आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन स्पर्धेत गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव
अहमदनगर-- जागतिक पातळीवर पर्यावरणाचे कार्य करणाऱ्या स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरने आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन स्पर्धेतील कार्याबद्दल पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन पद्धतीने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरने ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्य पर्यावरण संवर्धन स्पर्धेत गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इको ट्रेनिंग सेंटरचे भारताचे समन्वयक नाशिक जिल्ह्यातील महान तंत्रस्नेही शिक्षक प्रदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता.पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे.त्यामुळे मानवासह सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.त्यामुळेआंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी इको ट्रेनिंग सेंटरने वृक्षारोपन ,सेंद्रीय शेती ,परसबाग निर्मिती ,गांडूळखत निर्मिती ,पावसाच्या पाण्याचे संकलन करणे ,पर्यावरण संवर्धन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ,
प्लॅस्टिकनिर्मूलन ,हस्तकला ,घरगुती वस्तू बनवणे ,कागदी लगदा बनवून वस्तू बनवणे ,रिसायकलिंग करणे ,हवा ,पाणी यांचे प्रदूषण कसे होते याबाबत प्रयोग ,स्वतःसाठी टाकाऊ कापडापासून हातरुमाल तयार करणे ,कचरा गोळा करणे ,कचरा व्यवस्थापन करणे ,कपडे धुण्यासाठी लागणारे प्रॉडक्ट घरी तयार करणे , रिकाम्या बाटल्यांचा योग्य वापर करणे ,पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणे ,,,,,अशा विविध प्रकारच्या वीस उपक्रमांवर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्धेसाठी गितेवाडी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.शाळेतील विद्यार्थी रामेश्वर महादेव गिते ,आरती आदिनाथ गिते ,ज्ञानेश्वरी शरद गिते ,समृद्धी आसाराम गिते ,ज्ञानेश्वर वासुदेव पोटे यांनी आंतरराष्ट्रीय वृक्षारोपन स्पर्धेत सहभाग घेऊन विविध झाडांचे प्रचंड वृक्षारोपन केले .
गितेवाडी शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम नेहमी यशस्वीपणे शाळेत व गावात राबविला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वृक्षारोपन स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केले . गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत ,घराजवळ ,शेतात प्रचंड प्रमाणात वृक्षारोपन करून त्यांचे संवर्धन केल्याचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे .आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संवर्धन कार्य करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन हे मूल्य रुजण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे इको ट्रेनिंग सेंटरचे भारताचे समन्वयक नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक प्रदीप देवरे यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा