शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण नवोपक्रम -
पर्यावरण व प्रदूषण हे शब्द आपण अनेकवेळा ऐकतो आणि वाचतो .परंतु पर्यावरण व प्रदूषण म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे.आपल्या सभोवती असलेल्या जैविक व अजैविक घटकांना आपण पर्यावरण म्हणतो.तर प्रदूषण म्हणजे म्हणजे दूषित होणे तसेच त्यापासून सजीवांना अपाय होणे .अशी साधी सरळ व्याख्या आपल्याला करता येईल .आपल्या सभोवतालची सर्व प्रकारची परिस्थिती जर अनुकूल असेल तर सजीवांना जीवन जगणे अनुकूल असते .परंतु जर आपल्या सभोवतालची नैसर्गिक व मानवनिर्मित परिस्थिती प्रतिकूल असेल तर सजीवांच्या जगण्यास बाधा निर्माण होते.म्हणून सर्व संजीवांना निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या सभोवतालची परिस्थिती अनुकूल राहण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे तितकेच महत्वाचे आहे.त्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे म्हणजे काय ते आपण सविस्तरपणे समजावून घेऊन त्यावर उपाययोजना केली पाहिजे . पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे एकमेकांना पूरक आहेत.हवा ,पाणी ,अन्न या सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत .यापैकी एकाचे जरी प्रदूषण झाले तरी सर्व सजीवांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही फक्त आपल्या देशापुरती मर्यादित समस्या नाही तर ती एक मोठी जागतिक समस्या आहे. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणसाठी जर आपण काही उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला आरोग्यसंपन्न जीवन जगता येणार नाही.म्हणून आपल्याला आणि सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे काळाची गरज निर्माण झाली आहे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गितेवाडी या शाळेत बदलीने दोन वर्षांपूर्वी आलो तेव्हा शाळेत झाडे नव्हती .
म्हणून या शाळेत दोन वर्षांपासून आम्ही शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम सतत राबवित असतो .हा उपक्रम आम्ही शाळा व गाव पातळीवर यशस्वीपणे नेहमी राबवित असतो.त्यामुळे आमचा हा नवोपक्रम गावाचा उपक्रम झाला आहे. सजीवांच्या मूलभूत गरजांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. आपण विविध प्रकारचे प्रदूषण अनुभवतोय .त्यात हवेचे प्रदूषण ,पाण्याचे प्रदूषण ,अन्नाचे पदूषण ,ध्वनी प्रदूषण खूप महत्वाचे आहे.म्हणून आपल्या देशासमोर असलेली पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही फार मोठी समस्या शिक्षणातून सोडवण्यासाठी आम्ही हा नवोपक्रम निवडला .शाळेतील विद्यार्थी हे उद्याच्या काळात देशाचे आधारस्तंभ आहेत.म्हणून शिक्षणातून सुजाण नागरिक तयार करण्यासाठी शालेय जीवनात या विद्यार्थ्यांची योग्य जडणघडण होण्यासाठी त्यांच्या मध्ये समाजहिताचे व देशहिताचे मूल्य रुजणे गरजेचे आहे.म्हणून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाजहिताचे व देशहिताचे मूल्य रुजण्यासाठी हा नवोपक्रम आम्ही शाळेत नेहमी यशस्वीपणे राबवितो.
त्यासाठी खालील उपक्रम नेहमी राबविले जातात
वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन मधून हवा प्रदूषण थांबविणे --- शाळेमार्फत वृक्षारोपण हा उपक्रम वर्षभर राबविला जातो.झाडे आपल्याला फक्त फळे ,फुले ,औषध ,सावली ,पाऊस देतात असे नाही तर सर्वात महत्वाचे म्हणजे झाडे आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात.एक वेळेस माणूस पाणी ,अन्न याशिवाय काही वेळ जिवंत राहील पण हवेशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही .हे विद्यार्थ्यांना वेळोवेळी पटवून दिले.शाळेमार्फत दरवर्षी वृक्षारोपणासाठी दीड ते दोन हजार रोपे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ,माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना आम्ही वाटतो.शाळेतील प्रत्येक विद्यार्थी दरवर्षी किमान दहा ते वीस झाडे घर किंवा शेताच्या कडेला लावून त्या सर्वांचे संगोपन करतात तर गावातील लोक अनेक झाडे लावून त्यांचे संगोपन करतात.शाळेच्या आवारात आम्ही प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले आहे.झाडांमुळे हवा शुद्ध राहते.म्हणजे झाडांमुळे हवेचे प्रदूषण थांबते व प्राणवायू मिळतो हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमातून रुजविले आहे.त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे.विद्यार्थी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याची प्रतिज्ञा घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतात.हवेचे प्रदूषण होऊ देत नाही.
क्षेत्रभेटीतून प्रदूषण निवारण -- वर्षातून चार ते पाच वेळा क्षेत्रभेट व परिसर भेट उपक्रम राबविला जातो.यामधून विद्यार्थ्यांना ओढा ,नाले ,नदी यांच्या भेटीतून पाणी कसे दूषित होते हे दाखवले जाते.नदीचे ,ओढ्याचे पाणी उगमाजवळ किती स्वच्छ होते माणसांच्या वस्तीत आल्यावर हे पाणी दूषित का झाले?हे पाणी कोणी दूषित केले?
दूषित पाण्यामुळे होणारे विविध आजार कोणते?हे पाणी प्रदूषण कसे थांबविता येईल याबाबत चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी आपण काय केले पाहिजे यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली .या पाण्यात कचरा टाकू नये ,पाण्यात सांडपाणी सोडू नये.
आपण कधीही पाणी प्रदूषण करू नये ,पाणी हे जीवन आहे हे मूल्य त्यांच्यात रुजविले आहे.
क्षेत्रभेटीतून अन्न प्रदूषण थांबविणे --क्षेत्रभेटीत शिवार पाहणी म्हणजे शेतातील पिकांची पाहणी केली जाते.पिकांवर कीटकनाशकांची अमर्याद फवारणी करणे तसेच रासायनिक खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करणे हे आपल्या आरोग्यास घातक आहे हे त्यांना शेतातील विविध पिके व भाजीपाला यांच्या पाहणीतून समजावून दिले.यावेळी त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले.त्यामुळे त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व समजले.
तसेच अन्नात कधीही भेसळ करू नये त्याचे दुष्परिणाम समजावून दिले.
परसबाग--विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा ,त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व समजावे म्हणून शाळेत परसबाग तयार केली आहे.यामध्ये वांगी ,बटाटे ,कांदे ,टोमॅटो ,गवार ,कोथिंबीर ,भेंडी असा विविध प्रकारचा भाजीपाला केला जातो . या भाजीपाल्यावर कोणत्याही प्रकारची कीटकनाशकांची फवारणी केली जात नाही .रासायनिक खते न वापरता शेणखत वापरले जाते . त्यामुळे हा सेंद्रिय भाजीपाला चवीला व आरोग्याला अनुकूल असतो.हा भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जातो .
पर्यावरणपूरक उपक्रम /कार्यक्रम --वर्षभर विद्यार्थ्यांचे वाढदिवस वृक्षारोपण करण्यासाठी झाडाचे रोप देऊन शुभेच्छा दिल्या जातात.तसेच वर्षभर कोणत्याही कार्यक्रमात वृक्षारोपणासाठी झाडाचे रोप भेट म्हणून दिले जाते.
प्लास्टिक विरोधी जनजागृती--विद्यार्थ्यांना प्लास्टिक पिशव्या ,वस्तू वापराचे दुष्परिणाम समजावून दिले .यावेळी गावातील सर्व प्रकारचे प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी ग्रामस्थांमध्ये प्लास्टिक बाबत जनजागृती केली.पर्यावरणपूरक पिशव्या वस्तू वापरण्याचे ठरले.बाल आनंद मेळाव्यातून प्लास्टिक पिशव्या , वस्तू न वापरता पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्यासाठी प्रदर्शन भरवून जनजागृती केली जाते.
माजी विद्यार्थी मेळाव्यातून प्रदूषण निवारण--शाळेचे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करून त्यात हा नवोपक्रम समजावून दिला .त्यांना हवा ,पाणी ,अन्न ,ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून दिले .त्यांनी हवा ,पाणी ,अन्न ,ध्वनी यांचे प्रदूषण न करण्याचे व पर्यावरण संवर्धन करण्याचे ठरविले .तसेच या सामाजिक व शैक्षणिक नवोपक्रमाबद्दल त्यांनी शिक्षकांचे ,विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थी व पालक आणि ग्रामस्थ यांना या नवोपक्रमातून पर्यावरणप्रेमी बनवून त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविले आहे.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी
जि. अहमदनगर
मो-७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा