महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार तुकाराम अडसूळ यांना प्रदान
जिल्हा परिषदेत शाळेत राबविलेल्या शैक्षणिक कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अडसूळ यांना राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या स्वाक्षरी असलेला पुरस्कार देण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आमदार कपिल पाटील, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तुकाराम अडसूळ हे पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी आणि नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषद शाळेत उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य करून लोकसहभागातून शाळेत मोठे परिवर्तन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. तसेच लोकसहभागातून गितेवाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा निर्माण केल्या. शाळेत संगणक, एलईडी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळा दुरुस्ती, शाळा पेंटिंग, डिजिटल शाळा व ई लर्निंग सुविधा निर्माण करुन विविध खेळांचे साहित्य मिळविले. शाळेत लोकसहभागातून सुसज्ज वाचनालय सुरू केले. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारचे ऑनलाइन आणि विद्यार्थी गृहभेटीद्वरे ऑफलाइन शिक्षण दिले. ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आणि घराघरात वाचन संस्कृती रुजविली.
तर लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रमातून पाठ्यपुस्तकातील लेखकांचे विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवली. त्यामुळे जिल्हा परिषदेत शाळेत विद्यार्थी पटसंख्या वाढली. त्यांनी काम केलेल्या जिल्हा परिषद शाळा उपक्रमशील उपक्रमातून आदर्श शाळा म्हणून घडवली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण संमेलन आणि पर्यावरण संमेलन आयोजनात कृतिशील सहभाग घेवून राज्यातील शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित कार्यपुस्तिका निर्मितीसाठी शासनाने त्यांची निवड केली होती. आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत त्यांनी शोधनिबंधाचे उत्कृष्ट सादरीकरण केले होते. मागील वर्षी त्यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा पुरस्कार देखील मिळाला होता. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गीतेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे, उपसरपंच राजेंद्र गीते, विष्णू गीते, नवनाथ आंधळे आदी कार्यक्रमाला हजर होते. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी...................
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा