मला भावलेले मराठी कवी, लेखक - साने गुरुजी
महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाने महान ठरलेल्या अनेकांचे जीवनचरित्र आपणास पहावयास मिळतात. त्यांपैकी एक महान मराठी कवी, लेखक, आदर्श शिक्षक, समाजसुधारक, समाजसेवक, देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक म्हणून सानेगुरुजी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. `खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे` हा परमपुज्य साने गुरुजींनी आपल्या कवितेतून जगाला दिलेला अनमोल संदेश आहे. आज संपूर्ण जगाला कशाची गरज आहे याचा विचार आपण केला तर सानेगुरुजींच्या विचारांची खूप गरज आहे. साने गुरुजींनी दिलेला संदेश जेव्हा जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजेल तेव्हा हे जग खऱ्या अर्थाने सुंदर व सुरक्षित असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. परंतु त्यांची ओळख आपल्याला साने गुरुजी या नावाने परिचित आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. महात्मा गांधींपासून त्यांनी प्रेरणा घेतली व आपले सर्व जीवन देशसेवेसाठी अर्पण केले. आपल्या कवितेतून, लेखनातून त्यांनी समाजपरिवर्तन व जनजागृती केली. आज जगाला शांततेची व प्रेमाची गरज आहे. सर्व जगाला आपल्या कवितेतून साने गुरुजी सांगतात की, दुसऱ्यावर निस्वार्थी प्रेम करणे हा आपला सर्वात मोठा धर्म आहे. सर्वजण प्रेमाने वागू लागले तर, जगातील अशांतता, युद्ध, हिंसा, द्वेष, तिरस्कार आपोआप नाहीसा होईल. प्रत्येकाला एकमेकांचा आधार वाटेल त्यासाठी मुलांवर बालवयात योग्य संस्कार होण्यासाठी साने गुरुजींनी लेखन केलेली “श्यामची आई” ही कादंबरी समाजप्रिय झाली. देशाचे सुजाण नागरिक तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांवर योग्यप्रकारे जडण-घडण होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची योग्य जडणघडण व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी साने गुरुजींची “श्यामची आई” ही कादंबरी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.
आज विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना तितकेच संस्कारयुक्त शिक्षण देणे गरजेचे आहे. हे संस्कारयुक्त शिक्षण साने गुरुजींच्या कवितेतून, कादंबरीतून, लेखनातून वाचकांना मिळते. मुले म्हणजे देव, मुले म्हणजे राष्ट्राची ठेव, मुले म्हणजे फुले असे त्यांना वाटत होते. लहान मुलांसाठी मार्गदर्शक व प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टींच्या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. आपले सर्व प्रकारचे लेखन त्यांनी समाजासाठी अर्पित केले. निष्पाप, निर्मळ मुलांमध्ये ते मुल होऊन जीवन जगले. देशभक्तीच्या, राष्ट्रपुरुषांच्या, विश्वबंधुत्वाच्या, एकतेच्या, समतेच्या अशा अनेक कवितांचे त्यांनी लेखन करून समाजाला देशभक्तीचा, समाजसेवेचा, मांगल्याचा निस्वार्थीपणाचा सद्गुणांचा संदेश दिला. “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो” या कवितेतून साने गुरुजींनी आपल्या भारत देशासाठी आपण काय केले पाहिजे याचे सुंदर वर्णन केलेले आहे. या कवितेतून वाचकांच्या मनामध्ये देशभक्ती, देशप्रेम निर्माण होते. समता, समृद्धीवर आधारलेला कष्ट करणारा, जाती-धर्म भेदभाव विसरून एकजुटीने राहणारा, बलसागर भारत त्यांना अपेक्षित होता. साने गुरुजींची आई यशोदा यांनी त्यांच्यावर बालपणापासून चांगले संस्कार केले. त्यामुळे त्यांची संस्कारयुक्त जडण-घडण झाली. संस्काराचे बाळकडू त्यांना आपल्या आईकडून मिळाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये समाजहिताचे मूल्य रुजले. त्यांनी समाजासाठी आपले आयुष्य वेचले. आईला ते सर्वस्व मानीत असत. कारण त्यांच्या बालमनावर आईने सुसंस्कार केले. हे सुसंस्कार जीवन जगताना समाजाच्या हितासाठी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले. आईने श्यामवर म्हणजे साने गुरुजींवर चांगले संस्कार करून समाज हितासाठी त्यांना मोठे केले. तर साने गुरुजींनी आपल्या आईविषयी “श्यामची आई” ही कादंबरी लेखन करून जगात आईला मोठे केले. ही कादंबरी लिहिताना त्यांना गहिवरून आले होते. ही कादंबरी वाचताना वाचकांच्या डोळ्यात पाणी येते. वाचताना प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येते. त्यामुळे या कादंबरीतील श्यामची आई ही श्यामपुरती मर्यादित न राहता संपूर्ण जगाची आई होते. एवढी ही महान कादंबरी साने गुरुजी यांनी लिहिली. या कादंबरीत साने गुरुजी म्हणतात, “माझ्यात जे काही चांगले आहे ते सर्व माझ्या आईचे आहे”. आई माझा गुरु, आई कल्पतरु, तिने मला सारे काही दिले. मला प्रेमळपणाने बघायला, बोलायला आणि प्रेमळपणाने वागायला शिकविले. माणसांवर, प्राण्यांवर, पक्षांवर फुलपाखरांवर, झाडांवर, निसर्गावर प्रेम करायला आईने मला शिकविले. पर्यावरण संवर्धनाचे, राष्ट्रहिताचे संस्कार त्या माऊलीने त्या काळी केले. आजही या संस्कारांची समाजाला गरज आहे. प्रत्येक बालकांमध्ये हे संस्कार होणे आजही महत्त्वाचे आहे. म्हणून घराघरात श्यामची आई निर्माण झाली पाहिजे असे मला वाटते. सानेगुरुजी म्हणतात देशप्रेमाची ज्योत माझ्यात आईने निर्माण केली. “श्यामची आई” या कादंबरीत एका प्रसंगात ते म्हणतात, “एकदा आईने मला पूजेसाठी फुले आणायला सांगितली. ही फुले तोडताना माझ्या पायाला धूळ लागली. फुले आणल्यावर मी आईला म्हणालो, आई ही घे फुले पण माझ्या पायाला धूळ लागली आहे. ती पुसायला काहीतरी खाली टाक. तेव्हा आईने तिच्या साडीचा पदर खाली अंथरला. मी त्या पदराला माझे पाय चांगले पुसले. तेव्हा आई म्हणाली श्याम तू पायाला घाण लागू नये म्हणून, जसा जपतोस तशी तुझ्या मनालाही कधीही घाण लागू देऊ नको. मनालाही जप.” आईच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सुसंस्कार दडलेले होते. श्यामची आई या कादंबरीत साने गुरुजींनी वाचकांचे अंतःकरण हेलावून सोडेल असे लेखन केले. या कादंबरीविषयी ते म्हणतात, “हृदयातील सारा जिव्हाळा यामध्ये ओतलेला आहे”. नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसा काम करावे व रात्री जन्मदात्री मातेच्या विचारात रमून जावे. साने गुरुजींनी लेखन केलेली श्यामची आई ही साऱ्या महाराष्ट्राची आई बनली. या कादंबरीविषयी आचार्य अत्रे म्हणतात, “ज्ञानेश्वरीप्रमाणेच श्यामची आई ही मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे.” अमळनेर येथे त्यांनी शिक्षकाच्या कामाला आवडीने सुरुवात केली. माणसाचे जीवन शिक्षणरुपी संस्काराने सुखी व समृद्ध होते. निरोगी आणि निकोप मने तयार व्हावीत, जीवनसंघर्षाला धाडसाने तोंड देता यावे, अस्मितेची जाणीव निर्माण व्हावी. प्रेम, त्याग, वात्सल्य या मूल्यांची शिकवण व्हावी, म्हणून साने गुरुजींनी अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेमाने जवळ घेतले. त्यांना खूप जीव लावले. विद्यार्थी आजारी पडले तर साने गुरुजी त्यांची सेवा करत. मुलांना चांगल्या गोष्टी सांगत. गुरुजींनी मुलांसाठी खूप उत्कृष्ट लेखन केले.
“करील मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभुशी तयाचे”
अशी सानेगुरुजींची भावना होती. त्यांनी गोड गोष्टी, धडपडणारी मुले, बापूजींच्या गोडगोष्टी, तीन मुले अशा अनेक बालसाहित्याचे उत्कृष्ट लेखन केले. मुलांना चांगल्या गोष्टी सांगून त्यांचे अवधान टिकवून, मन रमून ठेवण्याची कला त्यांच्यामध्ये होती. अपार कष्ट, स्वच्छता, टापटीप, उत्कृष्ट अध्यापन यामुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. त्यांनी मुलांना चांगल्या सवयी लावल्या होत्या. मुले खेळाच्या मैदानावर गेली की सानेगुरुजी प्रत्येक खोलीत जाऊन विस्कळीत पडलेले त्या खोलीतील साहित्य व्यवस्थितपणे ठेवत असत. कंदिलाची काच पुसत असत. भांडीकुंडी स्वच्छ धूत असत. मळालेले कपडे धुऊन स्वच्छ करत असत. ते पाहून विद्यार्थ्यांना आपली चूक लक्षात येई. साने गुरुजींनी आपल्या कृतीतून कार्याचा आदर्श निर्माण केला. म्हणजे आईच्या मायेने ते मुलांशी वागत असत.
“मी फुल तु फुलविणारा कुशाग्र माळी,
मी मुल तूच जननी कुरवाळे पाळी”
या कवितेतून छात्रालयातील विद्यार्थ्यांचे मनोगत आढळते. अमळनेर येथील छात्रालयाभोवती खूप अडचण होती. परंतु गुरुजींनी छात्रालयाभोवती मुलांच्या मदतीने सुंदर बाग निर्माण केली. पर्यावरण संवर्धन हे राष्ट्र हिताचे मूल्य त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविले. शाळेत ते विविध उपक्रम राबवित असत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रहिताचे संस्कार झाले. त्यांनी हस्तलिखित छात्रालय दैनिक सुरू केले. हे दैनिक नियमितपणे शोकेसमध्ये लावत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विश्वदर्शन होत असे. ते आवडीने या दैनिकाची वाट पाहत असत. विद्यार्थी आपल्यातील वाईट गुण सोडून देत असत. या दैनिकातील चांगले संस्कार व विचार घेऊन विद्यार्थी आपल्या भावी जीवनाचे व्यक्तिमत्व घडवीत होते. देशप्रेम, देशभक्ती आणि चित्रकला, खेळ, संगीत या बाबींचा या दैनिकात समावेश होता. खरा धर्म साने गुरुजींनी या दैनिकातून विद्यार्थ्यांना शिकविला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानवता निर्माण झाली. मुक्तशिक्षणाचे ते खरे पुरस्कर्ते होते.
मुलांना चार भिंतीच्या आत शिक्षण न देता त्यांना मुक्त वातावरणात व निसर्गात शिक्षण दिले पाहिजे असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात व निसर्गात नेऊन शिक्षण दिले. त्यांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यवहारीक शिक्षणावर भर दिला होता. ते एक आदर्श शिक्षक होते. मायलेकरांच्या प्रेमाच्या, संस्काराच्या कितीतरी गोड आणि हृदयस्पर्शी गोष्टी श्यामच्या आईमध्ये त्यांनी लेखन केल्या आहेत. आईच्या साध्या साध्या बोलण्यातून श्यामवर संस्कार होत गेले आणि श्याम घडत गेला. आईचे पाहून कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी अनेक कामे श्याम शिकला. आईच्या मृत्यूबद्दल सानेगुरुजी म्हणतात, “माझ्या जीवनातील प्रकाश गेला. माझी आई गेली. परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली”. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपला शिक्षकीपेशा सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. त्यांनी देशासाठी तुरुंगवास, कष्ट, हाल सोसले. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी उपोषण केले. प्रेमाचा व एकतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी आंतरभारतीची स्थापना केली. मनुष्य एक वेळ अन्नावाचून जिवंत राहील पण प्रेमाशिवाय तो जिवंत राहू शकत नाही असे त्यांना वाटत होते. प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात फार मोठा आनंद असतो असे ते म्हणत. त्यांना भारतीय संस्कृतीविषयी खूप आदर होता. याविषयीचे वर्णन त्यांनी आपल्या भारतीय संस्कृती या पुस्तकात केले आहे. त्यांना जातिभेद, धर्मभेद मान्य नव्हता. साने गुरुजींची सुंदर पत्रे वाचताना धर्माची सुंदर कल्पना त्यांनी सांगितली आहे. आपण पत्र लेखन करतो त्या पत्रावर जर आपण सुंदर अक्षरात संपूर्ण पत्ता लिहिला तर, आपण पोस्टमनबाबतचा धर्म निश्चितपणे पाळला असे म्हणता येईल. धर्माची व्याख्या त्यांनी सहज व सोपी सांगितली आहे. हे आपल्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. कारण अनेकवेळा पत्रव्यवहार करताना आपण पत्ता पूर्ण दिलेला नसेल तर पोस्टमनला ते पत्र देण्याबाबत अडचण येते. म्हणून साने गुरुजींनी मांडलेले विचार खूप अनमोल आहेत. धर्माचे हे बाळकडू त्यांना आपल्या आईकडून मिळाले. धर्माची व्याख्या त्यांना आपल्या आईने विविध प्रसंगातून समजावून दिली.
म्हणून साने गुरुजींनी लेखन केलेली “श्यामची आई” ही कादंबरी वाचनाचा उपक्रम आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर या शाळेत उत्कृष्टपणे राबविला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर संस्कारयुक्त शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यासाठी आम्हाला श्यामची आई या कादंबरीचा फार मोठा उपयोग झाला. दररोज शाळेत परिपाठ संपल्यानंतर श्यामची आई या कादंबरीचे वाचन घेतले. या उपक्रमात सुरुवातीला साने गुरुजींचा परिचय सर्व विद्यार्थ्यांना करून दिला. त्यानंतर त्यांनी लेखन केलेल्या श्यामची आई या कादंबरीचा परिचय करून दिला. दररोज या कादंबरीतील एका रात्रीचे वाचन करून घेतले. हे वाचन चालू असताना विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकले. या कादंबरीचे वाचन जसजसे पुढे जात होते, तसतसे विद्यार्थी त्या कादंबरीशी एकरूप झाले होते. आईने श्यामवर विविध प्रसंगातून केलेले सुसंस्कार वाचताना सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनाही गहिवरून आले. मातृप्रेमाच्या या स्त्रोतात आमच्या शाळेतील विद्यार्थी आकंठ बुडाले होते. दररोज वाचन संपल्यावर याबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली. या प्रसंगातून आपण काय शिकले पाहिजे, आपण कोणता बोध घेतला पाहिजे, यामधून आपण कोणते गुण घेतले पाहिजे याबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली उत्तरे दिली. त्यांना ही कादंबरी खूप आवडली. या उपक्रमात पूर्ण कादंबरी वाचनात विद्यार्थी समरस झाले होते. या कादंबरीतील प्रत्येक प्रसंगाच्या वाचनाचा या बालमनावर चांगले संस्कार होण्यासाठी आम्हाला खूप उपयोग झाला. आमच्या शाळेतील वातावरण बदलून गेले. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील वाईट गुण सोडून दिले. आणि त्यांची योग्य जडणघडण होण्यासाठी या कादंबरीतील सुसंस्कार त्यांच्यावर झाले. शाळेतील विद्यार्थी आई-वडिलांना कामात मदत करू लागले. सर्व लहान थोरांचा ते आदर करू लागले. सर्वांना मदत करू लागले. त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती विकसित झाली. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, वक्तशीरपणा स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन, निसर्गाचे रक्षण, आत्मीयता, एकमेकांबद्दल प्रेमाची भावना, सत्य, अहिंसा, एकमेकांचा आदर करणे, श्रमप्रतिष्ठा, समाजसेवा, नीटनेटकेपणा, धाडसीपणा, प्राणीमात्रांविषयी दया करणे, परोपकार, एकाग्रता, नम्रता, देशभक्ती, देशप्रेम, अभ्यासूवृत्ती, लेखनकला असे अनेक गुण श्यामची आई या कादंबरीच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये रुजले. साने गुरुजींच्या आईस शंभर वर्षे होऊन गेली आहेत, तरीही या माऊलीने केलेले संस्कार आजच्या पिढीला अत्यंत मार्गदर्शक ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या वर्तनात या उपक्रमामुळे अतिशय चांगला बदल झाला. हे सर्व पालकांनी आम्हाला सांगितले. शाळेतील वातावरण बदलल्यामुळे त्यांच्या घरातही सुसंस्कार होऊन घरातील वातावरण बदलले. हे सर्व साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीमुळे घडले. पालकांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले. सदाचार, शिस्त, धडाडी, धडपड, निसर्गप्रेमी, महान कर्मयोगी, पीडितांना मदत, निस्वार्थी सेवा, देशप्रेम, देशभक्ती, प्रेमळ स्वभाव अशा अनेक सुसंस्कृत गुणांमुळे आज देखील साने गुरुजी हवेहवेसे वाटतात. ते एक महामानव होते. सामाजिक व राष्ट्रपुरुष म्हणून ते आपल्या महाराष्ट्राला आणि भारत देशाला भूषणावह दीपस्तंभासारखे आहेत. म्हणून ते मला खूप भावले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा