उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांच्या वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजली
अहमदनगर-नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका या आपल्या वर्गात राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती रुजली आहे.उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे या राबवित असलेल्या वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला ,त्यांना चांगले भाषण व लेखन येऊ लागले.श्रवण ,भाषण ,वाचन ,लेखन ही भाषा विकासाची कौशल्य आहेत .ही कौशल्य विकसित होणे अतिशय महत्वाचे असते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्य वाढीस लागली. वाचन उपक्रमामुळे कोणत्याही विषयावर विद्यार्थी आपले विचार प्रभावीपणे मांडतात.तसेच विद्यार्थी आपले विचार लेखणीद्वारे प्रभावीपणे लेखन करतात.वाचन किती महत्वाचे हे विद्यार्थ्यांना समजले.वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो.वाचनामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या .वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाले असे सर्व पालकही सांगतात.
या वाचन उपक्रमासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके निवडून ती त्यांना वाचनासाठी दिली.चित्रमय पुस्तके ,गोष्टीची पुस्तके ,प्राणी पक्षी यांविषयी माहिती पुस्तके अशा छोट्या छोट्या पुस्तकांचा वापर केला. त्यानंतर त्यापेक्षा मोठी पुस्तके विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीनुसार वाचनास दिली.किशोर मासिकाची वर्गणी स्वतः भरली. ही मासिके विद्यार्थ्यांना वाचनास दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली.आठवड्यातून एकदा वर्गात विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून त्यांना विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली.विद्यार्थी आनंदाने ही पुस्तके वाचू लागली. मग लोकसहभागातून अनेक पुस्तके मिळविली त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके वाचनास उपलब्ध झाली. विद्यार्थी वाचलेल्या पुस्तकातील सारांश सांगतात.आपण या पुस्तकातून कोणता बोध घेतला पाहिजे हे सांगतात.या वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या घरातील इतर माणसेही पुस्तके वाचू लागली त्यामुळे घराघरात वाचन संस्कृती रुजली आहे.हा वाचन उपक्रम निरंतर राबविला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा