शिक्षक दिन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य
सागराला किनाऱ्याची मर्यादा असते,
आकाशाला क्षितीजाची मर्यादा असते ,
पण शिक्षकांच्या कर्तुत्वाला मर्यादा नसते ,
या काव्यपंक्ती शिक्षकांच्या महान कार्याची ओळख करून देतात.
एवढे महान कार्य शिक्षक नेहमी करत असतात.
आपल्या देशात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुत्ताणी या गावात झाला. तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.शिक्षक व समाज यांचे अतूट नाते असते .शिक्षक हे समाजपरिवर्तनाचे म्हणजे राष्ट्रनिर्मितीचे महान कार्य करत असतात. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण देत असतात.शिक्षक भविष्यातले विचारवंत ,कलाकार ,कवी ,लेखक ,साहित्यिक ,पुढारी ,अधिकारी ,शिक्षक ,डॉक्टर ,इंजिनियर ,खेळाडू ,शास्त्रज्ञ ,समाजसेवक ,विविध क्षेत्रातील व्यक्ती ,सुजान नागरिक अशा अनेकांना घडविण्याचे महान कार्य करत असतात.आई वडिलांच्या नंतर विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचे असते .विद्यार्थ्यांमध्ये समाजहिताची ,राष्ट्रहिताची योग्य मूल्य रुजविण्याचे कार्य शिक्षक करत असतात . म्हणून शिक्षकांना समाजात महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे .समाजात शिक्षकांच्या महान कार्याचा गौरव झाला पाहिजे.शिक्षकांचे स्थान समाजात उंचावले पाहिजे.शिक्षकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे . शिक्षक शाळेसाठी गावासाठी ,राज्यासाठी ,देशासाठी सतत परिश्रम घेत असतात.आपला वाढदिवस हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा असे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह अनेकांना वाटत होते . म्हणून शासनाने ५ सप्टेंबर १९६२ पासून त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी नगरपालिका ,महानगरपालिका ,जिल्हा परिषद ,राज्यशासन ,केंद्रशासन आणि समाजात विविध प्रकारच्या कार्य करणाऱ्या सामाजिक व स्वयंसेवी संस्था उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव करतात .तसेच या दिवशी अनेक शाळेत विद्यार्थी शिक्षकांची भूमिका करून शालेय कामकाज करण्याचा उपक्रम राबविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याचा प्रत्यक्षपणे एक वेगळा आनंददायी अनुभव मिळतो.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे बालपणापासून शांत स्वभावाचे होते. १९०८ मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी संपादन करून मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले .ते तत्वज्ञानाचे शिक्षक होते .त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात काही काळ उत्कृष्टपणे कार्य केले.ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठ सारखी प्रसिद्ध विद्यापीठे भारतात निर्माण झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.त्यांनी भारतात काही काळ विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्य केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थीहिताचे कार्य केले .सुमारे चाळीस वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून उत्कृष्टपणे कार्य केले. विषयाची सखोलता ,ओघवती भाषा,अचूक शब्दरचना ,विषयाची आकर्षक मांडणी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी कमालीचा आदर होता. जेव्हा ते वर्गात अध्यापन करीत तेव्हा त्यांचा तास कधीही संपू नये असे सर्व विद्यार्थ्यांना वाटे . सर्व विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मदत करीत असे . त्यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते .आपले विद्यार्थी बुद्धिमान व आदर्श नागरिक झाले पाहिजेत अशी त्यांची इच्छा होती.परदेशातही त्यांना फार मोठे स्थान होते कारण ते एक शिक्षणतज्ञ व तत्वज्ञानी होते. परदेशात अनेक वेळा त्यांची व्याख्याने होत असे.आपले तत्वज्ञान व संस्कृती त्यांनी जगाला पटवून दिली ही आपल्या देशाच्या दृष्टीने फार मोठी अभिमानाची बाब आहे.आपल्या देशाचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी समाजासाठी , देशासाठी महत्वाचे कार्य केले.त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जगात भारत देशाचे महत्व वाढविले.आपल्या देशाला एक चांगली दिशा देण्याचे कार्य केले.एक शांतिदूत ,उत्कृष्ट प्रशासक ,आत्मत्याग ,आत्मबल ,आत्मविश्वास ,आत्मनिर्भरता ,उत्कृष्ट चारित्र्य ,प्रखर बुद्धिमत्ता ,प्रभावी वक्तृत्व हे महत्वाचे गुण त्यांच्या अंगी होते. ते एक देशभक्त व महामानव होते .राष्ट्रपती पदावर असतानाही त्यांनी शिक्षकी पेशा निष्ठेने जपला .त्यांची साधी राहणी व उच्च विचार होते.शिक्षण हे आपल्या विकासाचे साधन आहे.शिक्षणाशिवाय आपला विकास होऊ शकत नाही.शिक्षकांकडे शिक्षणशास्त्रज्ञ म्हणून पाहिले गेले पाहिजे .विद्या विनय देते म्हणजे शिक्षण घेतल्यामुळे माणूस नम्र होतो.
शिक्षण ही संस्कृतीची जननी आहे.शिक्षकांनी नेहमी आपली कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे.राष्ट्राच्या जडण घडणीत शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. देशाचा चौफेर विकास आणि सामाजिक परिवर्तन हे केवळ दर्जेदार शिक्षणातूनच होऊ शकते .जेव्हा सर्वांचा विकास होतो तेव्हा आपलाही विकास होतो असे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार होते. त्यांना वाचन व लेखनाची खूप आवड होती.त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. एका लेखात ते म्हणतात मला पुस्तकाची आवड सुरुवातीपासून आहे ,माझा दृष्टिकोन व्यापक करण्याचे काम पुस्तकांनीच केले.पुस्तकांनाच मी माझा मार्गदर्शक व विश्वासू मित्र मानतो. वाचन ,मनन ,चिंतन ही निष्ठा त्यांनी शेवटपर्यंत जपली.त्यामुळे त्यांच्या अध्यापनाला एक वैचारिक बैठक लाभली होती.रशियासारख्या बलाढ्य देशात त्यांनी काही काळ भारताचे राजदूत म्हणून उत्कृष्टपणे कार्य केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षणाचे देशभरात सुसूत्रीकरण व्हावे म्हणून त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगात महत्वपूर्ण कार्य केले.जगातील विविध देशांशी त्यांनी भारत देशाचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.विविध देशात त्यांच्या कार्याचा सन्मान झाला.
साधा शिक्षक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगभर लौकिक संपादन करतो ही घटना सर्व जगाला अभिमानास्पद आहे.भारतीय तत्वज्ञान व संस्कृती यांचा जगाला परिचय करून देणारे स्वामी विवेकानंद यांच्यानंतर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते.त्यांनी भारत देशाला आर्थिक ,औद्योगिक ,शैक्षणिक क्षेत्रात स्थैर्य मिळवून दिले.मनात जिद्द असेल तर सामान्य माणूस असामान्य होऊ शकतो याचे सर्वपल्ली राधाकृष्णन हे उत्तम उदाहरण आहे.एक शिक्षक ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास त्यांनी केलेल्या महान कार्याची साक्ष देत आहे.त्यांनी केलेल्या या महान कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांचे महान विचार व कार्य प्रेरणादायी आहे.त्यांच्या कार्याचा आदर्श व प्रेरणा घेऊन शिक्षक देशाचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. शिक्षक गावात ,वाडीवस्तीवर व दुर्गम भागात जाऊन शिक्षण प्रक्रिया आनंददायी पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत आहेत.शिक्षकांच्या या महान कार्यास सलाम .
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जि.प.प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो-७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा