गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उत्कृष्ट शिक्षण
अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण चालू आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १७ मार्च २०२० पासून सुट्ट्या दिल्या आहेत.शाळा बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी उत्कृष्ट नियोजन व कार्यवाही करून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले आहे.शाळेतील ८० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल फोन आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये त्यांनी पालकांना गुगल मिट हे अँप डाऊनलोड करून देऊन या बाबत सवित्तर माहिती दिली.त्यानुसार गुगल मिटवर दररोज विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करतात.विद्यार्थी ऑनलाईन तासाला वेळेवर जॉईन होतात .ज्यांना अँड्रॉईड फोन नाही त्यांना इतर विद्यार्थी मदत करून आपल्या घरी ऑनलाईन तासाला बोलावतात. यावेळी कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेतली जाते. विद्यार्थी ऑनलाईन अध्यापनात कृतिशील सहभाग घेतात. ऑनलाईन अध्यापनात चर्चेत सहभागी होतात .प्रश्नांची उत्तरे देतात .दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतात.ऑनलाईन स्वाध्याय ,चाचणी सोडवतात . ऑनलाईन अध्यापनात यू ट्युबचा वापर केला जातो. शिक्षणाबरोबर विविध उपक्रम, स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले जाते. विविध ऑनलाईन उपक्रमात व स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात.विविध स्पर्धेत त्यांनी यश मिळवून त्यांना तशी प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
तसेच गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षण पद्धतीनेही उत्कृष्ट अध्यापन केले जाते. यामध्ये शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविला जातो.शिक्षक दररोज ऑनलाईन अध्यापन केल्यानंतर वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करून अध्यापन करतात.ऑनलाईन तासाला दिलेला अभ्यास ,स्वाध्याय घरी जाऊन तपासतात.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका दिलेल्या आहेत.त्या विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत.शिक्षकांनी वेळोवेळी त्यांची तपासणी केली आहे.तसेच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके शिक्षक वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन देतात.विद्यार्थी या पुस्तकांचे वाचन करतात.त्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात वाचन संस्कृती विकसित झाली आहे.तसेच ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाबरोबर तुकाराम अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना वृक्षारोपणासाठी विविध झाडांची रोपे वाटून वृक्षारोपणाबाबत व प्रदूषण निवारण बाबत जनजागृती करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे.त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात.तसेच हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजांचे प्रदूषण होऊ देत नाहीत. ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातून शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण दिले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती झाली आहे. अधिकारी व पालकांनी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा