शिक्षक दिन व शिक्षकांचे महान कार्य
(५ सप्टेंबर २०२०)
आपल्या भारत देशात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.शिक्षक व समाज यांचे अतूट नाते असते .शिक्षक हे समाजपरिवर्तनाचे म्हणजे राष्ट्रनिर्मितीचे महान कार्य करत असतात. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण देत असतात.शिक्षक भविष्यातले विचारवंत ,कलाकार ,कवी ,लेखक ,साहित्यिक ,पुढारी ,अधिकारी ,शिक्षक ,डॉक्टर ,इंजिनियर ,शास्त्रज्ञ ,समाजसेवक ,विविध क्षेत्रातील व्यक्ती ,सुजान नागरिक घडविण्याचे महान कार्य करतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचे असते .विद्यार्थ्यांमध्ये समाजहिताची योग्य मूल्य रुजविण्याचे कार्य शिक्षक करत असतात . म्हणून शिक्षकांना समाजात महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे .समाजात शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे.शिक्षकांचे स्थान समाजात उंचावले पाहिजे.शिक्षकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे . शिक्षक गावासाठी ,राज्यासाठी ,देशासाठी सतत परिश्रम घेत असतात.शिक्षकांच्या महान कार्याचा गौरव झाला पाहिजे.आपला वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा.असे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार होते. म्हणून शासनाने ५ सप्टेंबर १९६२ पासून त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू मध्ये तिरुत्तणी येथे झाला .५ सप्टेंबरला शिक्षक दिनी नगरपालिका ,महानगरपालिका ,जिल्हा परिषद ,राज्यशासन ,केंद्रशासन आणि समाजात विविध प्रकारच्या कार्य करणाऱ्या सामाजिक व स्वयंसेवी संस्था उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव करतात .तसेच या दिवशी अनेक शाळेत विद्यार्थी शिक्षकांची भूमिका करून शालेय कामकाज पार पाडतात. त्यामुळे त्यांना शिक्षकांच्या कार्याचा प्रत्यक्ष एक वेगळा अनुभव मिळतो.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे बालपणापासून शांत स्वभावाचे होते.अवघ्या विसाव्या वर्षी ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षक झाले .त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात काही काळ कार्य केले.ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठ सारखी विद्यापीठे भारतात निर्माण झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.त्यांनी काही काळ विद्यापीठात कुलगुरू म्हणून उत्कृष्ट कार्य केले.चाळीस वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून उत्कृष्टपणे कार्य केले. ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते .आपले विद्यार्थी बुद्धिमान व आदर्श नागरिक झाले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.परदेशातही त्यांना फार मोठे स्थान होते कारण ते एक शिक्षणतज्ञ होते.आपल्या देशाचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी समाजासाठी , देशासाठी महान कार्य केले.त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या देशाचे महत्व वाढविले.आपल्या देशाला एक चांगली दिशा देण्याचे कार्य केले.एक शांतिदुत ,उत्कृष्ट प्रशासक ,आत्मत्याग ,आत्मबल ,आत्मविश्वास ,आत्मनिर्भरता ,उत्कृष्ट चारित्र्य ,प्रखर बुद्धिमत्ता ,प्रभावी वक्तृत्व हे महत्वाचे गुण त्यांच्या अंगी होते. ते एक महामानव होते .जेव्हा सगळ्यांचा विकास होईल तेव्हा आपलाही विकास होईल .शिक्षण हे आपल्या विकासाचे साधन आहे.शिक्षणाशिवाय आपला विकास होऊ शकत नाही.शिक्षकांकडे शिक्षणशास्त्रज्ञ म्हणून पाहिले गेले पाहिजे .विद्या विनय देते म्हणजे शिक्षण घेतल्यामुळे माणूस नम्र होतो.
शिक्षण ही संस्कृतीची जननी आहे.शिक्षकांनी नेहमी आपली कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे.
असे डॉ.राधाकृष्णन यांचे विचार होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. एक शिक्षक ते राष्ट्रपती या काळात त्यांनी केलेले कार्य खूप महान आहे . त्यांनी केलेले कार्य आपण कधीही विसरू शकणार नाही .राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची यशस्वीपणे अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांमध्ये त्याची रुजवन करण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक करत असतात.मुले मुली ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे .बालपणी त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे असते कारण ते संस्कार चिरकाल टिकतात .म्हणून त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय.आज काळ खूप बदलला आहे.शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे.पालकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत.तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे युग आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.काळ कितीही बदलला तरी बदलत्या काळानुसार शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही हे पण तितकेच सत्य आहे.तंत्रज्ञान हे फक्त शिक्षणास पूरक म्हणून कार्य करू शकते . गुरुशिष्याचे नाते हे अतूट असते ते कोणी तोडू शकत नाही.सध्या आपल्या देशात व संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत.शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण शासनाने चालू केलेले आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य रहावे म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण ,विद्यार्थ्यांचे गट करून शिक्षण ,विद्यार्थ्यांना स्वाध्याय कार्ड देऊन ,,,,,असे विविध प्रकारचे शिक्षण देण्यासाठी शिक्षक गावात ,वाडीवस्तीवर जाऊन परिश्रम घेत आहेत.शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिश्रम घेऊन विविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत.खरोखर शिक्षकांचे कार्य खूप महान आहे कारण शिक्षणातून देश बदलत असतो .
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जि.प.प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो-७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा