२५ व २६ डिसेंबरला राळेगणसिद्धी येथे पाचवे राज्यस्तरीय पर्यावरणसंमेलन
अहमदनगर - स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पाचवे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली २५, २६ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना आदर्श गाव ‘राळेगणसिद्धी क्षेत्रभेट’ संधी उपलब्ध होणार आहे. राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या सभागृहात ‘कोरोना’चे सर्व नियम पाळून संपन्न होणाऱ्या या संमेलनात मर्यादित प्रवेश असणार आहे.
शनिवार, २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता नावनोंदणी होईल ,सकाळी १० वाजता संमेलनाध्यक्ष ‘पद्मभूषण’ अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत धिवरे ,महाराष्ट्र राज्याचे नूतन शिक्षण संचालक दिनकर टेमकर , वुई सिटीझन्स’चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, अहमदनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सामाजिक वनीकरण अहमदनगरच्या विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे यांचे हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होईल .या उद्घाटन कार्यक्रमात पर्यावरण मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन होईल. वेबसाईटचे संपादन मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी केले आहे. दुपारच्या भोजनानंतर २ ते ३ वा. वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांचे ‘पाणी व जलव्यवस्थापन’, ३ ते ४ वा. प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांचे ‘सौरउर्जा व्यवस्थापन’, सायंकाळी ४.१५ ते ५.१५ वा. स्वच्छ भारत मिशनच्या प्रभाकर तावरे यांचे ‘प्लास्टिक निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन’, ५.१५ ते ५.४५ वा. पक्षिमित्र अनिल माळी यांचे ‘महाराष्ट्रातील पक्षी विविधता आणि अधिवास संवर्धन’, ५.४५ ते ७ वा. पर्यावरण कार्यकर्त्यांचे अनुभव कथन, ७ ते ७.३० वा. अमेरिकतील पर्यावरण अभ्यासक संगीता तोडमल यांचे ऑनलाईन पद्धतीने ‘पर्यावरणाचे वेगळेपण’, रात्री भोजनानंतर ८.३० ते ९.३० विलास हळबे यांचा ‘हा खेळ बाहुल्यांचा’ हा कार्यक्रम होईल.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ८ ते १०.४५ वा. ‘राळेगणसिद्धी’ क्षेत्रभेट संपन्न होईल. ११ ते १२.३० पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्यासोबत विचारमंथन आणि चर्चा होईल. दु. १२.३० ते १ वा. जगात कोठेही उपलब्ध नसलेल्या पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे या ‘देशी बियाणे बॅंक’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या भोजनानंतर २ ते ४ वा. संमेलनाध्यक्ष अण्णासाहेब हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यादत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन संजय चोरडीया, नद्या जोडणी प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, अहमदनगर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस,अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे ,राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेश औटी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत ,या संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना पर्यावरण संवर्धन कार्याचे राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल .तरी या संमेलनास उपस्थित राहण्यासाठी त्वरित नावनोंदणी करण्याचे आवाहन पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे (मो -८९९९५३३६८३ )राज्य सचिव वनश्री मोरे ,अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ ,राज्याचे कार्याध्यक्ष प्रमोद काकडे , नाना डोंगरे ,पर्यावरण मंडळाचे बाळासाहेब जठार ,भाऊसाहेब सोनवणे ,जयसिंग जवक ,वैभव मोरे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा