही या उपक्रमात कृतिशील सहभाग घेवून विविध पुस्तकांचे वाचन केले.घरोघरी जावून सुट्टीत हा वाचन उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली. या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांशी मुक्तपणे चर्चा केली .वाचलेल्या पुस्तकातील आशय सारांश रुपाने स्वतःच्या शब्दात सांगू लागले.वाचलेल्या पुस्तकातून आपण कोणता बोध घेतला पाहिजे हे सांगू लागले.या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये कोणते परिवर्तन झाले याबाबत पालकांशी संवाद साधला असता त्यांनी अतिशय उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्यात योग्य परिवर्तन झाल्याचे सांगितले.विद्यार्थी आई वडील आणि इतरांना मदत करतात असे सांगितले.त्यामुळे या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार झाल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याचे दिसून आले.
ते उत्कृष्टपणे भाषण व लेखन करू लागले.त्यांचे संवाद व लेखन कौशल्य विकसित झाले.
विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट -
या उपक्रमातून
विद्यार्थ्यांच्या जीवनात कायमस्वरूपी वाचन संस्कृती विकसीत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाचनासाठी पुस्तक भेट दिले. वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट दिल्यामुळे वाचन संस्कृतीचा आणखी प्रसार झाला.विद्यार्थी आनंदाने हे पुस्तक वाचू लागले.तसेच विविध कार्यक्रमात ते एकमेकांना वाचनासाठी पुस्तके भेट देऊ लागले.
घराघरात वाचन संस्कृती -
हा उपक्रम राबविताना विद्यार्थ्याना वाचनासाठी घरी पुस्तके दिली तेव्हा घरातील माणसेही पुस्तके वाचू लागली.घराघरात वाचन संस्कृती रुजली."बुके नको बुक द्या" हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजले.विद्यार्थ्याना खाऊसाठी मिळालेल्या पैशातून वाचनासाठी ते पुस्तके खरेदी करू लागले.
राज्यातील इतर शाळांमध्ये वाचन उपक्रमाबाबत मार्गदर्शन-
या उपक्रमाचा फायदा राज्यातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना होण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण संमेलनात राज्याचे माजी शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर ,
राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे,
राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि राज्यातील शिक्षक बंधू भगिनी यांचेसमोर ठाणे येथील राज्यस्तरीय शिक्षण संमेलनात या वाचन उपक्रमाबाबत सादरीकरण करून सविस्तर मार्गदर्शन केले.राज्यातील शिक्षकांनी या उपक्रमाचे अभिनंदन हा उपक्रम आमच्याही शाळेत आम्ही राबविणार असल्याचे सांगितले.
समाजात वाचन संस्कृती विकसीत होण्यासाठी आणि इतर शाळेतील विदयार्थ्यांना वाचनासाठी मुलीच्या शुभविवाहमध्ये अनेक पुस्तके वाटप -
समाजात वाचन संस्कृतीच प्रसार होऊन वाचन संस्कृती विकसीत होण्यासाठी मुलीच्या शुभविवाहमध्ये दहा शाळांना ग्रंथालयात विद्यार्थ्यांना वाचनासाठी सुमारे एक हजार पुस्तकांचे वाटप राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील सहसंचालक मा.रमाकांत काठमोरे ,राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,
जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अधिकारी अशोक कडुस,
संगमनेर डायटचे अधिकारी व इतर मान्यवरांचे हस्ते केले.त्यांनी वाचनाचे महत्व उपस्थित लोकांना पटवून दिले.या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाबद्दल समाजातील अनेक घटकांनी अभिनंदन केले.त्यामुळे या वाचन उपक्रमाचा समाजात जनजागृती होऊन प्रसार झाला.
लोकसहभागातून शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके -
या उपक्रमास विविध सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिल्यामुळे समाजातील विविध घटकांनी लोकसहभागातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके दिली.शाळेचे ग्रंथालय व विद्यार्थ्यांचे ज्ञान यामुळे समृद्ध झाले.
कायमस्वरूपी वाचन उपक्रम - या उपक्रमाचे फलित अतिशय चांगले मिळाल्यामुळे
हा उपक्रम कायमस्वरूपी राबविला जातो.
आजही हा उपक्रम निरंतर राबविला जातो.
पालकांनी आणि सर्व अधिकारी यांनी या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.
3)उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
-
"ग्रंथालयाचा ध्यास धरी
वाचन संस्कृती विकसीत करी"
हा उपक्रम जुलै 2023 पासून जून 2024 या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल होऊन इष्ट परिवर्तन झाले.या वाचन उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
विद्यार्थी आनंदाने कोणत्याही पुस्तकांचे वाचन करतात.विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांच्या नोंदी स्वतंत्रपणे ठेवून ते वाचलेल्या पुस्तकांबद्दल आपले अनुभव कथन करतात.
वाचलेल्या पुस्तकाचा सारांश स्वतःच्या शब्दात सांगतात.वाचलेल्या पुस्तकातून आपण कोणता बोध घेतला पाहिजे हे समजून त्यांच्यात योग्य संस्कार झाले.कोणतेही पुस्तक ,मासिक ,वर्तमानपत्रे आनंदाने समजपूर्वक वाचन करतात.वाचनामुळे विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्ये विकसित झाले.ते आपले विचार प्रभावीपणे मांडू लागले.तसेच लेखनातूनही प्रभावी विचार लेखन करू लागले.या उपक्रमातून शालेय जीवनात त्यांच्या वाचनाचा पाया भक्कम होण्यास मोठी मदत झाली.शिक्षणातून राष्ट्रहितासाठी सुजान नागरिक निर्माण होण्यासाठी या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.ते एकमेकांना मदत करू लागले.विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमामुळे एक मोठा आत्मविश्वास निर्माण झाला.विद्यार्थ्याना वाचनासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके घरी देण्यात आली.त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर घरातील सर्वांनी या पुस्तकांचे वाचन केले त्यामुळे घराघरात वाचन संस्कृती रुजली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांनी शाळेला लोकसहभागातून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके दिली. त्यामुळे शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांच्या आवडीची विविध पुस्तके मिळून ग्रंथालय समृद्ध झाले.
सतत ग्रंथालयाचा ध्यास धरल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी वाचन संस्कृती रुजली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होऊन त्यांच्यामध्ये मानवता रुजली. कोणत्याही कार्यक्रमात विद्यार्थी एकमेकांना वाचनासाठी पुस्तके भेट देतात.या उपक्रमाचे महत्व पालकांना व विद्यार्थ्यांना समजल्यामुळे हा उपक्रम निरंतर राबविला जातो.विद्यार्थ्याना खाऊ मिळालेल्या पैशातून ते वाचनासाठी पुस्तक खरेदी करतात.त्यामुळे या उपक्रमाचा समाजात जनजागृती होऊन प्रसार झाला.
या उपक्रमाचे राज्यस्तरीय शिक्षण संमेलनात सादरीकरण केल्यामुळे राज्यातील इतर शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यास मदत झाली.
4)कार्यवाही करताना आलेल्या अडचणी -
हा उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके घेण्यासाठी आर्थिक अडचण आली परंतु यावर स्वतः उपाय शोधून स्वतःच्या आर्थिक योगदानातून सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके घेतली.विद्यार्थ्याना ही पुस्तके खूप आवडली त्यांनी आनंदाने ही पुस्तके वाचन केली.विद्यार्थ्यांमध्ये झालेले परिवर्तन पाहून त्याबाबत सोशल मिडीयामध्ये प्रसिद्धी दिल्यामुळे समाजातील विविध घटकांनी लोकसहभागातून अनेक पुस्तकांची मदत केली.त्यामुळे पुस्तकांसाठी आर्थिक अडचण सुटली.
6) नवोपक्रमाची यशस्वीता /फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) -
"ग्रंथालयाचा ध्यास धरी ,
वाचन संस्कृती विकसीत करी ."
हा उपक्रम जुलै 2023 पासून जून 2024 या कालावधीत यशस्वीपणे राबविला.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र इष्ट परिवर्तन झाले .या उपक्रमाची यशस्वीेता /फलनिष्पत्ती पुढील प्रमाणे आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
त्यांच्या विचारक्तीला ,कल्पना शक्तीला चालना मिळाली त्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.त्यांच्या बुद्धीचा विकास झाला.वाचन उपक्रमामुळे विद्यार्थी कोणतेही पुस्तक ,मासिक ,इतर अनेक पुस्तके ,वर्तमानपत्रे नियतकालिके आनंदाने समजपूर्वाक वाचन करतात.त्यामुळे ते प्रभावीपणे आपले विचार मांडतात तसेच आपले विचार परिणामकारकपणे लेखन करतात.त्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषण आणि लेखन कौशल्य विकसित झाले.
त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (FLN)पायाभूत साक्षरता विद्यार्थ्यांमध्ये विकसीत होण्यास मोठी मदत झाली. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला. त्यांच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
वाचन उपक्रमामुळे बालवयात राष्ट्रहितासाठी विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाले.त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. त्यांच्यामध्ये संवेदनशीलता ,सर्जनशीलता , नीटनेटकेपणा ,,राष्ट्रीय एकात्मता ,सहकार्य करणे ,मानवता ,बंधुता ,समता सर्वधर्मसमभाव,अशी अनेक देशहीताची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली.ते एकमेकांना मदत करतात . एकमेकांशी समता ,बंधुता भावनेने आचरण करतात.
या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांनी शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी लोकसहभागातून विविध प्रकारची पुस्तके दिली.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि शाळेचे ग्रंथालय समृद्ध झाले.
विद्यार्थी कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांना वाचनासाठी पुस्तके भेट देतात.खाऊसाठी मिळालेल्या पैशातून वाचनासाठी पुस्तके घेतात. ही पुस्तके आनंदाने वाचन करतात.एक पुस्तक वाचून झाल्यावर दुसऱ्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहतात.विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली आहे.त्यामुळे त्यांच्यात कायमस्वरूपी वाचन संस्कृती रुजली आहे.विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित झाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडले.त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला.
समाजात या उपक्रमाबाबत जनजागृती होऊन प्रसार झाला.
राज्यातील इतर शाळेतील शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षण संमेलनात सादरीकरण करून मार्गदर्शन केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना उपयोग झाला.आजच्या सोशल मिडियाच्या काळात वाचन कमी झाल्याचे दिसून येते परंतु या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तक आले.पालकांना वाचनाचे महत्व समजले .त्यामुळे पालकांना हा उपक्रम खूप आवडला त्यांनी हा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यास सांगितले.
त्यानुसार हा उपक्रम आजही निरंतर राबविला जातो. शाळेतील इतर शिक्षकही हा उपक्रम राबवित आहेत.
7)समारोप. -
या उपक्रमाचे फलित अतिशय चांगले मिळाल्यामुळे समारोप करताना मनस्वी आनंद वाटतो की हा वाचन उपक्रम म्हणजे "ग्रंथालयाचा ध्यास धरी वाचन संस्कृती विकसित करी " कायमस्वरूपी राबविला जातो.विद्यार्थ्याना आणि
पालकांना हा उपक्रम खूप आवडल्यामुळे विद्यार्थीप्रिय , लोकप्रिय उपक्रम ठरला आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.त्यांना वाचनाचा लळा लागला.
वाचनाचा लळा फुलवी जीवनाचा मळा याप्रमाणे विद्यार्थ्यांचा विकास झाला.
त्यांच्यात कायमस्वरूपी वाचनसंस्कृती रुजली आहे.
या वाचन उपक्रमासाठी सहकारी शिक्षक ,पालक ,शाळा व्यवस्थापन समिती, वरिष्ठ अधिकारी , संगमनेर डायट अधिकारी ,समाजातील विवध घटक यांचे सहकार्य व मदत झाली.त्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविता आला.
सर्वांना मनस्वी धन्यवाद.
8) संदर्भ सूची -
या उपक्रमासाठी खालील पुस्तकांचा संदर्भ घेतला.त्यांचा या उपक्रमात मार्गदर्शन म्हणून उपयोग झाला.
1)राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील जीवन शिक्षण मासिके,
2) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे येथील किशोर मासिके,
3)शासनाच्या समग्र शिक्षा विभागाकडून शाळेला मिळालेली पूरक वाचनाची विविध पुस्तके.
9)परिशिष्ट -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा