विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे अध्यापन करताना प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन व प्रयोग करणे महत्वाचे असते .त्यामुळे त्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो.मी विज्ञान विषयाचे अध्यापन करताना विविध घटकांवर अनेक लहान लहान व सोपे प्रयोग केले .त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण मिळाले.त्यांची निरीक्षण ,अनुमान शक्ती वाढीस लागली. परिसर अभ्यास मधील पिण्याचे पाणी हा घटक शिकविताना काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून देताना काचेच्या काही बाटल्या घेतल्या .त्या प्रत्येक बाटलीत पाणी टाकले.एका बाटलीत साखर ,दुसऱ्या बाटलीत मीठ ,धुण्याचा सोडा टाकला तर काही बाटलीत वाळू ,लाकडाचा भुसा टाकला .साखर ,मीठ ,धुण्याचा सोडा हे पाण्यात विरघळले तर वाळू ,लाकडाचा भुसा हे पाण्यात विरघळले नाही.यावरून विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ पाण्यात विरघळतात व कोणते विरघळत नाही हे कृतीद्वारे समजले.
काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात तरंगत नाहीत.हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून देण्यासाठी एका काचेच्या भांड्यात पाणी घेतले.त्यात खोडरबर ,पेन्सिल ,काड्या ,खडे ,नाणे,पाने ,खिळा अशा एक एक वस्तू पाण्यात टाकल्या असता खोडरबर ,खिळा ,नाणे ,खडे या वस्तू पाण्यात बुडाल्या तर पेन्सिल,काड्या ,पाने या वस्तू पाण्यात बुडाल्या नाहीत.याचे ज्ञान विद्यार्थ्यांना कृतीद्वारे दिले.
एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी नेता येते हे दाखविण्यासाठी एक प्लॅस्टिक बाटली घेतली.तिचा वरचा निमुळता भाग कापून टाकला .तळापासून काही अंतरावर चार छिद्रे पाडली .एक रिकामी रिफिल घेऊन तिचे चार तुकडे केले.हे चार तुकडे चार छिद्रात घट्ट बसवले .बाटलीत पाणी भरले.सर्व नळ्यामधून पाणी वाहू लागले.त्यामुळे एका ठिकाणी असलेले पाणी विविध ठिकाणी नेता येते हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजले. हवा हा पाठ शिकविताना रिकाम्या भांड्यातही हवा असते हे दाखविण्यासाठी एका मोठ्या रिकाम्या भांड्यात पाणी घेतले.त्यानंतर एक उभट रिकामे भांडे घेतले.भांडे उपडे करून पृष्ठभागावर तसेच उभे करून पाण्यात खाली दाबले .नंतर भांडे तिरपे केले .हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागले.यावरून हवा पाण्यापेक्षा हलकी असते.म्हणून भांडे तिरपे झाले हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात व रिकाम्या भांड्यातही हवा असते हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून समजले.
दिवस रात्र कसे होतात हे प्रत्यक्ष कृतीतून समजावून दिले.एक बॅटरी व एक भोवरा घेतला. बॅटरी म्हणजे सूर्य आणि भोवरा म्हणजे पृथ्वी हे विद्यार्थ्यांना सांगितले.बॅटरी व भोवरा समोरासमोर ठेवले . भोवरा फिरवला व बॅटरी चालू करून तिचा प्रकाश भोवऱ्याच्या समोरच्या भागावर पडला.हा प्रकाश म्हणजे दिवस भोवरा फिरत असल्यामुळे पुन्हा उजेडातील भाग अंधारात गेला हा अंधार म्हणजे रात्र हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून दाखवून दिले.त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवस रात्र कसे होतात हे प्रत्यक्ष कृतीतून समजले.
विषारी वायू हवेत पसरल्यामुळे हवेचे प्रदूषण होते.त्यामुळे ही दूषित हवा सर्व सजीवांच्या जीवनास घातक असून त्यामुळे श्वसनाचे विविध आजार होतात. विद्यार्थ्यांना हवेत धूर मिसळतो याचे निरीक्षण करण्यास सांगितले.विद्यार्थ्यांना हे समजले त्यांनी आपले व सर्व सजीवांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करण्याची प्रतिज्ञा घेतली व प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात .हवेचे प्रदूषण होऊ देत नाहीत .पाण्याचे प्रदूषण कसे होते व परिसरातून आपल्या गरजा कशा पूर्ण होतात हे विद्यार्थ्यांना ओढ्यावर परिसर भेट काढून पाण्याचे निरीक्षण करण्यास सांगून प्रत्यक्ष कृतीसह समजावून सांगितले.विद्यार्थ्यांना प्रदूषणाचे दुष्परिणाम या दूषित पाण्यातून समजावून दिले.त्यांनी पाण्याचे प्रदूषण न करण्याची प्रतिज्ञा घेतली.शाळेतील सर्व विद्यार्थी पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाहीत. तसेच परिसरातून आपल्या गरजा कशा प्रकारे पूर्ण होतात हे त्यांना परिसरातील विविध पिके ,झाडे , व इतर परिसरास भेट देऊन प्रत्यक्ष कृतीतून समजावून दिले . अशा प्रकारे विज्ञानातील विविध बाबी विविध साध्या सोप्या प्रयोगातून समजावून दिले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण मिळून त्यांची निरीक्षण शक्ती वाढीस लागली आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा