अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभागाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला.राज्यातील शिक्षकांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून प्राथमिक विभागातून उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांची निवड करण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या स्वाक्षरीने हा पुरस्कार देण्यात आला आहे.राज्याचे पर्यटन ,कौशल्य विकास विभाग ,महिला व बालकल्याण या विभागाचे मंत्री ना.मंगलप्रभात लोढा ,राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,आमदार कपिल पाटील ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर ,राज्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी ,माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांचे हस्ते मुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून संवाद साधून राज्यातील पुरस्कार्थी शिक्षकांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले.शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आपल्या संदेशद्वारे शिक्षकांच्या कार्याचे अभिनंदन केले.तुकाराम अडसूळ यांनी पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषद शाळेत उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य करून लोकसहभागातून या शाळेत परिवर्तन केले.त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले.त्यांनी
लोकसहभागातून गितेवाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा निर्माण केल्या .शाळेत संगणक ,एलईडी ,पिण्याच्या पाण्याची सुविधा , शाळा दुरुस्ती,स्वच्छतागृह ,रेन वॉटर हार्वेस्टिंग , शाळा पेंटिंग ,शाळा डिजिटल ,शाळा ई लर्निंग तसेच बेंचेस, विविध खेळांचे साहित्य मिळविले .शाळेत लोकसहभागातून सुसज्ज वाचनालय सुरू केले. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारचे ऑनलाइन आणि विद्यार्थी गृहभेटीद्वरे ऑफलाइन शिक्षण दिले. कोरोनाकाळात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्कृष्टपणे चालू ठेवले . ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आणि घराघरात वाचन संस्कृती रुजविली.शाळेत कायमस्वरुपी वाचन उपक्रम राबविला जातो. व्हिडीओ कॉन्फरन्स उपक्रमातून त्यांनी विद्यार्थ्यांना जगाची ओळख करून दिली .लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रमातून पाठ्यपुस्तकातील लेखकांचे विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणले. शाळेची विद्यार्थी पटसंख्या वाढली .शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढली.अध्ययन अध्यापनात संगणक, एल.ई.डी ,विविध प्रकारचेॲप असे अनेक ई साहित्य व आय.सी.टी .तंत्रज्ञानाचा नेहमी आनंददायी पद्धतीने वापर केला.
,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी तुकाराम अडसूळ यांनी मार्गदर्शन केले. शाळेत पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा नवीन उपक्रम राबवून शिक्षणाला पूरक असे आनंददायी वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले. राज्यस्तरावर शासनाच्या शिकू आनंदे, शाळा स्वच्छता कृती आराखडा मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट काम केले .कोरोना काळात विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी शाळेतील आणि राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण संमेलन आणि पर्यावरण संमेलन आयोजनात कृतिशील सहभाग घेवून राज्यातील शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित कार्यपुस्तिका निर्मितीसाठी शासनाने त्यांची निवड केली होती.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांनी पाठयपुस्तक मंडळाला सादर केलेल्या नवोपक्रमाचा राज्यात दुसरा क्रमांक आला होता.आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत त्यांनी शोधनिबंधाचे उत्कृष्ट सादरीकरण केले होते.त्यांना मागील वर्षी जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या कार्याची राज्य पातळीवर दखल घेऊन त्यांना शासनाने राज्य पुरस्कार प्रदान केला.या पुरस्कार प्रदान सोहळ्यास गीतेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे ,उपसरपंच राजेंद्र गीते ,विष्णू गीते ,नवनाथ आंधळे उपस्थित होते.या पुरस्कार बद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा