व्ही .डी.ओ.कॉन्फरन्स उपक्रमातून विद्यार्थ्यांना जगाची ओळख
(२२ सप्टेंबर २०२०)
अहमदनगर जिल्हा परिषद आणि ग्लोबल नगरी फौंडेशन अमेरिका यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून राबविला जातो.अहमदनगर जिल्ह्यातील जे भूमिपुत्र जगात विविध देशात इंजिनियर अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.त्या सर्वांना अमेरिकेतील अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ.किशोर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी एकत्र आणले.ग्लोबल नगरी सदस्य ,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्ह्यातील कृतिशील शिक्षक बंधू भगिनी यांचा एकत्रित व्हाट्सअप ग्रुप करून याबाबत चर्चा होऊन माहिती दिली जाते.त्यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक ,ग्रामस्थ यांचेशी संवाद साधून विविध बाबींवर चर्चा , मार्गदर्शन केले जाते.या व्हिडीओ कॉन्फरन्स साठी आमच्या शाळेचा समावेश होण्यासाठी आम्ही संपर्क केला. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे व ग्लोबल नगरी परिवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स बाबत उत्कृष्टपणे नियोजन केले.टप्प्याटप्याने व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यासाठी एका शाळेला एक ग्लोबल नगरीमधील संवादक ,मार्गदर्शक नियुक्त केले.जिल्हा परिषदेने व ग्लोबल नगरी परिवाराने व्हिडीओ कॉन्फरन्स साठी निवड केलेल्या शाळांना कळविले.त्यात आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडीची निवड झाली.खूप आनंद झाला एक वेगळा उपक्रम शाळेत राबविला जाणार त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा जागतिक अनुभव मिळतोय.आमच्या शाळेसाठी अहमदनगरचे भूमिपुत्र कॅनडा देशातील टोरोंटो येथे स्थायिक झालेले उद्योजक गौरांग शहा यांची निवड झाली.शाळेत व्हिडीओ कॉन्फरन्स बाबत शाळा व्यवस्थापन समिती ,सहकारी शिक्षक ,ग्रामस्थ ,पालक यांचेशी सविस्तर चर्चा करून नियोजन केले.या व्हिडीओ कॉन्फरन्स साठी त्यांना निमंत्रित केले.या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या बाबींवर संवाद साधून चर्चा करायची याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून नियोजन केले .शनिवारी सकाळी शाळा असते त्यादिवशी व्हिडीओ कॉन्फरन्स साठी दोन्हीही देशातील वेळेचा समन्वय साधून जिल्हा परिषद व ग्लोबल नगरीने फेब्रुवारी महिन्यात नियोजन केले होते .कॅनडा देशातील उद्योजक गौरांग शहा यांचे व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी स्क्रीनवर आगमन झाले त्यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांचे स्वागत केले.शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी स्क्रीन समोर येऊन कॅनडा देशातील उद्योजक गौरांग शहा यांचेशी संवाद साधून वेगवेगळे प्रश्न विचारून विविध विषयांवर चर्चा केली.त्यांचे बालपण ,शिक्षण , त्या देशात जाण्याचे प्रवासवर्णन,कॅनडा देशातील लोकजीवन ,शिक्षणपद्धती ,व्यवसाय ,उद्योग ,पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण उपाययोजना ,रस्ते ,वाहतूक ,संस्कृती ,पिके ,भाजीपाला ,फळे ,पदार्थ , पाणी व्यवस्थापन , सामुदायिककार्यक्रम ,सणसमारंभ ,शाळेतील विविध उपक्रम ,भारत देश व कॅनडा देश यांमधील फरक अशा विविध बाबींवर चर्चा करून माहिती मिळविली.आपल्याकडे दिवस होता त्यावेळी तिकडे रात्र होती .त्यामुळे पृथ्वीवर एकाच वेळी दिवस रात्र कसे होतात याची प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना याचे नवल वाटले .यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी ,आदर्श शिक्षक विजय अकोलकर ,मूल्यवर्धनचे सुनील भाकरे ,आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती ,ग्रामस्थ ,पालक ,अंगणवाडी यांनी विविध विषयांवर संवाद साधून त्यांचेशी चर्चा केली.शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ व शिक्षक नवनाथ आंधळे यांनी त्यांना शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळा परिवर्तन बद्दल यांनी अभिनंदन करून शिक्षणाविषयी काही मार्गदर्शन केले . भारतात आल्यावर शाळेला भेट देणार असल्याचे सांगितले.यामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला .
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्स बाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला.त्यांना जगातील कॅनडा देशाची ओळख होऊन वेगळी माहिती ,ज्ञान ,आनंद , प्रेरणा मिळाली.
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.7588168948
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा