निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने राळेगणसिद्धी येथे आयोजित केलेल्या पर्यावरण संमेलन २०२१ निमित्त राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पर्यावरणरत्न पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना नुकताच दसऱ्याच्या (विजयादशमीच्या )दिवशी राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे आणि निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी गावाच्या लोकसहभागातून नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर (बा )आणि पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी या शाळांचा कायापालट करून पर्यावरण पूरक आदर्श शाळा निर्माण केल्या. शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून शिक्षणाला पूरक आनंददायी निसर्गरम्य वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्ये रुजविले .तसेच इतर शाळेत व समाजात विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण बाबत योग्य मार्गदर्शन करून जनजागृती केली. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजनासाठी वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे ,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांचे समवेत परिश्रम घेवून
पर्यावरण संमेलनात राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करून जनजागृती केली. गावातील लोकांमध्येही पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण बाबत जनजागृती केली .तसेच सन २०१९ मध्ये त्यांची राष्ट्रीय पातळीवर सी.सी.आर.टी प्रशिक्षणासाठी नवी दिल्ली येथे त्यांची निवड झाली होती. त्यावेळी या प्रशिक्षणात त्यांनी गुजरात ,कर्नाटक, तामिळनाडू ,मिझोराम ,अरुणाचल प्रदेश ,महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातील शिक्षकांना पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण बाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली. तसेच सन २०१८ मध्ये भूतान देशातील जागतिक पर्यावरण अभ्यास दौऱ्यात कृतिशील सहभाग घेऊन भूतान देशातील भारतीय दूतावास मध्ये राष्ट्रहितासाठी पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण बाबत प्रेझेंटेशन केले . बारामती येथील राज्यस्तरीय पर्यावरण अभ्यास व पर्यावरण परिषदेत कृतिशील सहभाग घेवून राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेत सेंद्रिय परसबाग , सेंद्रिय खत प्रकल्प , रेन वॉटर हार्वेस्टिंग याची निर्मिती केली. हवा पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजांचे प्रदूषण थांबविण्याचे मूल्य विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविले .त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात.शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा नवोपक्रम यशस्वीपणे राबविला.शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत तुकाराम अडसूळ यांच्या नवोपक्रमाचा राज्यात दुसरा क्रमांक आला होता.पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण बाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पर्यावरणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.याबद्दल त्यांचे विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा