पर्यावरण संवर्धन व निवारण उपक्रम
-------------------------------------
आज संपूर्ण जगापुढे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण ही एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे . त्यासाठी पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारणबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांना पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात सजीव व निर्जीव या दोन्हीही घटकांचा समावेश होतो.आपण ज्या परिसरात राहतो तेथील पर्यावरण आपल्याला जीवन जगण्यासाठी अनुकूल असणे महत्त्वाचे आहे.हवा ,पाणी ,अन्न या आपल्या व इतर सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत.आपल्या या गरजा परिसरातून पूर्ण होत असतात.या गरजांपैकी एकाचे जरी प्रदूषण झाले तरी आपल्यासह इतर सर्व सजीवांच्या जीवनास धोका निर्माण होतो.म्हणून आपल्याला आणि सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .शाळा हे राष्ट्र व समाजविकासाचे केंद्र आहे.राष्ट्राचे भावी सुजान नागरिक हे शिक्षणातून घडत असतात. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात विविध उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण हे मूल्य रुजने अतिशय महत्वाचे असते.यासाठी शाळेत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणबाबत पुढीलप्रमाणे विविध उपक्रम राबविले जातात.
१) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन -- आपल्या जीवनात झाडांचे खूप महत्वाचे स्थान आहे .सर्वात महत्वाचे म्हणजे झाडे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात.या प्राणवायूचे महत्व आपल्याला कोरोना काळात समजले आहे.म्हणून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण,वृक्षसंवर्धनाचे महत्व सांगून त्यांना वेळोवेळी वृक्षारोपणासाठी शाळेच्या वतीने विविध झाडांची रोपे आम्ही वाटप करतो, त्यांनी ही सर्व रोपे लावून संगोपन केले.
२) विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक वाढदिवस -- शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस पर्यावरणपूरक साजरे केले जातात . विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी झाडाचे रोप भेट दिले जाते.
३)प्रदूषणमुक्त सण समारंभ -
हवा,पाणी अन्न यांपैकी
हवा ही अत्यावश्यक मूलभूत गरज आहे . हवा शुद्ध राहणे गरजेचे आहे . हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याचे महत्व कृतीद्वारे विद्यार्थ्यांना सांगून तशी प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थी वर्षभर प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात .
४) परिसर व क्षेत्रभेट - परिसरातून आपल्या अनेक गरजा पूर्ण होतात.त्यामुळे परिसराची जपणूक करण्यासाठी विद्यार्थ्यांना परिसराची सविस्तर माहिती देवून परिसर व क्षेत्रभेट उपक्रम अनेकवेळा राबविला जातो . त्यासाठी परिसरातील पिके ,नदी ,डोंगर ,शिवार पाहणी यांना भेट देऊन त्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
५) सेंद्रिय परसबाग -अन्न ही एक आपली मूलभूत गरज आहे .आपल्याला प्रदूषणमुक्त अन्न मिळाले पाहिजे.त्यासाठी शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या घराजवळ सेंद्रिय परसबाग निर्मिती करून त्यात विविध प्रकारचा भाजीपाला लागवड करून सेंद्रिय शेतीचे धडे दिले.
६) पाणी व्यवस्थापन - पाणी सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे .म्हणून पाणी व्यवस्थापन हा उपक्रम शाळेत नेहमी राबविला जातो . आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून शुद्ध पाणी पिणे ,पाण्याचा वापर जपून करणे, पाणी झाकून ठेवणे ,पाणी उकळून, गाळून पिणे ,पाणी प्रदूषण करू नये ,पाण्यात कचरा टाकू नये , सांडपाण्यासाठी शोषखड्डे घेणे ,दूषित पाणी ओढ्यात ,नदीत सोडू नये. दूषित पाण्यामुळे विविध आजार होतात म्हणून कधीही पाणी प्रदूषण करू नये .पाणी प्रदूषण थांबिण्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे .
७) गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शन - शाळा ,तालुका पातळीवरील गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थी प्रदूषणविरहित गाव ,शहर , पर्यावरणपूरक पिशव्या ,विविध पर्यावरणपूरक वस्तू निर्मिती करून त्यांचे प्रदर्शन भरविले.त्यामधून याबाबत जनजागृती केली .
८) प्लॅस्टिकमुक्त शाळा व प्लॅस्टिकमुक्त गाव -- विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम कृतीद्वारे सांगितले जातात ,शाळेच्या परिसरातील तसेच गावातील प्लॅस्टिक वेळोवेळी गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते .
९) कचरा व्यवस्थापन -- जेथे स्वच्छता तेथे प्रसन्नता याप्रमाणे पर्यावरणात स्वच्छतेला खूप महत्व आहे ,त्यासाठी शाळेत कचरा व्यवस्थापन केले आहे .ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवला जातो .कचरा कशामुळे होतो हे विद्यार्थ्यांना समजावून दिले .त्यामुळे विद्यार्थी कचरा होऊ देत नाहीत. झाडांचा पाला पाचोळा यांपासून शाळेत तसेच विद्यार्थ्यांच्या घरी सेंद्रिय खत प्रकल्प निर्मिती केली आहे.
१०) शिक्षक पालक आणि माजी विद्यार्थी मेळावा-- शाळेत वेळोवेळी शिक्षक पालक आणि माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला जातो .त्यामध्ये पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण यांविषयी चर्चा करून जनजागृती केली जाते .
११) बाल आनंद मेळावा - बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक पिशव्या ,टोप्या , विविध पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती करून त्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले .
१२)वाचन प्रकल्प - पर्यावरण संवर्धनबाबत अवांतर वाचनाची पुस्तके , वृत्तपत्र व्यवस्था केली आहे. विद्यार्थी पर्यावरण ,प्रदूषण बाबत माहिती वाचन करतात.
१३) व्हि .डी.ओ.कॉन्फरन्स- आपले अनेक भूमिपुत्र परदेशात आहेत. पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारणबाबत परदेशातील भूमीपुत्रांशी तसेच पाठ्यपुस्तकातील विविध लेखकांशी व्ही .सी .द्वारे संवाद साधून विविध बाबींची माहिती मिळवली जाते ,
१४)पर्यावरण संदेश प्रसार --पर्यावरण संवर्धन ,संरक्षण हे कार्य विस्तारित होण्यासाठी शाळेत पर्यावरण संवर्धनासाठी संदेश लेखन प्रसार स्पर्धा हा उपक्रम राबविला.
१५)पक्षांना चारा पाणी -- पक्षी हे पर्यावरण संवर्धनासाठी खूप उपयुक्त असतात.त्यांच्यामुळे बिजप्रसार होवून अनेक ठिकाणी झाडे उगवतात.उन्हाळ्यात त्यांना अन्न,पाणी मिळणे अवघड असते म्हणून उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ ,घराच्या छतावर मातीच्या भांड्यात पक्षांना चारा पाणी ठेवतात.
१६)वृक्ष दिंडी - वृक्षारोपण व वृक्षंवर्धनसाठी गावातून वृक्षदिंडी काढून जनजागृती केली.
१७)निसर्ग सहल -- निसर्ग सहलीमधून विविध निसर्गस्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांची जपणूक करण्याचे महत्व प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले जाते.
तसेच पाठ्य पुस्तकातील विविध पाठ व कविता यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाले .
लेखिका
श्रीमती संजना भगवंत चेमटे
उपाध्यापिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर
ता. जि. अहिल्यानगर
मो.7588168948
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा