लोकसंख्येतील होणारी वाढ रोखण्यासाठी समाजपरिवर्तन गरजेचे
माणसाने अनेक तंत्रज्ञानाचा शोध लावून आपले जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला .विज्ञानयुगात अनेक शोध लागले मानवी जीवन गतिमान झाले . गतिमान जगात
अनेक समस्या निर्माण झाल्या त्यापैकी लोकसंख्यावाढ ही एक समस्या निर्माण झाली आहे .लोकसंख्यावाढीमुळे लोकांच्या गरजा वाढतात त्या सर्व गरजा पूर्ण करणे अवघड असते.म्हणून लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण जगाला लक्ष देणे महत्वाचे वाटले .जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो.लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्येकडे या निमित्ताने लक्ष वेधले जाते .या विषयावर चर्चा करून काही उपाययोजना केल्या जातात.११जुलै१८९७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले .यामुळे लोकसंख्यावाढीविषयी जनमानसात जागृती निर्माण होऊन युनोने पण या लोकसंख्यावाढीची दखल घेऊन १९८९ पासून ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्यादिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.
जगात लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे वेगवेगळे आहे.अशिया खंडात सर्वात जास्त लोकसंख्या आहे कारण चीन आणि भारत हे जगातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असणारे दोन्हीही देश अशिया खंडात आहेत.जगातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या अशिया खंडात आहे .अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,युरोप ,आफ्रिका या खंडातील देशात लोकसंख्या कमी आहे.
जगात लोकसंख्या वाढीच्या बाबतीत चीन देश पहिल्या क्रमांकावर व भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे परंतु अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के एवढी आहे . आपल्या भारत देशात लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे त्यामुळे मानवी विकासावर त्याचा दुष्परिणाम होतो.आपल्या भारत देशात उत्तर प्रदेश ,बिहार ,उत्तराखंड ,ओरिसा ,छत्तीसगड ,राजस्थान ,झारखंड ,मध्यप्रदेश या राज्यातील लोकसंख्या जास्त आहे.
लोकसंख्या वाढते परंतु जमीन ,उत्पादन ,पाणी वाढत नसते . वाढत्या लोकसंख्यामुळे सर्वांना अन्न ,वस्त्र ,निवारा या मूलभूत गरजा पुरविणे अवघड होते .वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्य ,गरिबी ,बेरोजगारी वाढते .सर्वांना योग्य शिक्षण मिळणे अवघड जाते.भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले .१९४७ पासून दर दहा वर्षांनी आपल्या भारत देशाची जनगणना केली जाते.भारताचे जनगणना रजिस्ट्रार व गृहमंत्रालयातील जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत देशाची जनगणना केली जाते .भारत देश स्वतंत्र झाल्यावर १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती.स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५१ पासून २०११ पर्यंत औद्योगिकरणामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले.त्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली .पाहिले जागतिक महायुद्ध व प्लेग ची साथ या मोठ्या संकटामुळे जगातील सुमारे तीस कोटी लोक मृत्यमुखी पडले होते .
भारतातील लोकसंख्या ही जगातील लोकसंख्येच्या सुमारे १७.५ टक्के आहे. सध्याच्या जागतिक लोकसंख्येत विकसनशील देशांची लोकसंख्या ही सुमारे ८० टक्के आहे आणि ती २०५० पर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे.विकसनशील देशातील लोकसंख्या वाढीचा दर १.५ टक्के आहे तर विकसित देशातील लोकसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्के आहे .दरवर्षी आपल्या भारत देशाच्या लोकसंख्येत सुमारे १.८ कोटींची भर पडते .२००१ ते २०११ या काळातील लोकसंख्यावाढीचा दर कमी झालेला दिसतो .लोकसंख्या वाढ ही जन्म मृत्यू दर ,अंधश्रद्धा ,रूढी ,परंपरा ,वैद्यकीय सुविधा यांवर अवलंबून असते .या सजीवसृष्टीमध्ये सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे .माणसाने आपल्या सोयीनुसार जीवन जगण्याचा विचार करून इतर सजीवांकडे दुर्लक्ष केले .ज्या वनात आपला जन्म झाला त्या वनांचे संगोपन करण्याऐवजी काही माणसांनी शेतीसाठी ,व्यवसायासाठी जंगलतोड केली.त्यामुळे काही वन्यप्राणी बेघर झाले.काही सजीव ,प्रजाती नष्ट होत आहेत तर काही प्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत .त्याचे दुष्परिणाम मानवास भोगावे लागत आहे.लोकसंख्या वाढीमुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे.अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या .निसर्गातील अन्नसाखळी तुटली.लोकसंख्यावाढीमुळे औद्योगिकरण झाले .त्यामुळे शहरीकरण झाले .अनेक माणसे खेड्यातून शिक्षण व नोकरीसाठी शहरात येऊ लागली. त्यामुळे शहरात हवा ,पाणी ,जमीन यांचे प्रदूषण वाढले.प्रदूषण व जागतिक तापमान वाढल्यामुळे सर्व सजीवांच्या जीवनास बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाला वृक्ष लागवड कार्यक्रम राबवावा लागत आहे.म्हणून आपण पर्यावरण संवर्धन करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.लोकसंख्यावाढीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे .
लोकसंख्यावाढीमुळे शिक्षणाची व नोकरीची समस्या निर्माण झाली त्यामुळे बेरोजगारी वाढली.
लोकसंख्या रोखायची असेल तर जन्म मृत्यू दर कमी होणे गरजेचे आहे .आरोग्याच्या विविध सुविधांमुळे मृत्यूचा दर कमी झाला पण त्या प्रमाणात जन्माचा दर कमी झाला नाही .यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे.त्यांना छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब यामधील माहिती समजणे गरजेचे आहे.लोकसंख्यावाढीमध्ये पुरुष व स्त्रीयांच्या बाबतीत फरक आढळतो .पुरुषांचे जन्माचे प्रमाण जास्त आहे. कारण मुलगा वंशाचा दिवा असतो असा एक गैरसमज काही लोकांमध्ये असतो . त्यामुळे शासनाला लेक वाचवा लेक शिकवा यांसारखे अभियान वेळोवेळी राबवावे लागते.यासाठी
मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवा छान ही संस्कृती लोकांच्यामध्ये रुजणे गरजेचे आहे.
यासाठी लोकांच्या मनात परिवर्तन होणे गरजेचे आहे.लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्यापेक्षा प्रत्येकाने विचार करून लोकांमध्ये तसे परिवर्तन करणे गरजेचे आहे.लहान कुटुंबातील मुलांना सर्व सुविधा पालकांना पुरवणे शक्य होते परंतु मोठ्या कुटुंबातील मुलांना सुविधा पुरवताना पालकांना अर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. लोकसंख्यावाढीमुळे अनेक संकटे निर्माण झाली आहेत.या संकटांचा सामना करताना अनेक अडचणी येत आहेत.लोकसंख्यावाढ हा मानवी विकासातील म्हणजे देशाच्या विकासातील एक अडसर ,समस्या ठरत आहे.म्हणून लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी व भावी संकट रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.यासाठी सर्वांनी लोकांच्या मध्ये परिवर्तन करणे आवश्यक आहे.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा