" धरतीची आम्ही लेकरं | भाग्यवान |
धरतीची आम्ही लेकरं | "
ही कवी द. ना. गव्हाणकर यांची इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पहिलीच कविता आहे . या धरतीची आपण सर्वजण लेकरं आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत .ती आपला सांभाळ करते .आपणही तिचा सांभाळ करून संवर्धन केले पाहिजे. या कवितेतून विद्यार्थ्यांवर धरती विषयी आपुलकी निर्माण होऊन तिचे संवर्धन करण्याचे मुल्य रुजविणे महत्त्वाचे आहे
बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.या वसुंधरेपासून आपल्याला अनेक बाबी मिळतात म्हणून आपण तिचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या पृथ्वीने आपल्याला जेवढे भरभरून दिले त्याची परतफेड म्हणून तिच्या उपकाराची जाणीव ठेवून तिचे संवर्धन करण्यासाठी हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस आपण साजरा करतो. आपण या पृथ्वीवर धरतीवर राहतो . सर्व सजीव आणि निर्जीव यांचे संवर्धन व संरक्षण आपण केले पाहिजे. हे संवर्धन व संरक्षण म्हणजे पर्यावरण संवर्धन होय. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही पृथ्वीवरील एक मोठी जागतिक समस्या आहे .ही समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे .आपल्याला व आपल्या भावी पिढीला आणि सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सर्व घटकांची जपणूक करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. परिसरातून आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होतात. त्या परिसराविषयी आपल्या मनात आपुलकी निर्माण झाली पाहिजे. त्या परिसराचे आपण रक्षण केले पाहिजे .निसर्गाचे आपण रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करील .निसर्ग माणसाशिवाय राहू शकतो पण माणूस निसर्गाशिवाय राहू शकत नाही .म्हणून निसर्गाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे .हवा, पाणी ,अन्न या आपल्या व इतर सर्व सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पृथ्वीवरील घटकांपासून पूर्ण होतात .म्हणून या गरजांचे प्रदूषण होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे .या गरजांपैकी एका गरजाचे जरी प्रदूषण झाले तरी सजीवांच्या जीवनात धोका निर्माण होतो. हवेचे प्रदूषण थांबवण्यासाठी ,शुद्ध हवा म्हणजे ऑक्सिजन मिळण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. झाडे आहेत तर आपण आहे. झाडांना वाचवले तर आपण वाचू. कारण झाडांपासूनऑक्सिजन मिळतो .आज संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे . त्यामुळे मानवी जीवनास धोका निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते. परंतु जी झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देतात त्याचे महत्त्व समजले पाहिजे. जगातील सर्व पैसा एकत्र केला तरी आपण ऑक्सिजन तयार करू शकत नाही .ऑक्सिजन फक्त झाडे तयार करू शकतात .म्हणून आपण सर्वांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले पाहिजे . वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही व्यापक चळवळ झाली पाहिजे .स्वतःला वाचविण्यासाठी झाडाला वाचविले पाहिजे .प्रत्येक मंगलमय प्रसंगी वृक्षारोपणाचा उपक्रम आपण राबविला पाहिजे. संत तुकाराम महाराज यांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे " या ओळीतून वृक्षांचे महत्त्व आपल्याला पटवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजावून दिले आहे . मुला मुलीचा जन्म झाला त्याप्रसंगी आपण झाड लावले पाहिजे. बाळाच्या वाढीबरोबर झाडाचीही वाढ आपण केली पाहिजे .बाळाच्या संगोपना बरोबर झाडाचे संगोपन आपण केले पाहिजे . मुला-मुलींच्या वाढदिवसाला झाडाचे रोप भेट दिले पाहिजे .कोणत्याही कार्यक्रमात झाडाचे रोप भेट दिले पाहिजे .आपले रस्ते मोठे झाले त्यामुळे कमी वेळात आपण प्रवास करू लागलो . या रस्त्याच्या कडेला आपण वड पिंपळ यांसारखी जास्त ऑक्सिजन देणारी झाडे लावली पाहिजेत. त्यांचे संवर्धन केले पाहिजे. हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे केले पाहिजेत.
आमच्या शाळेत आम्ही पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे मूल्य रुजविले आहे.विद्यार्थी हवा ,पाणी ,अन्न या मूलभूत गरजांचे प्रदूषण होऊ देत नाही.
हवे नंतर आपली दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे पाणी .पाण्याचे प्रदूषण आपण थांबविले पाहिजे कारण काही आजार हे जसे हवेतून पसरतात तसे काही आजार हे पाण्यातून पसरतात . म्हणून हे पाणी शुद्ध असले पाहिजे. पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे .घरातील सांडपाणी शोषखड्ड्यात सोडले पाहिजे. या शोषखड्ड्याजवळ झाड लावले पाहिजे .म्हणजे त्याबरोबर वृक्षारोपणाचेही कार्य होईल . कारखान्याचे दूषित पाणी नदीच्या ,ओढ्याच्या पाण्यात सोडू नये. नदीच्या,ओढ्याच्या पाण्यात जनावरे ,कपडे , गाड्या धुवु नयेत. त्यामुळे नदीचे ओढ्याचे पाणी दूषित होणार नाही .पाण्यानंतर महत्त्वाची गरज म्हणजे अन्न होय. प्रदूषणमुक्त अन्न तयार करण्यासाठी आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे.यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे . रासायनिक खते व कीटकनाशके फवारणी यामुळे जमीन दूषित होते .त्यामुळे अन्नाचे प्रदूषण होते. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप प्रगती केली पण त्याबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.प्रदूषण नियंत्रणासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे .प्रदूषणाचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे .माणसाने निर्माण केलेल्या आणि वापर केलेल्या वस्तूंचा खूप कचरा वाढत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी ही एक समस्या आहे .या कचऱ्याच्या प्रदूषणामुळे वसुंधरेची प्रदूषण होत आहे.या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे .ओला व सुका कचरा वेगळा केला पाहिजे.आमच्या शाळेत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते.विद्यार्थी कचरा होऊ देत नाहीत . माणसाने निसर्ग संपत्तीचा अमर्याद वापर केल्यामुळे निसर्ग संपत्ती कमी झाली. त्यामुळे उष्णता वाढू लागली .पावसाचे प्रमाण कमी झाले . प्रदूषणामुळे ओझोन वायूचे हवेतील प्रमाण कमी होत आहे .ओझोन वायूचे संरक्षण होणे आवश्यकआहे. त्यामुळे आपले संरक्षण होते. प्रदूषण ही माणसाने माणसापुढे निर्माण केलेली एक मोठी समस्या आहे . आमच्या शाळेतील विद्यार्थी वसुंधरेचे रक्षण करतात.आमच्या शाळेतील विद्यार्थी दरवर्षी अनेक झाडे लावून त्यांचे संवर्धन करतात. वाढदिवसाला झाडाची रोपे भेट देतात. कोणत्याही कार्यक्रमात झाडाचे रोप भेट देण्यात येते .शाळेमार्फत विविध झाडांची रोपे विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना वाटप करण्यात येतात .ग्रामस्थांना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले आहे . विद्यार्थी आणि ग्रामस्थ झाडांची रोपे लावून त्यांचे संवर्धन करतात .पाण्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी विद्यार्थी पाण्यात कचरा टाकत नाही. पाणी दूषित होऊ देत नाही. तसेच पशुपक्ष्यांना चारा पाणी ठेवतात. अन्नाचे प्रदूषण थांबवण्यासाठी ग्रामस्थांना सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले. त्यामुळे अनेक पालक सेंद्रिय शेती करतात. सेंद्रिय खते तयार करतात. शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करतात .पर्यावरण संवर्धनासाठी शाळेत विविध प्रकारची प्रचंड झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे .त्यामुळे शाळेत निसर्गरम्य, पर्यावरण पूरक ,आनंददायी वातावरण निर्माण केले आहे. शाळेत सेंद्रिय परसबाग व कुंडी प्रकल्प राबविला आहे .विद्यार्थी व ग्रामस्थ प्रदुषणमुक्त सण समारंभ साजरे करतात. कोरोना काळातही आम्ही विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना वृक्षारोपणासाठी घरोघरी झाडांची रोपे वाटप केली. त्यांनी ही झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. पृथ्वी आपली माता आहे ती सर्व प्राणीमात्रांना जगविते .तिच्यामुळे सर्वांना सागर संपत्ती ,जंगल संपत्ती , खनिज संपत्ती ,आरोग्यदायी प्राणवायू अशा अनेक बाबी मिळतात .म्हणून आपल्या सर्वांना आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी वसुंधरेचे रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा