उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी गितेवाडी शाळेत राबविला ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी नवोपक्रम
अहमदनगर -- पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. सध्या वाचन संस्कृती कमी होताना दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी ,त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी म्हणून कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली. कोरोनाकाळात सर्व विद्यार्थ्यांच्या घरी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विविध प्रकारच्या अनेक पुस्तकांचे प्रदर्शन भरविले.यामधून विद्यार्थ्यांना वाचनासाठी अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली.विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. वाचलेल्या पुस्तकांचा सारांश सांगितला.एका आठवड्यात विद्यार्थ्यांना दोन पुस्तके देण्यात आली.वर्षभर एका विद्यार्थ्याने किमान तीस ते चाळीस पुस्तकांचे आनंदाने वाचन केले.याबाबत सर्व विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांबरोबर घरातील इतर लोकांनीही या पुस्तकाचे वाचन केले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून घराघरात वाचन संस्कृती रुजली. आपण इतर विद्यार्थ्यांशी कसे वागले पाहिजे?आपण समाजात कसे वागले पाहिजे? जीवनात आपण कोणत्या गोष्टींना महत्व दिले पाहिजे? आपण समाजासाठी ,देशासाठी काय केले पाहिजे? वाचनामुळे कोणता फायदा होतो? अशा अनेक बाबी त्यांना या वाचन उपक्रमातून समजल्या.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे योग्य संस्कार होवून त्यांच्यामध्ये योग्य परिवर्तन झाले.पालकांनी वेळोवेळी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाने अतिशय चांगले बदल झाले आहेत.विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. उद्याचे साहित्यिक ,लेखक , कवी ,विचारवंत ,अधिकारी ,पदाधिकारी , लोकप्रतनिधी ,,,,,,असे अनेक या विद्यार्थ्यामधून तयार होणार आहेत. त्यामुळे शालेय जीवनात त्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांची योग्य जडणघडण होण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला असे गितेवाडी शाळेतील उपक्रमशिल शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.या उपक्रमास गाव पातळीवर प्रसिद्धी दिल्यामुळे शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला. गावातील अनेकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी शाळेच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या आवडीची लोकसहभाग म्हणून अनेक पुस्तके दान केली.त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनासाठी आणखी नवनवीन पुस्तके मोफत उपलब्ध झाली.विद्यार्थ्यांनी आनंदाने या पुस्तकांचे वाचन केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी या उपक्रमाची दखल घेवून उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे अभिनंदन करून जानेवारी २०२२ मधील जीवन शिक्षण अंकात या उपक्रमास प्रसिद्धी दिली.याबद्दल तुकाराम अडसूळ यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी चारशे रुपये मनीऑर्डर पाठविली.ही मनी ऑर्डर विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके घेण्यासाठी खर्च करण्यात आली.या उपक्रमाबद्दल पालक,ग्रामस्थ ,अधिकारी यांनी अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा