कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रमाने वाचन संस्कृती रुजली
श्रवण ,भाषण , वाचन , लेखन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची कौशल्य आहेत .त्यातील वाचन हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे . 'वाचाल तर वाचाल 'असे आपण वेळोवेळी ऐकले आहे . आज सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती कमी होताना दिसते . आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. वाचनाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते .वाचनातून उत्कृष्ट लेखक ,विचारवंत ,साहित्यिक तयार होतात .मोठेपणी केलेल्या वाचनाने विद्वत्ता येत असेल तर लहानपणी केलेल्या वाचनाने बालवाचकांच्या मनावर चांगले संस्कार होतात .उदा- श्यामची आई या कादंबरीमधील आई श्यामवर जेव्हा एक एक संस्कार करते तेव्हा श्यामची आई ही कादंबरी वाचणार्या छोट्या मुलांवरही ते संस्कार होत असतात . वाचनाने माणूस बहुश्रुत होतो .ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी आपल्याला वाचनाने मिळतात . वाचनाच्या छंदातून साऱ्या विश्वाची ओळख होत असते. वाचन केल्यामुळे आपल्याला आपले विचार उत्कृष्टपणे मांडता येतात .'ग्रंथ हे गुरु आहेत 'असे आपण म्हणतो . वाचनातून आपल्या जीवनाची योग्य जडणघडण होत असते .जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला चांगले लिहिता येते. पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून घेऊन जाणारी जहाजे आहेत .आपल्या जीवनात अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य आपल्याला वाचनातून मिळते. वाचनामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते . म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या वेगळ्या उपक्रमाची मी निवड केली .
वाचन हे विद्यार्थ्यांच्या लहानपणापासून राबविले गेले पाहिजे .मग ते वाचन अक्षरांचे , शब्दांचे ,वाक्यांचे , परिच्छेदाचे , उताऱ्याचे , पुस्तकाचे , वर्तमानपत्राचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे असो फक्त वाचन करणे महत्त्वाचे असते .त्यासाठी वाचनाची आवड लहानपणापासून निर्माण झाली पाहिजे .म्हणून कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम कोरोनाबाबत सर्व नियम पाळून योग्य ती दक्षता घेऊन डोंगराळ भागातील आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे वर्षभर राबवित असतो .या उपक्रमात सर्व विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले . कोरोना काळात शाळा बंद शिक्षण चालू यामध्ये मी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने राबविले.विविध उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन त्यांचा कृतिशील सहभाग घेतला. त्यांपैकी ' 'ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी 'हा एक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने उत्कृष्टपणे राबविला .
विद्यार्थ्यांना आवडतील अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी भरविले . या उपक्रमासाठी पुस्तकांची निवडीसाठी विविध चित्रमय बालकथा पुस्तके , रंजक गोष्टी ,आनंददायी व ज्ञानदायी माहितीबाबत विविध पुस्तके ,तसेच मागील अनेक वर्षातील किशोर मासिके उपलब्ध केली,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून आलेली विविध प्रकारची अवांतर वाचनाची पुस्तके , चित्रमय गोष्टीच्या पुस्तकामध्ये उड्या मारणारे पायमोजे ,विटीदांडू ,आमचा पतंग ,पोपट आणि मांजर ,झोका ,मावशीचे पायमोजे ,कपिला गायीचे वासरू ,आजीचा चष्मा ,,,,,,,अशी मिळालेली सर्व पुस्तके निवडली . तसेच लोकसहभागातून विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार मिळवलेली विविध प्रकारची चित्रमय माहिती पुस्तके , महान आदर्श राष्ट्रीय नेते , प्राणी, पक्षी माहिती , गोष्टी , सणसमारंभ ,पर्यावरण , गोष्टीची व इतर माहितीची पुस्तके , ग्रंथालयातील विद्यार्थ्यांच्या आवडीची विविध चित्रमय माहितीची पुस्तके अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा या उपक्रमात समावेश करून निवड केली.
विद्यार्थ्यांनी या पुस्तकांची पाहणी केली .त्यामधून त्यांच्या आवडीची पुस्तके वाचण्यासाठी निवडली .यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाचलेली पुस्तके एकमेकांना अदलाबदल करून वाचनासाठी दिले.पुस्तके देवघेवसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित केला.प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन कोरोनाबाबत दक्षता घेऊन पुस्तकांची देवाण-घेवाण करून त्याबाबत स्वतंत्र रजिस्टर मध्ये पुस्तकांच्या सवित्तर नोंदी ठेवल्या व त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या.चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी किशोर मासिकाचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला .
वाचनामुळे घरातील वातावरण बदलले. वाचनाने विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होऊन ते आई वडिलांना व समाजातील सर्वांना मदत करू लागले. वाचनासाठी दिलेली पुस्तके विद्यार्थी मुदतीच्या आतअतिशय आवडीने वाचन करत असे .विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी त्यांना माहिती विचारली असता त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची सवित्तर माहिती आनंदाने सांगितली.
आई ,वडील बहीण, भाऊ हे सुद्धा विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेली पुस्तके आवडीने वाचू लागली . त्यामुळे घरामध्ये वाचन संस्कृती वाढली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.एक पुस्तक वाचल्यावर विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या पुस्तकाची वाचनासाठी आतुरतेने वाट पाहू लागले. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढले . विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढून त्यांना आनंद मिळाला . कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी या उपक्रमात पुस्तके विद्यार्थ्यांचे एक प्रकारे चांगले गुरु ठरले. विद्यार्थ्यांचे मन वाचनात रमू लागले.वाचनाने त्यांच्यामध्ये योग्य संस्कार , प्रगल्भता ,सर्जनशीलता निर्माण होण्यास मदत झाली. वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती ,कल्पनाशक्ती ,संवेदनशीलता ,लेखन कौशल्य ,,,,अशा अनेक बाबींचा विकास होण्यास अतिशय उपयोग झाला. वाचनामुळे विद्यार्थी भूतकाळात जाऊन वर्तमानकाळाशी सांगड घालू लागले .पुस्तकांच्या वाचनामुळे कोरोनाकाळात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाने जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण होण्यास मदत झाली. वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांबरोबर घरातील सर्वांना समजले .विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली .पुस्तक हे एक आपले गुरू आहेत हे त्यांना समजले.
वर्षभर प्रत्येक विद्यार्थ्यांने वीसपेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. वाचनाने विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढला . वाचनामुळे विद्यार्थी आपले विचार ठामपणे मांडू लागले.या अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाल्याचे पालकांनी वेळोवेळी सांगितले.आमची शाळा चौथीपर्यंत असल्यामुळे चौथीचे विद्यार्थी परगावी पाचवीला जाणार आहेत. त्यामुळे त्यांना किशोर मासिक कायम स्वरूपी वाचनासाठी या सर्व विद्यार्थ्यांची किशोर मासिकाची वर्गणी मी स्वतः भरली आहे . या उपक्रमाचा मला मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे हा उपक्रम कायमस्वरूपी राबवित आहे.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर .
मो-७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा