बैलपोळा हा बैलांच्या व शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंदाचा सण
" श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ."
या बालकवींच्या कवितेतील ओळी श्रावण महिन्याचे सुंदर वर्णन करून देतात .उन्हाळ्याची उष्णता जाऊन थंड वातावरण, सुंदर झाडे, वेली ,धरतीने पांघरलेला हिरवा शालू , खळखळणाऱ्या पाण्याचे धबधबे , पावसाच्या सरी असे आनंददायी मनमोहक सुंदर वातावरण श्रावण महिना घेऊन येतो .हा महिना आनंददायी महिना असतो कारण या महिन्यात नागपंचमी, राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी ,बैलपोळा असे अनेक प्रकारचे सण येतात .तसेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन याच महिन्यात येतो .तसेच या महिन्यात सुंदर निसर्ग जणू काही नृत्य करत असतो .या सर्व सणांपैकी शेतकऱ्यांच्या आणि बैलांच्या जीवनातील आनंददायी सण म्हणजे बैलपोळा होय.शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे खूप महत्त्व आहे .शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते कारण तो सर्व जगाला अन्नधान्य पुरवतो . या शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांचा पोशिंदा म्हणजे त्यांचा सर्जा राजा बैल होय . शेतकरी शेतात आपल्या सर्जा राजा च्या म्हणजे बैलांच्या मदतीने सर्व प्रकारची शेतीची कामे करत असतो . बैल हे शेतकऱ्याचे भूषण असते. श्रावण महिन्याच्या अखेरीस अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा करतात तर काही ठिकाणी भाद्रपद महिन्यात शेवटी अमावस्येला हा सण साजरा करतात . या सणाला पोळा किंवा बैलपोळा असेही म्हणतात .शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करतात .खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याप्रमाणे बैल आपल्या शेतकऱ्यासाठी निस्वार्थी प्रेमाने कष्ट करत असतो. शेतकरी देईल तेवढे अन्न पाणी खाऊन तो समाधानी व आनंदी राहतो .आपल्या वाट्याला कितीही कष्ट आले तरी तो कधीही त्याबाबत तक्रार करत नाही. आपल्या धन्यासाठी सतत प्रामाणिकपणे कष्ट करणे एवढेच काय त्याला माहीत असते .शेतीची नांगरणी करणे , पेरणी करणे ,कोळपणी करणे , मळणी करणे ,मालाची वाहतूक करणे ,जमिनीची मशागत करणे , अशी अनेक कामे बैल करत असतात . बैलपोळा या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना म्हणजे सर्जा राजाला कोणत्याही प्रकारच्या कामाला जुंपत नाही . यादिवशी त्यांना स्वच्छ आंघोळ घालून सजविले जाते .त्यांची शिंगे स्वच्छ करून ती साळली जातात. त्यांना शेंदूर लावून चमकणारे बेगड लावतात . शिंगांना सुंदर फुगे लावतात .गळ्यात सुंदर मण्यांच्या व घुंगरांच्या माळा बांधतात .बैलांच्या अंगावर सुंदर नक्षीकाम करतात .त्यांच्या खांद्यांना गेरू लावतात. अशा प्रकारे बैलांना आकर्षकपणे सजवले जाते .त्यांची वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. गावाच्या वेशीत गावातील सर्व बैलांना रांगेत एकत्र केले जाते तेथे गावातील सर्व बैलांचा पोळा भरवला जातो .तेथे नारळ फोडला जातो .गावातील सर्व देवांपुढे दर्शनासाठी बैलांना नेले जाते .घरी आल्यावर बैलांचे व शेतकऱ्याचे औक्षण केले जाते. बैलांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य मिळण्याची इच्छा व्यक्त केली जाते कारण बैलांच्या जीवावर शेतकऱ्यांच्या शेतीचा व पिकांचा मळा फुलत असतो .बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. शेतकरी आपल्या बैलांना खूप जीव लावतात आणि बैल आपल्या धन्यासाठी शेतात सतत राबत असतो .आज जरी बैलांची अनेक कामे ट्रॅक्टर करत असला तरी बैलांची जागा ट्रॅक्टर कधी घेऊ शकणार नाही कारण बैल जे काम करू शकतो ती कामे ट्रॅक्टर करील असे नाही .बैल आहे म्हणून बैलपोळा आहे . ज्यांना बैल नाहीत ते या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात .असे इतके बैलांचे शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्व आहे . बैलपोळ्याची जागा ट्रॅक्टर पोळा कधी घेऊ शकणार नाही . शेतकरी आणि त्यांच्या बैलांचे अतूट असे नाते असते . हे नाते कोणी तोडू शकणार नाही . म्हणून बैल हे शेतकऱ्यांचे भूषण आहे .शहरात हा सण आपल्याला पहायला मिळत नसला तरी खेडेगावात हा सण पाहण्यासाठी शहरातील अनेक लोक खेड्यात जातात आणि या सणाचा आनंद घेतात .
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर .
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा