अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात डोंगराळ ,दुर्गम भागात ही आमची जिल्हा परिषदेची गितेवाडी प्राथमिक शाळा आहे .या शाळेत आम्ही दोन शिक्षक व पहिलीपासून चौथी पर्यंत वर्ग असून चाळीस विद्यार्थी आहेत .आम्ही नेहमी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत आहे .सध्याच्या दैनंदिन जीवनात लोकांच्या समस्या ,गरजा यांवर आधारित कालानुरूप विविध जीवनावश्यक उपक्रम आमच्या शाळेत राबविले जातात .या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाचेही शिक्षण दिले जाते .सध्या संपूर्ण जगावर आणि आपल्या भारत देशात एक महाभयंकर संकट आले .ते संकट म्हणजे कोरोना विषाणू(व्हायरस) .याबाबत आमच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा व त्याबाबत दक्षता घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला .कोरोना विषाणूची चीनच्या वूहान प्रांतात डिसेंबर २०१९ मध्ये सुरुवात झाली .चीनमध्ये वुहान प्रांतात अनेक लोकांना याचा संसर्ग होऊन कोरोनामुळे दररोज काही लोक मृत्युमुखी पडू लागले ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली होती ते बरे होऊ लागले .कारण या कोरोना विषानुवर (व्हायरस)सध्या नसलेला उपाय .आमच्या शाळेत आम्ही दररोज विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचण्यास उपलब्ध करून देतो .विद्यार्थी दररोज आवडीने वर्तमान पत्र वाचतात . परिपाठामध्ये बातमी वाचन करताना कोरोना विषाणू हा शब्द त्यांच्या कानावर पडला .फलकावर सुद्धा बातमी लिहिताना कोरोना विषाणू संबंधी आम्ही बातमी मुद्दाम लिहिली होती .काही विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत विचारले आम्हालाही मुलांकडून प्रश्न विचारणे अपेक्षित होते .त्यावेळी वर्तमानपत्रात ,प्रसारमध्यमातुन आलेली कोरोना विषाणूची (व्हायरस) काही माहिती विद्यार्थ्यांना सांगितली .कोरोना विषाणू हा सजीव नसून निर्जीव आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले .मग या विषाणूचा एका मानसाकडून दुसऱ्या माणसाला संसर्ग कसा होतो हे समजावून दिले .खोकताना ,शिंकताना व हाताच्या स्पर्शाने एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या शरीरात कसा जातो हे समजावून दिले .तो हवेपेक्षा जड असल्यामुळे हवेत तो तरंगत नाही त्यामुळे हवेद्वारे त्याचा प्रसार होत नाही . अशी माहिती देऊन त्याची लक्षणे सांगितली .आपणास वाहती सर्दी ,कोरडा खोकला ,घसा दुखणे ,जास्त ताप , निमोनिया जाणवल्यास आपण त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे असे समजावून सांगितले . आपल्याकडे कोरोना विषाणू येईल की नाही हे माहिती नाही पण आपण काळजी घेने आवश्यक आहे . म्हणून आम्ही कोरोना विषाणू सुरू झाल्यापासून याबाबत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन , जनजागृती करून कोणती दक्षता आपण घेतली पाहिजे हे सांगितले .सध्याच्या युगात जग वेगाने धावत आहे आणि या धावत्या जगाबरोबर कोरोना विषाणूने माणसांच्या संसर्गामुळे वेगाने धावण्यास सुरुवात केली .कोरोना विषाणू चीन पुरता मर्यादित न राहता नंतर इटली ,इराण ,स्पेन ,अमेरिका ,जर्मनी .......अशा अनेक विकसित देशात प्रवेश करून त्याने अनेक देशापुढे महाभयंकर असे संकट निर्माण केले. चीन देशातील वूहान प्रांतातुन सुरू झालेला कोरोना विषाणू आपल्या देशात येईल असे स्वप्नातही कोणाला वाटले नसेल . सुरुवातीला हळूहळू नंतर वेगात त्याने माणसांच्या संसर्गाने या धावत्या जगात इतर देशांवर आक्रमन केले .दररोज अनेक माणसांना एकमेकांच्या संपर्काने हा कोरोना विषाणू होऊन काही माणसे आजारी पडू लागले .तर काही मृत्युमुखी पडू लागले . जोपर्यंत हा कोरोना विषाणू चीन देशापुरता मर्यादित होता तोपर्यंत त्याचे गांभीर्य ,दुष्परिणाम जगातील विविध देशांना समजले नाही .जेव्हा त्याने विविध देशात प्रवेश करून थैमान घातले तेव्हा मात्र विविध देशात त्याची तीव्रता ,गांभीर्य ,दुष्परिणाम जाणवून देशावर महाभयंकर संकट आल्याचे त्यांना समजले . त्यात आपला भारत देशही सापडला . कारण आज जग जवळ आले आहे .शिक्षण ,नोकरी ,व्यवसाय च्या निमित्ताने विविध देशातील लोक विविध देशात जातात .चीन मधून विविध देशात या कोरोना विषाणूने माणसांच्या संसर्गाने आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली .जेव्हा आपल्या देशातील माणसांमध्ये कोरोना विषाणूने प्रवेश केला तेव्हा असे वाटले आता तो आपल्या महाराष्ट्र राज्यात येऊ शकतो हे गृहीत धरून या कोरोना विषाणूबाबत उपलब्ध माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देऊन त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूबाबत जाणीवपूर्वक जनजागृती केली .कारण यावर उपाय नसल्यामुळे प्रतिबंध हाच उपाय आहे हे त्यांच्यामध्ये बिंबवले .कोरोना विषाणू (व्हायरस)संसर्गाने एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या शरीरात गेल्यावर तो क्रियाशील होतो आणि स्वतःसारखे आणखी विषाणू तो तयार करतो व शरीरातील निरोगी पेशींची संख्या कमी करतो .आपल्या घशात काही दिवस राहून तो फुफ्फुसात प्रवेश करतो त्यावेळी तो आपल्या श्वसन यंत्रणेवर दुष्परिणाम करून आपल्याला श्वासनास खूप त्रास होतो . त्यांच्याशी याबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली . त्यांच्यातील कोरोना विषाणू बाबत असणारी भीती दूर करून कोणती दक्षता घेणे गरजेचे आहे हे बिंबवणे महत्वाचे होते .दररोज या कोरोना विषाणूमुळे काय दुष्परिणाम ,जीवितहानी होते हे शाळेतील वर्तमानपत्रात विद्यार्थी वाचत होते .कोरोना विषाणू बाबत विद्यार्थी आम्हाला अधून मधून वेगवेगळे प्रश्न विचारू लागले .आम्ही कोरोनाबाबत त्यांच्यातील भीती दूर करून या बाबतची लक्षणे व घ्यावयाची काळजी बाबत वेळोवेळी चर्चा केली .कोरोना विषाणू बाबत वेगवेगळे डॉक्टर ,तज्ञ यांनी व्हिडीओ द्वारे सांगितलेली माहिती सर्व विद्यार्थ्यांना वर्गात एल .ई .डी .व संगणकावर दाखवली .यासाठी आपण बाहेरून आल्यावर अंघोळ करणे , वेळोवेळी साबणाने हात धुवून किंवा सॅनीटायझरने हात स्वच्छ केले पाहिजे .तसेच गर्दीत कोठेही जाऊ नये .गर्दीत जर गेले तर तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा .थंडगार पदार्थ खाऊ नये ,नेहमी वेळोवेळी कोमट पाणी प्यावे .सकाळी व संध्याकाळी गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात.अशी माहिती वेळोवेळी दिली . विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती झाली त्यांनी आपल्या पालकांना समजावून दिले त्यांनाही काळजी घेण्याबाबत सांगितले त्यांच्यामध्येही जनजागृती निर्माण केली .जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा रुग्ण सापडला तेव्हा तर आपल्या राज्यात कोरोना विषाणू बाबत खूपच गांभीर्य वाढले .शासनाने उपाययोजना सुरू केल्या . कोरोना विषाणूवर उपचार नसल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि या आजाराबाबत दक्षता घेणे एवढेच आपल्या हातात आहे.तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठ मध्ये दररोज कोरोना विषाणू बाबत प्रसार माध्यमातून आलेली आणखी सविस्तर माहिती व दक्षता घेण्यास सांगून आणखी जनजागृती केली .खोकताना ,शिंकताना रुमाल वापरणे ,आजारी असेल तर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे ,एकमेकांना हस्तांदोलन न करणे ,सामाजिक अंतर ठेवणे ,स्वच्छता बाळगणे ,वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे .नाकाला ,तोंडाला सारखा हात न लावणे ,गर्दीत जाणे टाळावे अशा अनेक बाबी समजावून देऊन कोरोना विषाणू बाबत दक्षता घेण्यासाठी काही व्हिडीओ दाखविले . जेव्हा अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू चा रुग्ण सापडला तेव्हा आता घाबरायचे नाही तर दक्षता घेऊन शासनाचे नियम काटेकोरपणे पाळायचे असे समजावून दिले .जिल्हाधिकारी यांनी जनतेला वेळोवेळी दिलेले संदेश तसेच विविध तज्ञ डॉक्टर यांनी दिलेले व्हिडीओ संदेश पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना दाखविले .जिल्हा परिषदेचे सी.ई. ओ. आणि शिक्षणाधिकारी यांनी कोरोना विषाणू (व्हायरस)बाबत काळजी घेण्यासाठी वेळोवेळी परिपत्रक काढले विद्यार्थ्यांना ही परिपत्रके सविस्तरपणे समजावून सांगितले .गर्दीच्या ठिकाणी आजिबात जाऊ नये तसेच त्यांच्यातील भीती दूर करून कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे पटवून दिले .त्यानंतर शासनाने राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या तेव्हा विद्यार्थ्यांना आम्ही कोरोना विषाणू बाबत आपण कशा प्रकारे काळजी ,दक्षता घेतली पाहिजे हे विचारले असता सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही वेळोवेळी सांगितलेली माहिती आम्हाला सविस्तरपणे सांगितली . शाळेला जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत आम्ही आमच्या घरात थांबू व अभ्यास करू .आम्ही कोरोना विषाणू बाबत शासनाचे नियम पाळू असे ठामपणे सांगितले . विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी पालकांना या कोरोना विषाणू बाबत जनजागृती केल्याचे सांगितल्यावर खूप समाधान वाटले , त्यांना सुट्टीतील अभ्यासाचे नियोजन देऊन घरी पाठवले .परंतु दुःख या गोष्टीचे होते की पुढे काय होईल ,हे संकट कधी निघून जाईल ,या कोरोना विषाणू(व्हायरस) वर मात करण्यासाठी शासनाने प्रथम महाराष्ट्र आणि नंतर संपूर्ण देश लॉक डाऊन केला .एवढ्या लहान वयात या लेकरांवर कोरोना विषाणू (व्हायरस) चे महाभयंकर संकट व लॉक डाऊन हे शब्द कधीही कानी पडलेले नव्हते .मोठी माणसे समजू शकतात पण लहान मुलांचे काय असा विचार सारखा मनात येतो . लॉक डाऊन च्या काळातही आम्ही सोशल मिडियाद्वारे या लहान लेकरांच्या व त्यांच्या पालकांच्या संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन ,आधार देऊन वेगवेगळा अभ्यास देतो . विद्यार्थ्याशिवाय आम्हाला करमत नाही .पुन्हा कधीही असे संकट संपूर्ण जगावर येऊ नये म्हणून काय उपाय शोधले पाहिजेत असा विचार नेहमी मनात येतो .
शब्दांकन
तुकाराम अडसूळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो ७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा