शिक्षक दिनाचे महत्व
५ सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून देशभर उत्साहात विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो.त्यांचा जन्म तामिळनाडू मध्ये तिरुत्तणी या गावात झाला.त्या गावात प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी तिरुपतीला गेले.पुढे बी.ए. करून एम .ए. ची पदवी मिळवून ते मद्रास मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये शिक्षक झाले.त्यांनी विविध देशात प्रभावी पणे व्याख्याने दिली.ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते कारण त्यांचे अध्यापन खूप उत्कृष्टपणे होते.विद्यार्थ्यांच्या अडचणी ते सोडवत असत.त्यांना वाचन लेखनाची आवड होती .त्यांनी विविध ग्रंथ लिहिले.भारत देश स्वतंत्र झाल्यावर ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती झाले.या पदावर ते दहा वर्ष राहिले.पुढे १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.भारत देशातील संस्कृती ,तत्वज्ञान जगाला पटवून दिले.जगात आपल्या देशाचा नावलौकिक वाढवण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले.
त्यांनी जगात आपल्या देशाचे महत्व वाढवले.जगात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.
शिक्षकी पेशा त्यांनी कायम जपला .एक शिक्षक ते राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेले कार्य खूप महान आहे.त्यांच्या महान कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला.
शिक्षक देशाचे सुजाण नागरिक घडवितात म्हणजे राष्ट्रनिर्मितीचे कार्य करत असतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडण मध्ये शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचे असते. शिक्षकांना समाजात महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे म्हणून शासनाने १९६२ पासून ५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.यादिवशी उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात.त्यामुळे शिक्षकांना आणखी प्रेरणा मिळते.विद्यार्थी आणि शिक्षक हे शिक्षणाचे दोन आधारस्तंभ असतात.शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीची प्रगल्भता आणि मनाची विशालता वाढविण्यासाठी शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागतात.शिक्षणप्रक्रिया गतिमान व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांना उपक्रमशील राहावे लागते .आजच्या तंत्रज्ञान व विज्ञानयुगात अनेक आव्हाने व अडचणी निर्माण होतात.या अडचणींवर मात करण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षक देत असतात.शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गाने जाण्याची दिशा देत असतात.शिक्षण कितीही उत्कृष्ट असले तरी ते प्रभावीपणे राबविण्याचे कार्य शिक्षकांना करावे लागते.विद्यार्थ्यांना जीवनाचे शिक्षण देण्यासाठी व त्यांच्यात जीवनमूल्ये रुजविण्यासाठी शिक्षकांना आनंददायी शिक्षण पद्धती राबवावी लागते.शिक्षकांना विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा लागतो.आपल्या देशाची संस्कृती जतन करण्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे लागते.शिक्षक देशाचे सारथी असतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण ते समाजपरिवर्तनाचे कार्य करून देश घडवतात .५ सप्टेंबर शिक्षक दिनी आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका करून शालेय काकमकाज करण्याचा उपक्रम राबवितो. यादिवशी विद्यार्थी मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक , शिक्षक ,सेवक यांची भूमिका करून उत्कृष्टपणे शालेय कामकाज करतात.या दिवशी दररोजच्यापेक्षा खूप वेगळे आनंददायी वातावरण शाळेत असते.शालेय स्वच्छता ,परिपाठ ,अध्यापन ही सर्व कामे विद्यार्थी आनंदाने करतात.या भूमिका करताना विद्यार्थी शिक्षकांचा पोषाख परिधान करतात.मुख्याध्यापक , पर्यवेक्षक ,शिक्षक ,सेवक ही कामे करताना विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो.शिक्षक झाल्यावर विद्यार्थ्यांना शिकविताना कोणती पद्धत वापरावी लागते ,कोणत्या अडचणी येतात याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो.हे शालेय कामकाज संपल्यावर सर्व विद्यार्थी मैदानावर एकत्र येतात.यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली जाते .तसेच शिक्षकांची भूमिका करताना कोणते अनुभव आले हे सांगतात.शिक्षकांचे कार्य किती महान आहे हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजते.
भविष्यात आम्हीही शिक्षक होणार आहोत असे हे विद्यार्थी अभिमानाने सांगतात.शालेय कामकाज केलेल्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी झाडाचे रोप भेट देण्यात येते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा