५ सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षक देशाचे सुजान नागरिक घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.शिक्षक समाजपरिवर्तनाचे म्हणजे राष्ट्र घडविण्याचे महान कार्य करतात.त्यामुळे समाजात शिक्षकांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे .समाजात शिक्षकांना महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव झाला पाहिजे .म्हणून ५ सप्टेंबर १९६२ पासून हा दिवस शासनाने शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.दक्षिण भारतात तामिळनाडू येथील तिरुत्ताणी या गावात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला.त्या गावात प्राथमिक शिक्षण झाले तर पुढील शिक्षणासाठी ते तिरुपतीला गेले.१९०५ साली तत्वज्ञान विषयात बी.ए. पूर्ण केले.तर १९०८ साली त्यांनी एम.ए. ची पदवी संपादन करून ते मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षक झाले.त्यांना वाचन लेखनाची खूप आवड होती.त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले.त्यांचे अनेक ग्रंथ खूप गाजले.सुमारे चाळीस वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून उत्कृष्टपणे कार्य केले.ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते कारण त्यांचे अध्यापन खूप प्रभावी होते.विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मदत करत असे .ते तत्वज्ञानाचे शिक्षक होते.त्यांनी जगातील अनेक देशात उत्कृष्टपणे व्याख्याने दिली.देशात व जगात त्यांचा नावलौकिक होता.विविध देशात त्यांच्या कार्याचा गौरव झाला.त्यांनी भारतात विद्यापीठात कुलगुरू म्हणून काही काळ कार्य केले.विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले.विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेतले.
१९४२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारत छोडो आंदोलनात मिरवणूक व मोर्चे निघाले त्यावेळी विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात भाग घेऊन ते रस्त्यावर आले .त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते विद्यार्थ्यांबरोबर आंदोलनात सहभागी झाले व शांततेत आंदोलन केले.
१९५२ साली त्यांनी युनेस्कोचे अध्यक्षपद भूषविले.त्यांनी जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न केले.त्यामुळे जगभर भारताचा नावलौकिक वाढला. बलाढ्य रशियात राजदूत म्हणून उत्कृष्टपणे त्यांनी कार्य केले.त्यावेळी रशियाचा सर्वेसर्वा स्टॅलिन यांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून म्हटले की डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे ह्रदय हे मानवतेने भरलेले असून दुःखी पीडित जनतेबद्दल त्यांना अपार सहानुभूती आहे.भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद व उपराष्ट्रपती म्हणून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची निवड झाली.दहा वर्षे ते उपराष्ट्रपती होते.जगभर त्यांचे व्याख्यानाचे दौरे सुरूच होते. त्यांची व्याख्याने खूप प्रभावीपणे होती .या आदर्श शिक्षकाचा व थोर सुपुत्राचा २६ जानेवारी १९५८ मध्ये भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च 'किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.१९६२ मध्ये त्यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली.राष्ट्रपती पद हे केवळ देखाव्याचे नसून घटनात्मकदृष्ट्या सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले .विश्रांती हा शब्द त्यांच्या जीवनात नव्हता.१९६७ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवृत्तीनंतर वाचन ,मनन चिंतनासाठी ते मद्रासला आले.२४ एप्रिल १९७५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.त्यांचा निधनाने सर्व जग हळहळले.मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म त्यांनी आयष्यभर जपला.
शिक्षक म्हणून सतत निष्ठेने कार्य केले.त्यांचे महान कार्य आपण विसरू शकणार नाही.
राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. शिक्षकांना समाजात महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे
शिक्षकांच्या महान कार्याचा गौरव झाला पाहिजे .असे त्यांचे मत होते.शिक्षक त्यांच्या कार्याचा आदर्श व प्रेरणा घेऊन देशाचे सुजाण नागरिक घडवित आहेत.शहरापासून गावात खेड्यात वाडीवस्तीवर ,दुर्गम भागात जाऊन शिक्षक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.तसेच
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची यशस्वीपणे अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांमध्ये त्याची रुजवन करण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक करत असतात.मुले मुली ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे .बालपणी त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे असते कारण ते संस्कार चिरकाल टिकतात .म्हणून त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय.आज काळ खूप बदलला आहे.शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे.पालकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत.तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे युग आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.काळ कितीही बदलला तरी बदलत्या काळानुसार शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही हे पण तितकेच सत्य आहे.तंत्रज्ञान हे फक्त शिक्षणास पूरक म्हणून कार्य करू शकते . गुरुशिष्याचे नाते हे अतूट असते ते कोणी तोडू शकत नाही.सध्या आपल्या देशात व संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत.शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण शासनाने चालू केलेले आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य रहावे म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण ,विद्यार्थ्यांचे गट करून शिक्षण ,विद्यार्थ्यांना स्वाध्याय कार्ड देऊन ,,,,,असे विविध प्रकारचे शिक्षण देण्यासाठी शिक्षक गावात ,वाडीवस्तीवर जाऊन परिश्रम घेत आहेत.शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिश्रम घेऊन विविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत.खरोखर शिक्षकांचे कार्य खूप महान आहे कारण शिक्षणातून देश बदलत असतो .
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जि.प.प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो-७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा