कोरोना काळातील माझे ऑनलाईन शिक्षण
डिसेंबर२०१९ मध्ये चीनच्या वूहान प्रांतातून सुरू झालेला कोरोना आपल्या देशात आपल्या पर्यंत येईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.अखेर आपल्या राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतरा मार्चपासून सुट्ट्या दिल्या नंतर लॉक डाऊन केले.शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण हे आम्ही दुसऱ्या दिवसापासून लगेच चालू केले.पालकांशी चर्चा करून लगेच त्यांचे व्हाट्सएप चे ग्रुप तयार केले.या ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला हे ऑनलाईन शिक्षण चालू केले.ज्या पालकांकडे अँड्रॉईड फोन होते त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे सुरू असे पण ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोन नव्हते त्यांना फोन करून अभ्यास दिला.असे आमचे ऑनलाईन शिक्षण सुरुवातीला सुरू झाले.
मात्र जून पासून यामध्ये बदल करून प्रत्यक्ष ऑनलाईन अध्यापन करण्याचे ठरवले.त्यानुसार पुन्हा पालकांशी चर्चा करून त्यांना गुगल मीट हे अँप डाऊनलोड करून दिले.ज्यांच्या कडे अँड्रॉईड फोन नाही त्यांना आपल्या जवळ ,शेजारी राहत असलेल्या मुलांना कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेऊन मदत करण्याचे सांगितले.त्यानुसार त्यांनी आपल्या जवळ राहणाऱ्या मुलांना अभ्यासासाठी मदत केली.आम्ही या शैक्षणिक वर्षांपासून गुगल मीट वर अध्यापनाचे नियोजन करून तास घेत आहोत.त्यावर दररोज अध्यापनाचे तास सुरू आहेत.आमच्या शाळेत चार वर्ग आहेत.आम्ही दोन शिक्षक कार्यरत आहोत त्यामुळे दोघांकडे दोन दोन वर्ग आहेत.माझ्याकडे इयता दुसरी व चौथीचा वर्ग आहे. या गुगल मिटवर अध्यापनासाठी ऑनलाईन तासाला कसे जॉईन व्हायचे हे विद्यार्थ्यांना व पालकांना आम्ही प्रत्यक्ष घरी जाऊन समजावून दिले.त्याबाबत लिंक टाकली त्या लिंकवर या ऑनलाईन तासाला कसे जॉईन व्हायचे याबाबत समजावून दिले.सुरुवातीला काही पालकांना जॉईन होण्याबाबत थोडी अडचण आली कारण काही वेळा लाईट नसल्यामुळे मोबाईलला चार्जिंग नसायची .कधी मोबाईलला रेंज नसायची त्यामुळे नंतर यावर सहज मात केली.तासाच्या अगोदर मोबाईल चार्जिंग करून ठेवू लागले.ज्याठिकाणी मोबाईलला रेंज आहे तेथे घरासमोर बसून ऑनलाईन तासाला मुले हजर राहतात.ऑनलाइन अध्यापनात शिकविलेल्या भागाचा अभ्यास नियमितपणे करतात .दिलेला स्वाध्याय नियमितपणे सोडवतात.ऑनलाइन अध्यापनात दररोज विद्यार्थ्यांचा संपर्क येतो.दररोज त्यांच्याशी चर्चा होते.तसेच अभ्यासाबरोबर ऑनलाईन अध्यापनात विविध दिनविशेष ऑनलाइन साजरे केले जातात.विविध ऑनलाईन स्पर्धेत विद्यार्थी आनंदाने कृतिशील सहभाग घेतात.या ऑनलाईन शिक्षणाबरोबर विविध उपक्रम ऑनलाईन राबविले जातात.विद्यार्थी विविध ऑनलाईन चाचण्या व प्रश्नमंजुषा सोडवतात.विविध ऑनलाईन स्पर्धेत त्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत.ऑनलाईन अध्यापनात त्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी दर आठवड्याला विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी दिली जातात. ऑनलाईन शिक्षणात वेळोवेळी अभ्यास तपासणीसाठी विद्यार्थ्यांच्या घरी जातो.त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतो.सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा एक चांगला पर्याय आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी ऑनलाईन शिक्षण खूप महत्वाचे आहे.ज्यांना अँड्रॉइड फोन नाही त्यांना लोकसहभागातून काही अँड्रॉइड फोन उपलब्ध केले तर इतर विद्यार्थ्यांचे पालक ज्यांना अँड्रॉइड मोबाईल फोन नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी नेहमी मदत करतात.एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे.त्यामुळे जरी कोणाला ऑनलाईन तासाला मोबाईलची अडचण आली तर इतर मुले लगेच मदत करतात. ऑनलाईन तासाला दिलेला अभ्यास त्वरित पूर्ण करतात. तसेच त्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक ऑनलाईन तासाचे आमचे व काही इतर शिक्षकांचे यू ट्युब व्हिडीओ आम्ही पाठवतो .त्यांना सर्व विषयांच्या स्वाध्यायपुस्तिका देऊन त्याबाबत मार्गदर्शन करून त्या सोडवून घेतो.त्यावरही काही ऑनलाईन स्वाध्याय देतो.या ऑनलाईन शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी विविध झाडांची रोपे वाटप केली आहे.विद्यार्थ्यांनी ही रोपे लावून त्यांचे संवर्धन करतात. पर्यावरणपूरक वस्तू तयार करून त्यांचा वापर करतात .प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात.त्यासाठी विविध प्रकारचे व्हिडीओ बनवून त्याद्वारे समाजाला प्रदूषणमुक्त संसमारंभ साजरे करण्याचा यू ट्युबद्वारे संदेश देतात.शाळेत राबविलेला पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम निरंतर राबविला जात आहे.राष्ट्रहितासाठी राबविलेला हा शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला आहे.गावातील लोकही आता पर्यावरणाचे रक्षण करून प्रदूषण निवारण कार्यात कृतिशील सहभाग घेतात.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा