लोकसहभागातून शाळा परिवर्तनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
जून २०१३ मध्ये माझी बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर ता. नगर जि. अहमदनगर या शाळेत झाली .माझ्याबरोबर आणखी तीन शिक्षिकेची या शाळेत बदली झाली.शाळेत सर्व मिळून आठ शिक्षक झालो.
शाळेची बारकाईने पाहणी केली.शाळेची स्थापना ही १४ एप्रिल १८६४ म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील ऐतिहासिक शाळा होय.शाळेची इमारत खूप जुनी झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे होते . शाळेची इमारत व परिसर सुशोभित करणे गरजेचे होते कारण त्यामुळे मुलांचे मन रमुन अध्ययन अध्यापन साठी पूरक असे आनंददायी वातावरण तयार करणे अत्यंत आवश्यक होते.
म्हणून शाळेची काही दुरुस्ती व शाळा इमारत आणि परिसर सुंदर बनवून शाळा डिजिटल , ई लर्निग करण्याचे मनोमन ठरविले .त्यासाठी स्वतः च्या पगारातील काही रक्कम खर्च करण्याचे ठरविले व बाकीची रक्कम ग्रामस्थ ,पालक ,इतर शिक्षक यांच्या लोकसहभाग मधून जमा करण्याचा निश्चय केला.त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचेशी चर्चा केली.सर्वांनी ही शाळा परिवर्तन करण्यासाठी साथ देवून सहकार्य करण्याचे सांगितले.लोकसहभाग म्हणून वर्गणीची सुरुवात स्वतः पासून केली.स्वतःचे दहा हजार रुपये शाळेसाठी लोकसहभाग म्हणून शाळेच्या परिवर्तनासाठी खर्च केले . इतर शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार व काही ग्रामस्थ मिळून सुरुवातीला पन्नास हजार रुपये लोकसहभाग जमा झाला .त्यामधून शाळेची सर्व प्रकारची किरकोळ दुरुस्ती केली .नंतर शाळा रंगकाम हाती घेतले .शाळेला आकर्षक रंगकाम व पेंटिंग केले .शाळेच्या भिंतीवर सुंदर व आकर्षक चित्रे काढण्यात आली. ग्रामस्थांनी शाळा पाहिली शाळेत झालेले परिवर्तन पाहून अनेक लोकसहभागाच्या मदतीचे हात पुढे आले. गावातील अनेकांनी मदत केली.लोकसहभाग एक लाखाच्या पुढे गेला.शाळेत चार एकर जागेत वृक्षारोपण करण्यासाठी सर्व प्रकारच्या झाडांची आकर्षक अशी विविध रोपे व पोयटा माती स्वतःच्या गाडीने अहमदनगर शहरातून वेळोवेळी सहा महिने आणत होतो. विद्यार्थी , ग्रामस्थ ,अधिकारी ,विविध मान्यवर यांचे हस्ते वृक्षारोपन केले.शाळेत कुंड्या आणल्या त्यात सुंदर फुलझाडे लावली.
शाळेत सुंदर लॉन तयार केली.शाळेत सर्व जागेत भिंतीच्या बाजूने सर्व प्रकारची सुमारे तीनशे झाडे लावून त्यांचे शंभर टक्के वृक्षसंवर्धन केले. शाळा सुटल्यावर शाळेत थांबून झाडांच्या कडेने स्वतः फरशी बसविली.त्यामुळे झाडांचा स्वतंत्र पट्टा तयार केला. सर्वात महत्वाचे म्हणजे झाडे आपल्याला प्राणवायू देतात याचे महत्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणातून प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावून दिले व वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन हे मूल्य त्यांच्यामध्ये रुजविले .
शाळेत ज्यादा वेळ देऊन सुंदर परसबाग तयार केली.
त्यामध्ये विविध सेंद्रिय भाजीपाला लागवड केली. त्यामुळे मुलांना सेंद्रिय शेतीचे महत्व समजले .शालेय परिसरात कचरा होवू नये म्हणून विद्यार्थ्यांवर तसे संस्कार केले.ओला व सुका कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले.मुले अजिबात कचरा करत नाही .जेथे स्वच्छता तेथे प्रसन्नता हे मूल्य त्यांच्यामध्ये रुजविले .शाळेतील या सर्व तीनशे झाडांना पाणी देण्यासाठी स्वतःचा व मुलांचा खूप वेळ जात असे. म्हणून गावातील लोकांशी चर्चा करून लोकसहभागातून बोरवेल घेतला व त्या बोअरवेल मध्ये लोकसहभागातून मोटार (पंप ) बसविली. आता सर्व झाडांच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला.शाळेत सुंदर निसर्गरम्य वातावरण तयार झाले .शाळा सुटली तरी मुलांना व शिक्षकांना घरी जाऊ वाटेना अशी आदर्श शाळा तयार केली . लोकसहभाग वाढत गेला त्यामधून सुंदर चित्रकाम केल्यामुळे शाळा डिजिटल झाली.लोसहभाग जमा करण्याचे काम चालू ठेवले त्यामधून लेझिम ,संगणक , एल . ई. डी .घेतला. एल. ई. डी. व संगणक यांचा अध्ययन अध्यापनात वापर सुरू केल्यामुळे शाळा ई. लर्निग झाली. मुले मुली संगणक चालवू लागली .त्यांना संगणक शिक्षण मिळाले .सुंदर चित्रे काढल्यामुळे शाळा डिजिटल झाली विद्यार्थ्यांना शाळेत आनंददायी शिक्षण ,तंत्रस्नेही शिक्षण मिळू लागले ते स्वतः संगणक व एल . ई. डी.वर अध्यापनाचे धडे गिरवू लागले.शाळा आकर्षक व निसर्गरम्य झाली .त्यांना माहिती व तंत्रज्ञान अवगत झाले.शाळेत स्नेहसंमेलन निमित्त संपूर्ण गाव शाळेत आले . शाळा सुंदर व आकर्षक केल्याबद्दल त्यांनी आम्हा सर्व शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून या कार्यक्रमातून शाळा विकासासाठी लोकसहभाग जमा झाला.लोकसहभागातून शाळेत संगणक ,लाऊड स्पीकर घेतला. प्रत्येक वर्गात लोकसहभागातून विद्यार्थ्यासाठी पंखे बसविली .विविध खेळाचे , कवायतीचे साहित्य घेतले .खेळाची विविध मैदाने तयार केली .शाळेत खेळातून आनंददायी शिक्षण मिळू लागले. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून लोकसहभागातून शाळेत जलशुद्धीकरण यंत्र व हात धुण्यासाठी सुविधा निर्माण केली.लोकसहभागातून पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या घेतल्या. लोकसहभागातून स्वच्छतागृह सुंदर करून शाळेत बालवाचनालय सुरू केले .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडली.विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली . शाळेत मुलांना शुद्ध पाणी मिळू लागले मुले आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी झाले.विविध स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थी यश मिळवू लागले.शाळेचे गावात अभिनंदन होऊ लागले.
आता मुलांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे देशहिताचे मूल्य रुजविण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.हवा ,पाणी ,अन्न या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.त्यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.प्रदूषण ही एक जागतिक समस्या आहे म्हणून ही समस्या शिक्षणातून सोडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले .हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण रोखण्याचे महत्व पटवून दिले..हवा प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .विद्यार्थी वेळोवेळी विविध ठिकाणी आनंदाने वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करू लागले.
पर्यावरण संवर्धनाचे मूल्य विद्यार्थ्यामध्ये रुजले.
तसेच प्रदूषणमुक्त सणसमारंभ चे महत्व पटवून दिले त्यामुळे विद्यार्थी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करू लागले.पाण्याचे प्रदूषण रोखन्यासाठी पाण्यात कचरा न टाकणे ,पाण्याचा वापर जपून करणे ,पाणी दूषित होणार नाही याची काळजी घेवू लागले.अन्नाचे प्रदूषण थांबविण्यासाठी अन्नात भेसळ न करणे, सेंद्रिय शेती व भाजीपाला पिकवणे .शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट करू लागले.
उघड्यावरील पदार्थ न खाणे .प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराचे दुष्परिणाम समजावून दिले . त्यामुळे प्लॅस्टिक वापर विद्यार्थी टाळू लागले .
त्यामुळे प्रदूषण थांबले. शाळेत प्रचंड प्रमाणात लावलेल्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन बद्दल शासनाच्या वनीकरण विभागाने विशेष प्रमाणपत्र देवून शाळेचा गौरव केला. उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए.,पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे ,समाजसेवक राजाराम भापकर यांनी शाळेला भेट देवून शिक्षकांच्या कार्याचे अभिनंदन केले. त्यावेळचे जिल्हाधिकारी अभय महाजन ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश विवेक हुड ,जिल्हा परिषदेचे सी. ई. ओ.विश्वजीत माने ,जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ,शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे व विविध क्षेत्रातील अधिकारी यांचे उपस्थितीत बालकांचे हक्क व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना यांबाबत जिल्हास्तरीय शिबिर घेण्यात आले.सर्वांनी या सुंदर शाळेतील वातावरण पाहून या उच्च अधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचे भाषणात विशेष अभिनंदन करून शाळेच्या शेरेबुकात तशी नोंद केली.एवढे मोठे अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत एका व्यासपीठावर एकत्र आले अहमदनगर जिल्ह्यात ही एक ऐतिहासिक घटना ठरली . या शाळेत इंग्रजी शाळेतून अनेक विद्यार्थी दाखल झाले विद्यार्थी पट वाढला त्यामुळे आठ शिक्षकी शाळा दहा शिक्षकी झाली. आदर्श शाळा तयार झाली शाळा सुटल्यावर चित्र वेगळे दिसू लागले .विद्यार्थी व शिक्षक यांना घरी जाताना पावले जड वाटू लागली .बाजारचे गाव असल्यामुळे गाव खूप मोठे आहे .गावात शाळेविषयी खूप चांगला संदेश गेला त्यांनी ग्रामसभेत शिक्षकांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेवून जिल्हा परिषदेला पाठविला.
ही आमच्या कार्याची फार मोठी पावती मिळाली.गावातील प्रत्येकाला या शाळेचा अभिमान वाटू लागला.या शाळेचे परिवर्तन करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक ,मुख्याध्यापक ,पालक ,ग्रामस्थ ,शाळा व्यवस्थापन समिती ,ग्रामसेवक ,अधिकारी ,यांचे सहकार्य मिळाले.
पुढे मे २०१८ मध्ये या सुंदर शाळेतून माझ्यासह सात शिक्षकांच्या शासनाच्या बदली धोरणानुसार बदल्या झाल्या .माझी व माझ्याबरोबर त्यावेळी शाळेत बदलून आलेल्या शिक्षिकांची बदली झाल्यामुळे गावातील सर्वांना खूप दुःख झाले त्यांनी मोठा कार्यक्रम घेऊन बदली झालेल्या आम्हा सर्वांचा खूप मोठा निरोप समारंभ घेतला . त्यात माझी बदली पाथर्डी तालुक्यात गितेवाडी येथील शाळेत झाली .या गितेवाडी येथील शाळेचेही आनंदाने गावाच्या व आम्हा शिक्षकांच्या लोकसहभागातून शाळेचे मोठे परिवर्तन चालू केले आहे.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
उपक्रमशील शिक्षक ,अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा